आज श्रीराम नवमी. मर्यादा पुरुषोत्तम रामाची महती सांगणारे अनेक मेसेज अनेकांडून प्राप्त झाले. मला त्यात मात्र गम्मत दिसली. आपण किती स्टिरिओटाईप वागतोय याचं उदाहरण म्हणजे अशा शुभदिवशी आपल्या मोबाईलमधे येणारे अनेक उत्तमोत्तम मेसेज.
आता यात गम्मत अशी, की ‘मर्यादापुरुषोत्तमा’ची फाॅरवर्डेड महती सांगणारे मेसेज पाठवणारे असे किती जण प्रत्यक्ष आयुष्यात ‘मर्यादापुरूषोत्तमा’ची भुमिका खरोखरंच बजावत असतात. माझ्या मते एकही नाही. मी मर्यादा पुरुषोत्तम आहे असं जे सांगत असतील किंवा त्यांच्या बायकांना, परिचितांना त्यांच्याबद्दल तसं वाटत असेल तर ते खोटं बोलतायत असं बिलाशक समजावं..
सुंदर स्त्री पाहून हलला, निदान मनातल्या मनात तरी ( मला ‘चळला’ असं म्हणायचं होतं, पण योग्य दिसणार नाही म्हणून ‘हलला’ असं म्हणतोय.) नाही, तो पुरुषच नाही. असं वाटण्याला जात-पात-धर्म-पंथ आणि मुख्य म्हणजे वयाचंही बंधन नाही. माझ्याकडून असं होत नाही, असं कोणी म्हणत असेल तर तो खोटं बोलतोय किंवा मुळातच काहीतरी खोट आहे असं समजाव.
आजच्या दिवशी छातीवर हात ठेवून आपण राम आहोत असं सांगणारा एक तरी मायचा लाल आहे का? नसणारच. ‘एकपत्मी’व्रत हे मनातल्या मनातही आचरणात आणायलाच अवघड आहे.
दुसऱ्या स्त्रीचा विचार कृतीत जाऊदे, मनातही न येऊ शकणे हे अनैसर्गिकच आहे. प्रकृती-पुरुषातल्या पुरुषाच्या मनाची नैसर्गिक ठेवणच तशी आहे. श्रीरामाचं ठिक आहे, तो देवच होता. पण माणसांना हे शक्य नाही. देव वागतात तसं माणसं खरोखर वागायला लागली तर पंचाईत होईल (हे सर्व धर्मियांना लागू आहे). इथं इंद्राचा अपवाद करायला हरकत नाही आणि म्हणून इंद्र देवांचा राजा असला तरी त्याला पुजत नाहीत. इंद्राचे उपद्व्याप वाचले तर तो पृथ्वीतलावरील माणसांचा खराखुरा प्रतिनिधी शोभतो. यावरून देवांचा राजा ‘माणूस’ आहे असं प्रमेय मांडलं तर चुकेल काय?
— नितीन साळुंखे
9321811091
(कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तसं झाल्यास क्षमा करावी.)
Leave a Reply