नवीन लेखन...

देवभूमीतील पंचबद्री  – विशालबद्री किंवा बद्रीनाथ – भाग 1

पांडुकेश्वर ते विशालबद्री हे २४ कि.मी. अंतर आहे. या स्थानाचे माहात्म्य विशाल आहे म्हणून हे स्थान विशालबद्री म्हणून ओळखले जाते. ह्या पवित्र भूमीत देवदेवता, ऋषी-मुनी, साधू-संन्याशी, तपस्वी महात्म्यांनी वास्तव्य केले. तपोसाधना, ध्यानसाधना केली. बद्रीनाथचे दर्शन हे त्यांचे जीवन ध्येय होते. या भूमीत व्यास महर्षीनी वेद-पुराणांची, महाभारताची रचना केली. शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर, उपनिषदावर भाष्य याच भूमीत केले.

पांडुकेश्वर ते बद्रीनाथ हा रस्ता बराचसा चढाचा आहे. प्रवासाच्या दृष्टीने हा मार्ग तसा अवघडही आहे. पण ह्या मार्गावर अलकनंदेची अनेक मोहक रूपे पहायला मिळतात. १९७७ साली ह्या रस्त्याचे रूंदीकरण करत असताना ह्या मार्गावर नैसर्गिक गुहा सापडल्या आहेत. तर चौला गावाजवळ असंख्य कबरी सापडल्या आहेत. १७७३ साली काही मोगल सरदार आपल्या सैन्यासहीत बद्रीनाथचे मंदिर लुटण्यासाठी जात होते. पण थंडी, हिमवर्षाव, पाऊस, प्रतिकूल हवामान यामुळे ते सैन्य गारद झाले व त्यांच्या या कबरी आहेत, असे इतिहास संशोधकांचे मत आहे.

पुढे येते हनुमानचट्टी. या ठिकाणी हनुमंताने भीमाचे गर्वहरण केले अशी श्रद्धा आहे. हनुमानचट्टी ते बद्रीनाथ हे अंतर साधारण १५ कि.मी. आहे हनुमानचट्टीनंतर येते देवदेखणी. येथून बद्रीनाथपुरीचे दर्शन होते.

‘बद्रीनाथ’ भारतातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान! दरवर्षी लाखो लोक या ठिकाणी बद्रीनाथाच्या दर्शनाला येतात व आपल्या जीवनाचे सार्थक झाले या आनंदात आपला भविष्यकाळ आनंदाने व्यतीत करतात. भारतातील चार धामांपैकी हे एक धाम. सर्व पुराणांनी या स्थानाची महती गायली आहे. माहात्म्य वर्णन केले आहे. ह्या ठिकाणी देव-देवतांचा नित्य निवास असल्याची सर्वांची श्रद्धा. ऋषी-मुनींची ही तपोभूमी आहे. याच भूमीत त्यांनी तपोसाधना केली. ध्यानसाधना केली. बद्रीनाथाचे दर्शन हेच त्यांचे जीवनध्येय होते. पुराणांमध्ये या स्थानाचा उल्लेख मूक्तिप्रदा, योगसिद्धा, विशालपुरी, बदरिकाश्रम, नरनारायणाश्रम, बद्रीनाथ अशा विविध नावांनी केला आहे.

पुराणात ह्या पवित्र स्थानाविषयी अनेक कथा सांगितल्या आहेत. अशीच एक कथा:

एकेकाळी या रम्य स्थळी शिव-पार्वतीचा निवास होता. एके दिवशी भगवान विष्णूंनी हे स्थान पाहिले व या स्थानाच्या सौंदर्याने ते मोहित झाले व या स्थळी त्यांनी कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचे निश्चित केले.

आणि एके दिवशी अतिशय गोंडस, गोजिरवाणे लहान बालक पार्वतीमातेला आपल्या सदनासमोर खेळताना दिसले. पार्वतीमातेने त्या मुलाला उचलून घेतले व आपल्या सदनी घेऊन आली. त्याला न्हाऊ-खाऊ घातले. त्याचे कोडकौतुक केले व त्याला घरी ठेवून श्रीशंकर साधना करत असलेल्या स्थळी गेली. श्रीशंकराला तिने सर्वकाही सांगितले. ती मुलाचे कौतुक करू लागली. श्रीशंकरांनी क्षणभर डोळे मिटले. त्यांनी सर्व काही जाणले. त्यांनी डोळे उघडले व हसत पार्वतीमातेला म्हणाले, “आता आपले निवासस्थान बदलायला हवे.” पार्वतीमातेला काहीच समजले नाही. दोघे आपल्या सदनी आले. पाहिले तर दरवाजा बंद! त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी खूप प्रयत्न केला. हाका मारल्या, पण काही केल्या दरवाजा उघडला नाही. श्रीशंकरांनी पार्वतीमातेला सांगितले की हे बालक दुसरे-तिसरे कोणीही नसून भगवान श्रीविष्णू आहेत. आपण आता दुसऱ्या स्थळी वास्तव्यासाठी प्रयाण करू या.”

तर दुसरी एक कथा असे सांगते की, विश्वकल्याणासाठी भगवान श्रीविष्णूंनी तपोसाधना करायचे ठरवले. त्यांनी आदिमाया लक्ष्मीला ही गोष्ट सांगितली व हिमालयातील एका पवित्र रमणीय जागी प्रयाण केले. त्यांनी तपोसाधना सुरू केली. संपूर्ण जगाची काळजी करणाऱ्या जगदंबेला श्रीविष्णूंची काळजी वाटू लागली. श्रीविष्णू ज्या ठिकाणी साधना करत होते त्या ठिकाणी ती आली. तिने एका बोरीच्या झाडाचे रूप घेतले व थंडी-वारा, ऊन-पाऊस यापासून श्रीविष्णूंचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यावर सावली धरून उभी राहिली.

