कोकणातला पाऊस हा भयंकर देखणा असतो हे अनेकांकडून ऐकलं होतं, वाचलही होतं. मी कोकणातला पाऊस तसा पाहिलाही होता. परंतू देवगडातल्या ह्या तीन-चार दिवसांच्या निवांत मुक्कामात कोकणातला पाऊस अनुभवला.।
आमच्या चारूचं हॉटेल देवगडातल्या समुद्रकिनार्यावर परंतू एका लहानश्या उभ्या कड्यावर आहे..हॉटेलच्या बाल्कनीत उभं राहीलं की समोर क्षितीजापर्यंत पसरलेला अथांग दर्या आणि दर्याच, बस्स, आणखी काही नाही..भणाणत येणाऱ्या वाऱ्याला सोबत घेऊन समुद्रातून उसळत येऊन किनाऱ्यावर येऊन अलगद विसावणाऱ्या लाटा..’शुभ्र तुरे लेवून आल्या, निळ्या निळ्या लाटा..’ हे शब्द प्रत्यक्ष अनुभवायचे असतील तर इथे येवूनच अनुभवायला लागेल..
इतर ठिकाणचं मला माही सांगता येणार परंतू आमच्या मुंबईत पाऊस चक्क ‘पडतो’..’पडणे’ या शब्दामुळे डोळ्यासमोर एरवीही जे जे उभं राहाते, त्याच प्रकारच हे पावसाचं पडणं असतं..
देवगडचा पाऊस मात्र ‘दिसतो’..दूरवरून किनार्याकडे येताना समुद्राच्या प्रतलावरून भुमीकडे अनावर वेगाने धावत येणारा पाऊस चक्क दिसतो..ढगांतून दूरवर समुद्रात लक्षधारांनी कोसळणारा पाऊस डोळ्यांनी पाहाता येतो..या पावसाला स्वत:चा आवाजही असतो हे एक आणखी आश्चर्य..! स्वत:ला विसरण्याचा विलक्षण अनुभव असतो हा..! शब्दांत नाही पकडता येणार..
अशाच एका ढगांतून कोसळताना ‘दिसणार्या’ पावसाचा फोटो काढण्याचा एक केविलवाणा प्रयत्न मी केला.. फोटो सोबत पाठवतोय..
वेळ दुपारी दोनची. ठिकाण देवगडातल्या मिठबांव गांवानजीकच्या ‘तांबळडेग’ या गावाचा नितांत सुंदर, अनाघ्रात समुद्रकिनारा. समोरचा नजरेच्या टप्प्यात न मावणारा क्षितिजापर्यंत पसरलेला अथांग दर्या आणि त्या दर्यात ढगांतून कोसळताना दिसणारा पाऊस..!!
-गणेश साळुंखे
9321811091
Leave a Reply