१९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोलकरीण’ या मराठी चित्रपटातील हे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं आहे व पडद्यावर साकारलंय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी! या गीतात त्यांनी देवाला जे आर्जव केलंय, त्यात थोडा बदल करुन मी असं म्हणेन की…
देव जरी मज, कधी भेटला.. माग हवे ते, माग म्हणाला.. म्हणेन प्रभु रे, अशीच आईऽ दे तू, सर्वांना…
यातून मला एकच सांगायचं आहे की, आईचं शालीन आणि सोज्वळ असं रूप, जे सुलोचना दीदींमध्ये दिसलं, ते आजपर्यंत दुसऱ्या कुणामध्येही दिसलेलं नाही!
१९२८ साली दीदींचा जन्म झाला. लहान वयातच आई-वडिलांचं छत्र हरपलं. वयाच्या पंधराव्या वर्षी मा. विनायक यांच्या ‘चिमुकला संसार’ चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांचे भावपूर्ण डोळे पाहून भालजी पेंढारकरांनी तिचं नाव ठेवलं, ‘सुलोचना’!
१९४३ साली पहिल्या हिंदी चित्रपटात, पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून काम करण्याची संधी सुलोचना यांना मिळाली. पुढे कपूर घराण्यातील तीन पिढ्यांसाठी, त्यांनी आईची भूमिका वठवली.
भालजी पेंढारकर यांच्या ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेली ‘जिजाबाई’ची भूमिका, मैलाचा दगड मानली जाते. सुलोचना दीदींनी २५० हून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका केलेल्या आहेत.
या देदिप्यमान कारकिर्दीबद्दल त्यांना महाराष्ट्र भूषण, व्ही. शांताराम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. १९९९ साली भारत सरकारचा ‘पद्मश्री’ हा किताबही त्यांना बहाल करण्यात आला आहे.
सुलोचना यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीवर, सिनेपत्रकार इसाक मुजावर यांनी ‘चित्रमाऊली’ हे पुस्तक लिहिलेले आहे.
आज सुलोचना दीदींनी ९४व्या वर्षांत पदार्पण केलं आहे..त्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
शतायुषी भवः!!
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३०-७-२१.
Leave a Reply