मानवाच्या विचार व ज्ञानश्रेष्ठतेमध्ये त्यालाच आवाहन देणारे, त्याला स्पर्धा करणारे, ह्यालाच वरचढ बनू शकणारे व त्याच्यावरच अधिकार गाजवणआरे, त्याचेच श्रेष्ठत्व हिसकावून घेणारे निर्माण झाले. हा कोणता दुसरा वर्ग, प्राणी व उत्पत्ती नव्हती. तर त्याच्या आपल्याच योनीमधले होते. मानव आता सर्वावर अधिपत्य गाजवित आपसातच संघर्ष करु लागला. मानवप्राणी इतर मानव प्राण्यांशीच झुंज देवू लागला. आता श्रेष्ठत्वाचा गुंता एकदम वाढू लागला. इतरांमधले श्रेष्ठत्व ही संकल्पना यशस्वी झाल्यानंतर हेच श्रेष्ठत्व वैयक्तिकतेकडे जाऊ लागले. श्रेष्ठ कोण “तू का मी” ह्याचे बिज रोवले गेले. एक भयानक प्रचंड ओझे ज्याची बिजे कदाचित सर्वच प्राण्यांचा, विश्वाचा नकाशाच बदलून टाकील. भविष्य काळात प्रचंड उत्पात निर्माण करतील. अशा विचार संकल्पनेची ती बिजे रोवली गेली. त्या बिजांचे नाव होते “तू का मी” आणि पुढे त्याचेच हायब्रिड होऊन फक्त “मीच“ अर्थात “माझेच सारे” मीच श्रेष्ठ ह्या संकल्पनेत. उत्पात माजवला. ह्या एक प्रकारच्या स्वार्थी विचाराने मानव प्राण्यातील श्रेष्ठत्वाची भावना दृढ होऊ लागली. आता ते साध्य करण्यासाठी स्वकीय अर्थात आपलेच लोक, आपलाच समुदाय, समोर येवू लागला. प्राथमिक अवस्थेत त्यांनी निरनिराळ्या क्लुप्त्या अवलंबिल्या. दोन प्राणी झगडतात तेव्हां हात पाय, दांत, नखे इत्यादी अवयवांचा उपयोग केला जाई, नंतर हातात वस्तू येवू लागल्या, त्यात दगड, लाकूड, लोखंड, तांबे इत्यादी धातू आले. मग कठीण पदार्थ येवू लागले. जस जसे ज्ञान वृधींगत होऊ लागले, शस्त्र यांची निर्मिती होऊ लागली. ह्या सर्वांचा फक्त एकच हेतू असे. तो म्हणजे अधिपत्य, सत्ता, श्रेष्ठत्व स्थापन करणे. एकदा सर्वांहून श्रेष्ठ ही मान्यता मिळाली की मग इतर सर्व काही त्याच्या पाठोपाठ येवू लागते. आजच्या प्रगत व वैज्ञानिक काळामध्ये देखील तीच प्रमुख संकल्पना जीवीत ठेवली जात आहे. श्रेष्ठत्व सत्ता आणि मग जीवनाला लागणारे सारे काही हक्काने, नव्हे शक्तीने प्राप्त होऊ लागले.
रानटी टोळ्या, त्याची आयुधे ह्याचा प्रचंड दबदबा होऊ लागला. शस्त्रांची संकल्पना, योजना परिणाम इत्यादी काळानुसार वाढत गेले. बदलत गेले. साधे, सोपे सरळ परंतु प्रचंड ताकदीची शस्त्रे निर्माण होऊ लागली. “बळी तो कान पिळी“ ह्या तत्त्वाने, शक्ती सामार्थ्य प्राप्त संघटनेकडे सत्ता जाऊ लागली. श्रेष्ठत्व येवू लागले. प्रशासन जावू लागले.
“ज्ञान” ते तर सर्वाहून श्रेष्ठ आहे ना. लहरी रुपामधले अस्तित्व असलेले. आजपर्यंत ह्याच ज्ञानाने महान शक्तीधारण करण्यावर देखील आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले होते. कित्येक व्यक्ती त्या संघटन समुदायात होत्या. परंतु शरिराने अत्यंत अशक्त व भित्रे होते. फक्त विचार ज्ञान यांचा त्या काळानुसार व त्यावेळेनुसार प्रचंड साठा होता. हा शरिराने अत्यंत नाजूक, किरकोळ अशी देहकाठी परंतु ज्ञान प्राप्त होता. शारिरीक शक्तीसामर्थ्यांसमोर ज्ञान सामर्थ्याला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. शक्तीवान कुणाचेही ज्ञानी समजदार बोल दुर्लक्षीत करीत.
Leave a Reply