आज प्रेमळ स्वभाव आणि शब्दकळेतून माणसे जोडणाऱ्या देवगडचे कवी प्रमोद जोशी यांचा जन्म दि. २८ फेब्रुवारी १९६० रोजी झाला.
एकविसाव्या शतकात मराठी कविपरंपरेत अग्रक्रमाने उल्लेख करावा असे कवी म्हणजे देवगड येथील कविराज प्रमोद जोशी. संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अढळ निष्ठा प्रमोद जोशी सरांनी ढळू दिली नाही. त्यांच्या कवितेतून अलौकिक काव्य अनुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत असते. सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकावर प्रमोद जोशी यांनी आपल्या सात्त्विक व्यक्तिमत्त्वाची मुद्रा उमटवली आहे.
प्रमोद जोशी यांची कुटुंब वेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितातून प्रकट होते. त्यांनी लिहिलेल्या ‘आई’ या कवितेतील गोडवा आणि आईचे वादातीत महत्त्व मनाला भावते.
आई म्हणजे असेतोवर
प्रत्येक क्षणी श्रम आहे!
मी जगतो आईला हाच,
शंभर टक्के भ्रम आहे.
या ओळीत जगण्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आई कुटुंबासाठी कार्यरत असते. ती वृद्ध झाल्यानंतरही आपण नाही तर तीच आपल्याला सांभाळते याची जाणीव समुचित शब्दांत कविराजांनी वर्णिलेली आहे.
नुसतं आई आठवून बघा
मनात आभाळ दाटून येतं!
आई असो आई नसो
काळीज क्षणात फाटून जातं!
मातेचे महत्त्व परिणामकारक शब्दात कविराजांनी मांडले आहे. ‘दुनिया का सर्वश्रेष्ठ योद्धा है माँ’ हा सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटातील डायलॉग आठवतो.
प्रमोद जोशी यांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता लिहितानाच, सहवासात आलेल्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि विधायक कामी धडपडणाऱ्या सहकाऱ्यांविषयी, स्नेह्यांविषयी कौतुकाचे चार शब्द कवितेच्या माध्यमातून लिहीत चांगले काम करणाऱ्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत अनेक ज्येष्ठ कवी एकापाठोपाठ एक दृष्टिआड होत होते. याच दोन दशकांत आधुनिक मराठी कवितेचे सामर्थ्य आणि सौंदर्य प्रकट करणारे विविधगुणी कविता घेऊन अनेक नवे प्रतिभावंत कवीही पुढे आले. नामदेव कोळी यांचा ‘काळोखाच्या कविता’, गीतेश शिंदे यांचा ‘निमित्तमात्र’, दासू वैद्य यांची ‘तूर्तास’ आणि ‘क कवितेचा’, ‘तत्पूर्वी’ हे काव्यसंग्रह, सौमित्र यांचा ‘गारवा ‘, ‘जावे कवितांच्या गावा ‘ हे काव्यसंग्रह याच काळात प्रसिद्ध झाले. याचवेळी स्वर्गीय सुंदर कोकणातून प्रमोद जोशींचा महाराष्ट्रभूषण, पद्मश्री कवी मंगेश पाडगावकर यांची मनस्वी प्रस्तावना लाभलेला ‘अक्षर ऋतू’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
प्रमोद जोशी यांना रंगछटांचे खूप आकर्षण आहे. त्यांच्या निसर्गवर्णन करणाऱ्या कवितेत रंगांची उधळण जागोजागी येते. निसर्गाचे नुसते रूप कवितेतून ते मांडत नाहीत, तर त्यात ते जीव ओततात. म्हणून त्यांच्या कविता सर्वश्रेष्ठ ठरतात. निसर्गात रमणारे, सुंदर सुंदर वर्णन करणारे, आनंदाची पखरण करणारे कविराज जोशी प्रेमकविताही उत्कटपणे लिहितात. याची प्रचीती खालील ओळीत येते.
तुझे नि माझे प्रेम निरामय,
नको करूया मुळी प्रदर्शन!
सहवासाने झाले आहे,
दोघांनाही सात्त्विक दर्शन!
प्रत्येक कवी थोड्याफार फरकाने आनंदयात्री असतो, पण जोशींच्या कवितेतील रसधुंद वृत्ती, सौंदर्याचे विभ्रम, सुकुमार शब्दकळेत पकडण्याची अंतर्दृष्टी, जीवनेच्छेतील उत्कटता, उत्फुल्लता आणि चैतन्यशीलता पाहिली, की आनंदयात्री ही संज्ञा जोशी यांना चपखलपणे लागू पडते. जोशी सर कवितेच्या नित्य सहवासात सुखावले. निरंतर अलौकिक अनुभूतीच्या शोधात ते मग्न राहिले. त्यांच्या आजवरच्या प्रवासात ‘कविता’ सदैव त्यांच्यावर प्रसन्न राहिली. त्यांच्या कवितेतील लय आणि लावण्य मनाला आल्हाद देतात. रूप-रस-गंध-स्पर्शमय संवेदनविश्वाला जाग आणणारी कविता ते लिहीत राहिले. कवितेबरोबर तेही आजवर बहरत गेले आहेत. जोशी सरांनी दैवदत्त गुणांचा विकास वाचनाने, चिंतनाने, मननाने आणि निदिध्यासाने केला. उत्कृष्ट संवेदनशीलता, तल्लख स्मरणशक्ती, व्युत्पन्नता, श्रुतयोजन कौशल्य आणि सूक्ष्म अवलोकन शक्ती या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या कवित्वशक्तीचे पोषण झाले आहे. निसर्गलयींशी साधलेली एकतानता हा जोशी सरांच्या प्रतिभासृष्टीचा गुणविशेष. निसर्ग अनुभूतीच्या साहचर्याने ते प्रेमानुभूतीचे प्रकटीकरण करतात. पर्जन्याच्या उत्सवाची विविध रूपे त्यांच्या कोकणी कवितेत आढळतात. ही पर्जन्यसूक्ते लिहिताना पावसाची बेहोशी ते अनुभवतात. रसिकांनाही चिंब भिजण्याचा आनंद देतात. कवित्वशक्ती हा त्यांच्या प्रतिभाधर्माचा केंद्रबिंदू आहे. काव्यनिर्मिती हाच त्यांचा ध्यास आहे. रसज्ञ कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वाङ्मयीन कर्तृत्वाचा त्यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावतो आहे.
विजय हटकर
संकलन-संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply