नवीन लेखन...

धक्का (कथा)

बसमधून प्रवास करताना प्रतिभाला एका तरूणाने धक्का मारला. कदाचित तो चुकुनही लागला असेल पण प्रतिभाला तेव्हा तसं वाटलं नाही म्हणून ती त्याला म्हणाली,” काय रे ! आंधळा आहेस काय? की मुलगी पाहून जाणुनबुजुन धक्का मारतोस ? प्रतीभाची ही वाक्ये त्याने ऐकली नसतील हे तर शक्यचं नव्हतं. पण तरीही ऐकून न ऐकल्यासारखं करत तो पुढे निघुन गेला. बसमधून उतरण्यापूर्वी त्याने एकदा मागे वळून प्रतिभाकडे पाहीले. बसमधून खाली उतरल्यावरही तो तिच्याकडे एक टक पहात होता. तेव्हा प्रतिभा स्वतःशीच किंचित घाबरली कारण तिच्या बोलण्यावर त्याने काही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्या तरूण्याच्या दाढी – मिशा वाढलेल्या होत्या. केसही बरेच लांब होते आणि त्याचे कपडेही इस्त्री केलेले नव्हते, पायात चप्पलही साधीच होती, हातात प्लॅस्टिकच्या पिशवीत जेवणाचा डबा होता. चेहरा साधारण गोरा पण काळवटलेला होता. त्यावरून तो सुशिक्षित नसणार याची प्रतिभाला खात्री वाटत होती. तो टपोरी आहे आणि त्याने जाणूनबुजून आपल्याला धक्का मारला असा प्रतिभानं पक्का समज करून घेतला होता. तरीही का कोण जाणे त्याचा अबोलपणा सारखा खटकत होता. दुस-या दिवशी तो पुन्हा तिला तिच्याच बस मध्ये दिसला. आता तो तिच्यापासून चार हात लांब उभा राहून तिच्याकडे एकटक पहात होता. पण त्याच्या डोळयात कोणतेच भाव दिसत नव्हते. हया वेळी मात्र बसमधून उतरण्याकरिता तो प्रतिभाच्या जवळ आला तेव्हा हळूच म्हणला, ‘‘ साईड प्लीज ! ’’प्रतिभानं त्याला साईड दिली पण कोठेतरी स्वतःवरच रागवली. काल आपण विनाकारण तर त्याच्यावर रागवलो नाही ना ? असा विचार न राहून सारखा तिच्या मनात येत होता. त्या दिवशी कॉलेजात शिकण्यात तिचं धड लक्ष लागत नव्हतं. त्याबदृल तिच्या मैत्रीणीनं तिला विचारलं असता तिनं झालेला सर्व प्रकार तिला सांगीतला असता ती तिला म्हणाली, ‘‘मला वाटतं तुला वाटतं तसा तो टपोरी नसावा. तुला त्याचा धक्का चुकूनच लागला असेल पण कोणाला उलट बोलणं अथवा भांडण करणं हा त्याचा स्वभावच नसेल म्हणून तो तुला काही बोलाल नसेल. तो तुला साईड प्लीज! म्हणाला याचा अर्थ साईड प्लीजचा अर्थ समजण्याइतपत त्याचे शिक्षण नक्कीच झालं असणार ! म्हणजे तो अशिक्षित नसणार! आता राहीला प्रश्न त्याच्या पोषाखाचा तर त्याला त्याची आर्थिक परिस्थिती जबाबदार असणार! तो पुन्हा जर कधी तुला भेटला तर त्याला झाल्या प्रकाराबद्दल सॉरी ! बोलून टाक म्हणजे तुला थोडं मानसीक समाधान मिळेल.’’ त्यानंतर जवळ – जवळ आठवडाभरानंतर प्रतिभा बसमध्ये खिडकीजवळ बसली असताना तिच्या शेजारची तरूणी उठली तेव्हा तो तरूण तिथेच उभा असतानाही तिच्या शेजारी बसणं टाळत होता. ते पाहील्यावर प्रतिभा स्वतःहून त्याला म्हणाली, ‘‘उभा का बस ना ?’’ तो सुरक्षीत अंतर ठेवून तिच्या शेजारी बसताच प्रतिभा त्याला म्हणाली, ‘‘ सॉरी हं ! त्या दिवशी मी तुम्हाला इतकं नव्हतं बोलायला हवं होतं.’’ त्यावर तो लगेच म्हणाला,‘‘तू सॉरी कशाला म्हणतेस ?तुझ्या जागी दूसरी कोणतीही तरूणी असती तरी तिनंही हेच केलं असतं. खरं म्हणजे! चूक माझीच होती मीच माझ्याच विचारात गुंग होतो आणि अचानक माझा बसस्टॉप जवळ आल्याचं लक्षात येताच घाई गडबडीत उतरण्याच्या नादात तुला माझा धक्का लागला इतकचं !’’ त्याचं बोलणं पूर्ण न होत तोच प्रतिभानं त्याला प्रश्न केला,‘‘तू कामाला कोठे आहेस आणि तेथे काय काम करतोस ?’’ त्यावर उत्तरादाखल तो म्हणाला,‘‘ मी एका कारखान्यात कामाला आहे, तिथे हेल्परच काम करतो आणि…’’ तो पुढे बोलणार होता पण ! थांबला. तिला वाटत होतं तोही तिला काही तरी विचारेल पण तसं काही झालं नाही. त्याचा तिला थेडा न म्हणयला राग आलाच. माझ्यासारखी इतकी सुंदर तरूणी ह्याच्यासारख्या लंगूरच्या शेजारी बसून स्वतःहून बोलायला उत्सुक असतानाही हा बोलायला तयार नाही म्हणजे काय? त्यानंतर प्रतिभानं कोणा तिच्याहून सुंदर तरुणीला त्याच्या शेजारी बसलेलं पाहीलं की तिच्या चेह-यावरचे रंग बदलायचे. काही तरूणी तर स्वतःहून त्याच्याबरोबर बोलायला सुरवात करीत पण त्यांनाही तो फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असे. उदा. कसा आहेस ? मजेत आहे ! त्याच उत्तर ठरलेलं.

त्याच्याबद्दल सतत विचार करून करून प्रतिभाच्या मनात त्याच्याबद्दल कोठेतरी ओलावा निर्माण झाला होता. त्याच्या बद्दल थोडं अधिक जाणून घ्यायला हवं असं प्रतिभाला मनापासून वाटू लागलं. एक दिवस प्रतिभाने बसमध्ये तिच्या एका कॉलेज मैत्रिणीला त्याच्याबरोबर थोडया अधिकच गप्पा मारताना पाहीलं आणि तिला एक आशे चा किरण दिसला. तिनं कॉलेजात जाताच त्या मैत्रिणीला एकटी गाठून तिच्या जवळ त्याची चौकशी केली असता ती तिला म्हणाली, ‘‘ कदाचीत तुला वाटत असेल की तो सामान्य तरूण असावा. पण तसं नाही ! त्याच्या साध्या, भोळया चेह-यावर जाऊ नकोस त्या चेह-यामागे दडलयं प्रचंड ज्ञान, आशावाद आणि इच्छाशक्ती ! त्याच्या घरची परीस्थिती अत्यंत हलाखीची आहे. दहावीपर्यंतच शिक्षण त्याने छोटी मोठी कामे करून पूर्ण केलं तरीही त्याला सत्तर टक्के गुण मिळाले. इतके गुण मिळूनही त्याने रात्रमहाविद्दालयात प्रवेश घेतला आणि एका कारखाण्यात काम करून त्यानं आपलं बारावीपर्यंतचं शि क्षण पूर्ण केलं. आता त्याने ध्यास घेतला आहे तो त्याला जे-जे काही मिळालं नाही ते-ते आपल्या लहान भावंडांना देण्याचा. कोणाच्याही मोहात पडायला त्याला वेळ नाही, आपल्या ध्येयापासून तो क्षणभरही विचलीत होत नाही. त्याच्या मनाविरूद्ध त्याच्याकडून कोणीच काही करून घेऊ शकत नाही. सामान्य तरूणांना असतात तसे त्याला कोणतेच छंद नाहीत. त्याला सुट्टीच्या दिवशी चित्रे काढायला आणि पुस्तके वाचायला आवडतात. कामावरून आल्यावर तो लहान मुलांच्या शिकवण्या घेतो. त्यातून जर वेळ मिळाला तर मित्रांबरोबर गप्पा मारतो. पण त्याच्या गप्पांचा विषय अध्यात्म हा असतो. कोणतेही व्यसन त्याच्या जवळपास फिरकू शकत नाही. मी – मी म्हणणारे त्याच्या समोर कचरतात कारण त्याचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत. त्याचं बोलणं खोडून काढणं आतापर्यंत कोणालाही शक्य झालं नाही. पैसा ही त्याच्यासाठी अत्यन्त आवशक गोष्ट असतानाही ती मिळविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा दुरपयोग करण्याचा अथवा कोणताही अनैतिक मार्ग अवलंबण्याचा विचार त्याच्या मनाला स्पर्षही करत नाही. इतकं खडतर जीवन वाटयाला येऊनही तो छान छान कविता लिहीतो. ज्या वेगवेगळया वर्तमानपत्रात,मासिकात, आणि दिवाळी अंकात प्रकाशित होत असतात. हे सारं ऐकल्यावर प्रतिभानं तिला प्रश्न