श्रीविष्णूंची साधना संपली. त्यांनी डोळे उघडले आणि पाहिले तर एक बोरीचे झाड आपल्यावर सावली धरून उभे आहे. उन्हा-पावसापासून आपले रक्षण करत आहे. श्रीविष्णू आनंदी झाले आणि कृतज्ञतेने झाडाकडे पाहून त्यांनी हात जोडले व त्यांनी ओळखले, आपले रक्षण करण्यासाठी साक्षात आदिमाया जगदंबा बोरीच्या झाडाचे रूप घेऊन आपले लक्षण करते आहे. भगवान प्रसन्न झाले. त्यांनी श्रीलक्ष्मीला सांगितले की, तू माझे बोरीच्या झाडाचे रूप घेऊन रक्षण करत होतीस. मी आता बद्रीनाथ नाव धारण करून या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करीन व जो कोणी या ठिकाणी माझ्या दर्शनासाठी येईल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. इथे कोणतेही कर्म केले तरी त्याचे फळ त्याला अनंतपटीने मिळेल. त्याला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही. आजही लोक म्हणतात, “जो जाये बदरी । वो न आये उदरी.

नर-नारायण पर्वताच्या कुशीत, अलकनंदा नदीच्या काठावर नारायण पर्वताच्या पायथ्याशी बद्रीनाथचे मंदीर उभे आहे. या मंदिराची स्थापना शंकराचार्यांनी केली असे सांगितले जाते. त्या काळी या परिसरात बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. बद्रीनाथच्या मूर्तीचा अवमान होऊ नये म्हणून स्थानिक लोकांनी बद्रीनाथाची मूर्ती अलकनंदेच्या पात्रात सोडली होती. शंकराचार्य जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा त्यांना मंदिर रिकामे दिसले. त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना हे सर्वकाही समजले. त्यांनी अलंकनंदेच्या पात्रातून मूर्ती बाहेर काढली व तिची स्थापना करून या मंदिराच्या पूजेचे हक्क केरळमधील नंबुद्री ब्राह्मण व्यक्तींना प्रदान केले. आजही ती परंपरा सुरू आहे. ह्या मंदिराचे मुख्य पुजारी केरळमधील नंबुद्री ब्राह्मण आहेत.

या मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय भव्य असून निरनिराळ्या रंगांनी रंगवलेल्या पशु-पक्ष्यांच्या विविध मूर्तीच्या, वेलबुट्टीच्या शिल्पांनी नटलेले आहे. प्रवेशद्वारावर चौघड्यासाठी मंडप असून त्यावर सुवर्णकलश आहेत. राजस्थानी शैलीच्या या प्रवेशद्वाराला सिंहद्वार असे म्हणतात. सिंहद्वारातून आत प्रवेश केल्यावर कत्युरी शैलीतील दगडी बांधकाम केलेले बद्रीनाथाचे मंदीर दिसते. या मंदिराची सभागृह व गर्भगृह अशी रचना आहे.

गर्भगृहात सोन्या-चांदीच्या, हिऱ्या-मोत्यांच्या दागिन्यांनी नटलेली बद्रीनाथाची मूर्ती पाहताच मन एकदम प्रसन्न होते. सर्व काळज्या मिटतात व एका अनामिक आनंददायी अनुभूती अनुभवायला मिळते. फक्त या ठिकाणी श्रद्धा पाहिजे. सर्वसाधारणपणे श्रीविष्णूच्या मूर्ती या उभ्या किंवा शेषशायी रूपात पाहायला मिळतात पण येथे मात्र पद्मासन घातलेल्या रूपात या ध्यानस्थ मूर्तीचे दर्शन होते. शाळीग्राम शिळेची ही साधारण ३ फूट ९ इंच उंचीची मूर्ती असून ती परीसाची आहे, असे सांगितले जाते. मंदिराचे मुख्य पुजारी सोडल्यास कोणीही या मूर्तीला स्पर्श करू शकत नाही. मूर्तीच्या दोन्ही बाजूस लक्ष्मी, गणपती, नर-नारायण, कुबेर व नारदाच्या मूर्ती आहेत.

मंदिराच्या प्रांगणात घंटाकर्णाची डोळे नसलेली विशाल मूर्ती आहे. घंटाकर्णाला गढवाली भाषेत ‘घंडियाल’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. बद्रीनाथाची ही क्षेत्रपाल देवता आहे. असे सांगतात की महर्षी व्यासांनी सुरुवातीला केदारक्षेत्रात घंटाकर्णाकडून पाशुपतदीक्षा घेतली होती. सर्वसाधारण या देवतेची स्थापना बांज वृक्षाखाली एका चबुतऱ्यावर केली जाते. तसेच महालक्ष्मी, गणेश यांची छोटी मंदिरे बद्रीनाथ मंदिराच्या प्रांगणात असून मंदिराच्या मागे शंकराचार्यांची गादी आहे. मंदिराच्या प्रांगणात वीर मारूतीचे एक मंदिर आहे. या मारुतीची स्थापना रामदास स्वामींनी केली होती असे सांगतात. देवाची भोगमंडी जवळ असून तेथे रोज देवाचा नैवेद्य व भाविकांना वाटण्यासाठी प्रसाद बनवला जातो. सकाळी साधारण ६ च्या सुमारास हे मंदीर उघडले जाते. सात ते नऊ या वेळात अभिषेक पूजा केली जाते. दुपारी महानैवेद्यानंतर साधारण एक वाजता मंदीर बंद होते. पुन्हा दुपारी साडेतीन ते रात्री नऊपर्यंत मंदीर उघडे असते.

-प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..