आदीबद्रीचे मंदिर कर्णप्रयाग-रानीखेत रस्त्यावर कर्णप्रयागापासून १८ कि.मी. आहे. बसेस, जीप इ. वाहनांची या मार्गावर वर्दळ असते. आदीबद्रीचे मंदिर हे चौदा मंदिरांचे संकुल असून साधारण ५० x २० मी. क्षेत्रावर पसरले आहे. ही सर्व मंदिरे चौथऱ्यावर स्थापीत असून त्यातले सर्वात महत्त्वाचे मंदीर म्हणजे आदीबद्रीचे! मंदीर फारसे मोठे नाही पण मंदिरावरील शिल्पकाम सुरेख आहे. मंदिराच्या गर्भगृहात साडेचार ते पाच फूट उंचीची चतुर्भुज शंख, चक्र, गदा धारण केलेली श्री विष्णूची उभी मूर्ती आहे. विविध अलंकारांनी नटलेली ही शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे. मुर्तीसमोर श्रीविष्णूचे वाहन गरूडाची हात जोडलेली उभी मूर्ती आहे. प्रवेशद्वारावर गंगा-यमुना, नृत्यांगना, मदनिका, सिंहमुख तसेच गणपती इ. मूर्ती कोरलेल्या आहेत तर खांबांवर घटपल्लवाच्या प्रतिमा कोरल्या आहेत. प्रांगणातील इतर मंदिरांत लक्ष्मीनारायण, गणपती, महिषासूरमर्दिनी इ. देवतांची स्थापना केली आहे. आदीबद्रीची मूर्ती ही साधारण १० व्या शतकातील असावी, असा एक अंदाज आहे.
ह्या संकुलातील मंदिरे लहान असली तरी खूप छान आहेत. विशेषतः दुसरे, चौथे, सहावे, सातवे व चौदावे मंदीर शिल्पकलेच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. मंदिराच्या निर्मितीवरून ही सर्व मंदिरे गुप्तकालाच्या अखेरच्या पर्वात बांधली असावीत व मूळ संकुल १६ मंदिरांचे असावे, असा एक अंदाज आहे.
आदीबद्री मंदिराच्या आवारात व मंदिरात पूर्वी अनेक सुंदर मूर्ती होत्या. त्या बहुतेक चोरीला गेल्या आहेत. इतकेच कशाला मुख्य मंदिरातील श्रीविष्णूची मूर्ती चोरण्याचा प्रयत्न झाला होता पण ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे तो फसला. ‘नशीब त्या भगवान श्रीविष्णूचे!’ आणखी काहीच बोलता येत नाही. पण ह्या सर्व गोष्टीला आपली बेफिकिरी व निष्काळजीपणा कारणीभूत आहे हे निश्चित, आपल्या संपन्न संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या अनेक गोष्टी गायब होतात व आपण शांत राहतो. फार तर निषेध व्यक्त करतो व परदेशातील लोकांनी त्यांच्या वस्तू किती छान ठेवल्या ह्याचे कौतुक करतो.
आदीबद्रीजवळ बेणीताल हा तलाव व गैरसैन येथे गढवाली राजाचा जुना किल्ला आहे.
-प्रकाश लेले
Leave a Reply