पंढरीचे भूत मोठे , आल्या गेल्या झडपी लागे असं हे विठ्ठलनामाचं भूत, एकदा का मागे लागलं की त्यापासून सुटका नाही. अनेक संतांना या भुताने पछाडलं, त्यातलेच एक संत तुकाराम महाराज. त्यांची पत्नी आवली आणि लखूबाई म्हणजे रुख्मिणी या दोघींवरचं नाटक, सं.देवबाभळी. आजच म्हणजे २ जून, प्रबोधनकार नाट्यगृहात हे नाटक पहाताना…..पहाताना म्हणण्यापेक्षा तो जिवंत अनुभव आजच्या ४२० व्या प्रयोगातून घेतानाही, सादर करणाऱ्या दोन्ही स्त्री कलाकारांची अभिव्यक्ती इतकी समरसून होती की काही विचारू नका.
हा जिवंत अनुभव घेतल्यावर, तो लिहून काढायचा असं अगदी मनापासून ठरवलं होतं. परंतु नाटक पाहिल्यावर हृदया हृदय एक जाले, ये ह्रदयीचे ते हृदयी घातले अशी मनाची स्थिती झाली.
खरं सांगू का ? हे नाटक पहाताना कान आणि डोळे सजग ठेवून रंगमंचावर घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाशी, पंचेंद्रियांसह तन्मय झालं पाहिजे. एखादं वाक्य, एखादा शब्द जरी चुकला तरी खूप काही चुकल्याची जाणीव होत रहाते, आणि rewind तर करता येत नाही. संपूर्ण प्रयोग पुन्हा पहाणे हाच पर्याय उरतो.
या नाटकाने लहानांपासून थोरांपर्यंत साऱ्यांनाच वेड लावलय, यांचं श्रेय, लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख या प्रतिभावान दिग्दर्शकाला सर्वार्थाने जातंच, परंतु नेपथ्य, प्रकाशयोजना, अप्रतिम संगीत, आनंद भाटे यांचं पार्श्वगायन या सगळ्यांचा वाटाही नाटकाच्या यशात तितकाच आहे. आणि last but not least अशा दोन स्त्री कलाकार, आवली आणि लखुबाई अर्थात शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी या दोघी म्हणजे नाटकाचा प्राण आहेत.
हा जिवंत अनुभव या दोघी आपल्या अभिनयातून, गायनातून आणि आपल्या भूमिकेत चपखलपणे वावरण्यातून अगदी सहिसही देतात, जो आपल्या हृदयाला पूर्णपणे भिडतो. त्या या व्यक्तिरेखेत शोभतात का? हा मुद्दाच इथे उद्भवत नाही, परंतु भूमिकेची कमालीची समज दाखवत आपल्या अभिनय, गायनातून व्यक्तिरेखा जिवंत करतात त्याला तोड नाही. एक प्रत्यक्ष रुख्मिणी आणि दुसरी मानवी व्यक्तिरेखा आवली. या दोन्ही विवाहित तरीही एकट्या पडलेल्या स्त्रियांच्या मुखातून लेखक दिग्दर्शकाला जे सांगायचय, ते दोघीही कलाकार अगदी पूर्ण रूपाने आपल्या हृदयापर्यंत पोहोचवतात. नितांतसुंदर संगीत दिलेली मूळ गीतं या दोघींच्या गळ्यातून ऐकताना त्यातले शब्द आणि भाव काळजाला भिडून जातात. दोघींच्याही आवाजाची जातकुळी वेगळी आहे, पण जे पोहोचवायचं आहे ते गीतातील शब्दांचा उच्चार, वजनासहित आपल्यापर्यंत पोहोचतं.
लाखुबाई आणि आवली या दोघांतील परस्परसंवादाचा आनंद घेणं ही या नाटकातली एक पर्वणी आहे. सर्वसामान्य आवली असो अथवा प्रत्यक्ष रखुमाई, “माझ्यामुळे चाललंय सगळं” हे वाक्य त्यांच्याही मुखातून येतंच.
कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रूक्मिणी रूसून दिंडीरवनात येऊन राहिली. कृष्णावर रूसून दिंडीरवनात आलेली रूक्मिणी म्हणजेच ही लखूबाई असे समजले जाते. विठ्ठलावर रागावून वेगळी झालेली एकली लखूबाई आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या वेडाने त्याचं नाव घेत, घर दार विसरून दिवस रात्र घराबाहेर रहाणाऱ्या तुकारामांमुळे घरात एकलीच असलेली आवली दोघींची व्यथा एकच, पण आपल्या नवऱ्याला दुसऱ्या कुणी नावं ठेवली की दोघी खवळून उठतात.
डोक्यावर भाकरीची टोपली घेऊन आपल्या नवऱ्याला शोधत रानोमाळ फिरणाऱ्या आवलीच्या पायात देवबाभळीचा काटा रुततो, तो काढण्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाला अशी कथा आहे. नाटकात हा काटा रुतलेल्या पोटुशी आवलीची सेवा करायला विठ्ठल प्रत्यक्ष रखुमाईला तिच्या घरी पाठवतो, त्यामागेही त्याचा काही हेतू असतो का ? याचंही उत्तर नाटकात मिळून जातं.
