आश्विन महिन्याच्या कृष्णपक्षात वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी या दिवशी आपला दिवाळीचा सण सुरु होतो आणि धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, यमद्वितीया म्हणजे भाऊबीज असे दिवस आपण उत्साहाने साजरे करतो.
त्यानंतर काही दिवसांनी देवांची दिवाळी साजरी होते अशी समजूत आहे-तिलाच म्हणतात देव दिवाळी किंवा देव दीपावली. महाराष्ट्रात विशेषतः कोकण भागात मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी आपल्या कुलदेवतेला विशेष नैवेद्य दाखविला जातो. धर्मसिंधु आणि कार्तिक मास महात्म्य या ग्रंथात देव दिवाळीच्या व्रताचे महत्व नोंदविलेले आहे.
कोकणात या दिवशी घरातील देवघरात देवासमोर तेलाचे आणि तुपाचे दिवे लावले जातात. देवांना पंचामृताने अभिषेक केला जातो आणि सोळा उपचारांनी त्यांची पूजा केली जाते. केवळ घरातील देव आणि आपल्या कुटुंबाची कुलदेवता यांच्याजोडीने या दिवशी ग्रामदेवता म्हणजे आपल्या गावाची देवता आणि स्थानदेवता म्हणजे आपल्या शेतातील किंवा गावाच्या वेशीजवळच्या म्हसोबा, पिरोबा, महापुरुष, वेतोबा अशा लोक देवतांना विशेष नैवेद्य दाखविला जातो. त्यामुळे कोकणातील लोक या दिवसाला “देवांचे नैवेद्य” असेही म्हणतात. आपली शेती, आपली गावातील जमीन यांचे रक्षण करीत असेलल्या देवांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. घारगे, पुरण घातलेल्या करंज्या म्हणजे कडबू,वडे, घावन आणि घाटले असे पदार्थ या दिवशे नैवेद्याला केले जातात.
महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे नवरात्र मार्गशीर्ष प्रतिपदेला सुरु होते आणि चंपाषष्ठीला संपते. देव दिवाळीला खंडोबा मंदिरात दीपोत्सव केला जातो. मावळ प्रांतात हा दिवस बैलांच्या झुंजीसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
भारताच्या विविध प्रांतात देव दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. महाराष्ट्राखेरीज उत्तर भारतात कार्तिक पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला देव दिवाळी साजरी होते. त्रिपुरासुर या राक्षसाचा या दिवशी भगवान शंकराने वध केला म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी देव स्वर्गातून पृथ्वीवर अवतरतात अशी समजूत आहे. या दिवशी माणसाचे कल्याण करणारे देव माणसांना भेटायला येतात अशीही समजूत आहे.
वामन अवतारात विष्णूने बळीचा नाश केल्यानंतर ते आपले घर असलेल्या वैकुंठात या दिवशी परत आले अशी श्रद्धा आहे. उत्तर भारतात वाराणसी येथे गंगा नदीच्या किनारी देव दिवाळीला दीपोत्सव साजरा केला जातो. गंगा नदीचे सर्व घाट दिव्यांनी सुशोभित केले जातात आणि अनेक भक्तगण प्रार्थना करण्यासाठी गंगा नदीकाठी एकत्र होतात. राजे महाराजे या दिवशी गंगेच्या किनारी दिवे अर्पण करण्यासाठी येत असत.
जैन धर्मामध्ये चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या निर्वाणाचा दिवस म्हणून हा पवित्र दिवस साजरा केला जातो. देव दिवाळीच्या आधी तीन दिवस जैन उपासक उपवास करतात आणि भगवान महावीर यांची शिकवणूक असलेल्या उत्तरायण सूत्र या ग्रंथाचे वाचन करतात. अनेक जैन भाविक या दिवशी गिरनार येथील पवित्र जैन मंदिराला भेट देवून दर्शन घेतात.
दिवाळी हा उत्सव आनंद देणारा समृद्धी देणारा असा आहे आणि देव दिवाळीच्या निमित्ताने सुद्धा प्रकाशाचा आणि तेजाचा हा उत्सव आनंदात वाढ करणारा आहे हे आपल्या लक्षात येईल.
— डॉ. आर्या जोशी
Leave a Reply