देवघरात तेवते शांत,
प्रशांत अगदी समई,
ज्योत स्थिर होत,
अचल जशी राही,—
केवढा त्याग तिचा,
दुसऱ्यासाठी समर्पण,
दुनियेला या प्रकाशत,
केले जीवन अर्पण,—
कर्तव्यबुद्धी किती असेल,
कठोर घेतले व्रत,
क्षणाक्षणाला जळत जळत,
आयुष्य पुरे देऊन टाकत,—
तिच्यामुळे कळे खरा,
आयुष्याचा अर्थ निराळा,
अंगोपांगी झिजत झिजत,
मंद अगदी तेवते वात,–!!!
ज्योत दिसे कळीगत,
सारखा त्यातून प्रकाश स्फुरत
त्यागाचा अलौकिक सुवास,
पसरतो साऱ्या देवघरात,–!!!
मिळालेले इंधन जपत,
अग्निदेवाची पूजा करत,
अहोरात्र समई जळत,
बरेच काही शिकवत शिकवत,—
नाही कुठली तक्रार,
ना कसली हरकत,
नाही कुठलीच कुरकुर,
नसते कसलीच ऐट,—!!!
नसे कुठला अहंभाव,
साधी किती राहणी,
दिलेले आयुष्य सोसत,
निमूट सारी करणी,–!!!
ईश्वरा केला अर्पण,
सारा आपुला भक्तिभाव,
भक्ताला दाखवते वाट,
खरोखरच ही जोगीण,–!!!
तिच्यामुळे मन उजळत,
नाहीसा होईल अंध:कार,
दिसे कशी धीरोदात्त,
भगवंताची जशी दूत,–!!!
फडफडे वारा येतांच,
काही पळ, फक्त क्षणिक,
पुन्हा होते स्थिरस्थावर,
निश्चल आणखी अधिक,–!!!
तेजस्वी तिचे मुख,
ओघळते कसे तेज,
सोनेरी दिव्य प्रकाश,
जळतानाही सारा पखरत,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply