कर्णप्रयागपासून ६५ कि.मी. अंतरावर बद्रीनाथाच्या वाटेवर हेलंग ही वस्ती आहे. हेलंगपासून पाच-सहा कि.मी. अंतरावर खनोल्टीचट्टी म्हणून वस्ती आहे. या ठिकाणी वृद्धबद्रीचे मंदिर आहे. गौतम ऋषींनी येथे तपोसाधना केली होती. त्यांच्या वृद्धापकाळात बद्रिनाथाने त्यांना या ठिकाणी दर्शन दिले होते. म्हणून स्थळ वृद्धबद्री म्हणून ओळखले जाते. या स्थानाला ‘अनीमठ’ असेही म्हणतात.
वृद्धबद्रीचे मंदिर अतिशय लहान आहे. मंदिरावर शिल्पकाम असे काहीच नाही. मंदिरात लक्ष्मीनारायणाची चतुर्भूज मूर्ती असून सोबत गरूड, कुबेर व नारद यांच्या मूर्ती आहेत. या ठिकाणी शंकराचार्यांनी बद्रीनाथाचे ध्यान केले होते. या मंदिराचा परिसर पाहिल्यास असे वाटते की, ह्या ठिकाणी एक प्राचीन मंदिर असावे व त्या मंदिराच्या अवशेषावर हे छोटेसे मंदिर उभे आहे.
असेही सांगतात की जेव्हा बौद्ध धर्माचे आक्रमण ह्या भागात झाले तेव्हा विशाल बद्रीनाथाची मूर्ती अलकनंदेच्या पात्रात सोडली गेली. त्या काळात बद्रीनाथाची पूजा ह्या स्थानी केली जात होती.
-प्रकाश लेले
Leave a Reply