आवलीची सेवा करताना, सतत तिच्या मुखातून आपल्या नवऱ्याला मिळणाऱ्या शिव्या ऐकण्याची दुहेरी कसरत लखुबाईला करावी लागते.
शेवटी लखूबाई आवलीला विचारते, सुखवस्तू माहेर असताना या अठरविश्र्व दारिद्र्य असलेल्या घरात, तू का पडून राहिलीस ? का नाही सोडून गेलीस हे घर ? त्यावरचं आवलीचं उत्तर, आजच्या लग्नसंस्था, कुटुंबसंस्था या गोष्टींचं महत्त्व संपून गेलेल्या काळात, चट मंगनी पट ब्याह आणि चट divorce ला सामोरे जाणाऱ्या पिढीला खूप काही सांगून जाणारं आहे. आवली लखुबाईला म्हणते, रागावून निघून जायला मी रखुमाई थोडीच आहे. आणि मी निघून गेल्यावर यांची काळजी कोण घेणार ? निघून गेल्यावर पुन्हा परतावं असं वाटलं आणि आपलं घरच हरवून गेलेलं असलं, तर काय करायचं बाई ? आजच्या पिढीला हा मोलाचा विचार देतानाच, स्त्रीचं एकलेपण स्वतःच स्वत्व विसरून, बऱ्या वाईट परिस्थितीत, आपल्या संसाराला घट्ट धरून राहण्याच्या वृत्तीवर हे नाटक भाष्य करतं.
संपूर्ण नाटकात तुकारामांचा प्रत्यक्ष वावर नसूनही त्यांचं अस्तित्व सतत जाणवत रहातं ते, ध्वनिमुद्रित पांडुरंग पांडुरंग या नामातून आणि पार्श्वसंगीतातून, नेपथ्यातून, प्रभावी दिग्दर्शनातून.
नाटकातील नव्हे… तर या जिवंत अनुभवातील प्रत्येक प्रसंग, तंत्र, संगीत आणि अभिनयातून जिवंत करणारा हा नाट्याविष्कार संपताना आपल्याला प्रचंड अंतर्मुख करून जातो. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, माझ्या मते हा अनुभव सर्वार्थाने घेण्यासाठी, कमीतकमी दोनदा तरी ही नाट्यकृती पाहायलाच हवी. गायलेल्या गितांतील शब्द आणि पहाताना निसटलेले अप्रतिम संवाद यांचा आनंद पुन्हा घेता येईल.
नाटक संपल्यावरही बराच वेळ आवलीचा अवोऽऽऽ अवोऽऽऽ हा आक्रोश आपला पाठलाग करत रहातो. जाता जाता प्रयोग संपल्यावर आलेला एक अनुभव सांगतो, बऱ्याच वर्षांनी भेट होणार असल्यामुळे मी मानसीला भेटायला आणि दोघींनाही मनापासून नाटक आवडल्याचं सांगायला जात होतो. पाच सहा स्त्री पुरुष प्रेक्षक तिथे दोघींना भेटण्यासाठी थांबले होते. एक बारीकशा अंगकाठीचा साधारण तेरा चौदा वर्षांचा मुलगा आणि त्याची आई यांचा संवाद सुरू होता. त्यातून समजलं की त्या मुलाला कलाकारांना मनापासून भेटायचं होतं. तो मुलगा आपणहून दुसऱ्यांदा या नाटकाच्या प्रयोगाला आलेला होता. Security ने आत जायला नकार दिल्यामुळे, तो खूप हिरमुसला झाला होता. त्याच्या आईने खूप समजावलं पण याचा पाय काही निघत नव्हता. मला त्या वयातल्या मुलाचं खरंच कौतुक वाटलं, आणि न रहावुन मी त्याला घेऊन आत गेलो. पाठोपाठ त्याची आई आणि थांबलेले प्रेक्षकही आले. मानसी शुभांगी दोघींना भेटल्यावर त्याच्या डोळ्यातलं समाधान मला जाणवत होतं. आईने काहीही न सांगता त्याने दोघींना पाया पडून नमस्कार केला. शुभांगीने त्याला विचारलं,
“तुला आमचं कोणतं रूप आवडलं? नाटकातलं की आता नॉर्मल कपड्यातलं?” तो उत्तरला, “नाटकातलं”
हे आहे या नाटकाचं लहान थोर साऱ्यांवर झालेलं गारूड.
अखेर शब्दांतून कितीही मांडलं तरी हा,
ये गा ये गा विठ्ठलाचा सं. देवबाभळी अनुभव सगळ्या नाट्यप्रेमींनी प्रत्यक्षात घ्यायलाच हवा इतकंच.
प्रासादिक म्हणे
-प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply