आपण एरवी समाजात वावरताना उच-नीचतेच्या किती पायऱ्या सांभाळून वागत असतो, ते ही नकळत. पैसा, प्रतिष्ठा, पद व क्वचित प्रसंगी शिक्षणही माणसा-माणसांत अदृष्य भिती उभ्या करत असतं. अधिकारी शिपायाशी शक्यतो हसणार-बोलणार नाही, रोजचा सलाम करणारा वाॅचमन तर सर्वांचाच दुर्लक्षीत. रिक्शा-टॅक्सीवाले, वेटर यांच्याशी तरी कुठे लोक बोलतात..! बोलणं जाऊ देत, बघतही नाहीत कधी..वरचा माणूस खालच्या माणसाशी बहुतेक वेळा असाच वागताना दिसतो..बर हा केवळ वर्गविग्रह नाही. आपल्या देशात असं वागण्यासाठी जात हा स्पेशल प्रकार आहेच. मग धर्म-पंथ तरी मागे कसे राहातील. सर्वच जण आपापला आब राखून बेगडी दिखाव्याने दुसऱ्यांशी वागत आसतात. मग माणसं सगळी सारखीच असतात ती कशी?
तर, असं हे जे आपलं नेहेमीचं वागणं असतं ना, ते एक रोजच्या जीवनाचा नकळत झालेला भाग असतं. सर्व काही ठिक चाललेलं असताना आपण असं वागत असतो..आपण म्हणजे जवळपास ९० टक्के लोक असं वागत असतात..असं वागताना आपलं माणूस नांवाचं यंत्र झालेलं असतं..
पण या ‘यंत्र मानवा’चा माणूस’ होतो तो जेंव्हा एखादं अडचण किंवा जीवावरचं संकट येतं तेंव्हा. यात नोकरी जाणे,घरात टोकाची भांडणं होणे, मुल वाममार्गाकडे वळतायत ते एखद्या गंभीर आजारापर्यंत काहीही असू शकते. हे संकट त्या त्या माणसाच्या स्वभावानुसार कमी-अधिक तीव्र असू शकतं.
प्रथम संकटाला तोंड देण्यासाठी माणूस स्वत:ला शक्य त्या सर्व मार्गाचा अवलंब करतो. मग नातेवाईक-मित्र यांची मदत घेतली जाते. पुढची पायरी देव ही असते. संकट शमत दिसत नाही असं लक्षात आलं की मह आपापल्या परीघाबाहेर उपाय शोधायला मदत होते. मग हळुहळू पद-पैसा-प्रतिष्ठा यांच्या बेड्या निखळायला सुरूवात होते. परीघापलीकडील व्यक्तीकडे कुणी मोठ्यापदावरील माणूस ओळखीचा आहे का, अनुभवी काऊन्सिलर, चांगला डाॅक्टर, वैद्य वैगेरे ओळखीचं कुणी आहे का याची चवकशी सुरू होते. आता मार्ग न सापडल्याने उपायांचा हा शोध भारतात- (परदेषातही-‘हाॅन्टींग’ ही डिस्कव्हरी वाहिनीवरची सिरीयल बघीतली असेल तर कळेल. पण ते परदेशी असल्याने ते बरोबरच असणार. आपली अंधश्रद्ध.) – बुवा-बाबा, मांत्रीक-तांत्रीक ते ज्योतिषी इथपर्यंत चे मार्ग धरले जाताक. शेवटी माणसाला सर्व दृष्य मार्ग सरले की अदृष्याचा मार्ग धरावाच लागतो. इथे शिक्षणाची बंधन गळून पडतात, जाती विलय होतो व माणूस माणूस होण्याच्या मार्गाला लागतो.
इथून पुढे धर्माची बंधनही हळुहळू गळून पडायला सुरूवात होते. परंतू वर्षानूवर्ष रक्तात भिनलेले संस्कार माणसाला सहजा सहजी तसं करू देत नाहीत. तरी हिन्दू धर्मीय याबाबतीत कमालीचे विशाल दृष्टीचे असतात. मी अगदी लहानपणापासून मुसलमान फकीरांच्या दरर्ग्यावर हिन्दू माणसांना मुसलमानांपेक्षा भक्तीभावाने जाताना पाहिलेलं आहे तर वांद्रेयाच्या ‘मोत मावली’ला नवसात बोललेले मेणाचे अवयव वाहताना ख्रिश्चनांच्या वरताण मोत मावलीशी एकरूप झालेलेली हिन्दू माणसं पाहीली आहेत..पारशांच्या देवळात इतरांना जाता येत नाही म्हणून, नाहीतर तिथेही जायला हिन्दूजणांनी पुढे नंबर लावला असता..हिन्दूंचं हे असं वागणं संकट समयी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून नसतं, तर नेहेमीची सवय म्हणून असतं..संकट काळात त्यात आणखी तन्मयता येते एवढंच..परंतू इतर धर्मीय मात्र संकटात इतर धर्मांच्या दैवतांकडे जाताना दिसत नाहीत हे ही तितकंच खरं..
पण ‘दिसत नाहीत’ याचा अर्थ जात नाहीत असा होत नाही. होय, हिन्दूंव्यतिरीक्त इतर धर्मांचीही माणसं सर्व उपाय हरले की मग बुवा-बाबा-बापू, मांत्रिक, ज्योतिषी यांची कास धरतात. भले मग त्यांचा धर्म अशा गोष्टींना मानत असो वा नसो. मी ज्योतिषी या नात्याने काम पाहाताना अनेक मुस्लीम व ख्रिश्चनाना मार्गदर्शन केलं आहे. माझी अडचण होते ती, ते उपाय काय करावा हे विचारतात तेंव्हा. मग आपलेच उपास-तापास त्यांच्या दैवतांच्या नांवाने करायला सांगतो आणि ते करतातही..तुम्हाला आश्चर्य वाटेल, हिन्दूंचा धार्मिक प्रतिकांनाही पुजण्याची त्यांची ना नसते मात्र त्यांच्या ‘कम्युनिटी’च्या दबावामुळे त्यांना तसं उघडपणे करता येत नसतं. (ता.क.-दोन मुस्लिम मित्रांनी माझ्याकडून रितसर पत्रिका जुळवून आपापली लग्न केलीयत.)
इथे माणसाचा धर्म आपोआप गळून पडतो. धर्म खरंतर माणसं जोडण्यापेक्षा तोडण्याचंच काम हिरीरीने करत असतो. एकदा का धर्म (यात जातही आलीच) ढिला पडला की मग माणसाला माणूस भेटतो..आणि मग लक्षात येतं की माणसं सगळी सारखीच असतात परंतू ती संकटात असतानाच..सुखापोटी प्रसवतात त्या भिंती..म्हणून कुणी संताने देवाकडे ‘कायम दु:खात ठेव’ अशी मागणी केली असावी ती स्वत:तला माणूस जागृत ठेवण्यासाठीच असावी..
– नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply