परवा बाजारात एका दुकानात लसूण सोलायचं उपकरण पाहून, मला धक्काच बसला! कारण ते उपकरण म्हणजे, लसणाच्या पाकळ्या आत सरकवता येतील एवढ्या व्यासाची फक्त एक रबरी ट्यूब होती. त्या रबरी ट्यूबमध्ये लसूण पाकळ्या भरायच्या. मग ती ट्यूब ओट्यावर किंवा एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवायची आणि पोळपाटावर लाटणं फिरवावं तशी दोन्ही तळव्यांनी दाब देत चोळायची. थोड्याच वेळात सर्व लसणाच्या पाकळ्यांची सालं निघतात.
आपल्या पाठ्यपुस्तकात शेतात चालणाऱ्या कामांची माहिती असायची. त्यात मळणी नावाचा एक प्रकार असायचा. शेतकरी जमिनीचा एक गोलाकार भाग स्वच्छ करून घेतात. त्यावर गहू किंवा तांदळांचे सालासकट दाणे पसरतात. त्या गोलाच्या मध्यभागी एक खुंटी असते. त्याला बैल बांधतात आणि त्या खुंटीभोवती तो बैल गोलाकार चालत होतो. त्याच्या पायाच्या दाबाखाली गव्हा-तांदळाचे दाणे दाबले जातात. सहाजिकच दाणे सालापासून वेगळे होतात. बैलाच्या स्नायुंच्या शक्तीचा उपयोग दाण्यांची सालं काढण्याचं यंत्र म्हणून केला जातो.
याच तत्त्वावर लसूण सोलायचं यंत्र तयार करण्याची कल्पकता कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून जन्माला आली. त्या रबरी ट्यूबवर आपण हातांनी देत असलेला दाब एकाच वेळी अनेक लसणीच्या पाकळ्यांना आणि सारख्याच प्रमाणात मिळतो. त्यातच रबरी ट्यूबला दाब देत असल्यामुळे तळव्यांना दाब देण्याचा त्रास होत नाही आणि कमी कष्टात आणि कमी वेळात लसूण सोलाण्याचं काम होतं.
हेच तत्व किंवा अभियांत्रिकी कौशल्य जवळजवळ सर्व घरातल्या महिला, शेंगदाण्यांची साल काढण्यासाठी वापरतात. भाजलेले शेंगदाणे एका स्वच्छ कपड्यात गुंडाळतात आणि हाताच्या तळव्यांनी किंवा एखाद्या सपाट पृष्ठभागावर ती पुरचुंडी जोरात चोळतात, दाबामुळे शेंगदाण्यांची साल बाजुला निघतात.
थोडक्यात काय मळणीचं तंत्र काही शेतकरीच वापरतात असं नाही, वेगवेगळ्या प्रकारची मळणी करण्याचं तंत्र घराघरातल्या महिलेला अवगत असतं.
Leave a Reply