केला,‘‘ हे सारं तुला कसं काय माहीत ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मला माहीत नसणार तर कोणाला माहीत असणार? मी माझ्या लहानपणापासून त्याला पाहतेय आम्ही दोघं एका ताटात जेवलोय, एकत्र खेळलोय, हसलोय, आणि रडलोयही ! सारे सण आम्ही एकत्र साजरे केलेत. या जगात फक्त एकच व्यक्ती आहे जिच्यासाठी तो आपल्या विचारांशीही तडजोड करू शकतो. ती व्यक्ती मी आहे त्याची लाडकी एकुलती एक बहीण कविता जाधव ! तुला त्याचं नाव माहीत नसेल म्हणून सांगते, त्याचं नाव आहे विजय जाधव ! विजय जाधव हे नाव ऐकताच प्रतिभाच्या डोळयासमोर काजवे चमकले. कारण प्रतिभानं आतापर्यंत त्याच्या सात-आठ कविता वाचल्या होत्या आणि त्या तिला खूपच आवडल्या होत्या. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या कविता लिहीणारा कवी इतका तरूण असेल असा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. आपल्या सौंदर्याच्या अभिमानासमोर ती ज्याला तुच्छ समजत हाती तो खूपच मोठा होता. इतका मोठा की त्याच्यासमोर आपली बोलण्याचीही योग्यता नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. तेव्हापासून प्रतिभा आणि कविता यांच्या मैत्रिचं रूपांतर घट्ट मैत्रित झालं. त्यानंतर जेव्हा कधी प्रतिभा विजयला पहायची तेव्हा त्याच्याकडे कुतूहलाने पहात हसायची. कळत नकळत ती त्याच्या प्रेमातही पडली होती पण आपलं प्रेम त्याच्यासमोर व्यक्त करण्याची हिंमत तिला कधीच झाली नाही. विजयनेही तिच्याबद्दल तसा विचार केलाही असता तरी त्याचे पाय त्याच्या कर्तव्याच्या बेडयांनी जखडलेले होते. त्यानंतर काही कारणाने प्रतिभा आणि विजयची मधल्या चार-पाच वर्षात फारशी भेट होऊ शकली नाही.

चार-पाच वर्षानी विजय प्रतिभाला पून्हा भेटला तेव्हा तो पूर्वीचा विजय राहीला नव्हता. त्याचा चेहरा एकदम चकाचक झाला होता. डोळयांवर महागडा चष्मा होता. पायात बूट, अंगावर महागडा पोशख आणि हातात देखणा मोबाईल! सारा थाट एखाद्या राजकुमारासारखा! गरिबीचा लवलेश शोधूनही त्याच्या चेह-यावर सापडत नव्हता. त्याच्या बोलण्यात अहंकार डोकावत होता. त्याच्या भोवताली बराच गोतावळा तयार झाला होता. त्याला कसलीच फिकीर नव्हती. सार जग जिंकल्याचा अविर्भाव त्याच्या चेह-यावर दिसत होता. प्रसंग होता त्याच्या लाडक्या बहीणीच्या लग्नाचा ! ह्या वेळी तो पूर्वीसारखं प्रतिभाकडे पाहून हसणं तर सोडाच तिच्याकडे नजर टाकायलाही त्याच्याकडे फुरसत नव्हती. प्रतिभासारख्या कित्येकजणी त्याच्याबरोबर बोलायला उत्सुक होत्या पण त्याच्याकडे अजिबात वेळ नव्हता. तो पक्का व्यावसायिक झाला होता. त्याचा सर्वांजवळ चर्चेचा विषय पैसा हाच होता. कोणत्याही अनैतिक मार्गानं पैसा मिळवणं त्याला मान्य नसलं तरी तो मिळविण्यासाठी तो उत्साही दिसत होता. त्याचा प्रत्येक मिनिट त्याला महत्वाचा वाटत होता कारण आता त्याच्या प्रत्येक मिनिटाची किंमत ठरली होती. ज्ञान फुकट वाटणं त्यानं आता सोडून दिलं होतं. त्याचं अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ज्ञान त्यानं स्वतःपुरतं मर्यादित केलं होतं. त्याच्या चेह-यावरही एक वेगळच तेज झळकू लागलं होतं पण का कोण जाणे त्याच्या ह्या आताच्या राजकुमाराच्या रूपापेक्षाही प्रतिभाला त्याचं ते दाढी-मिशा लपलेलं,एखाद्या निःस्वार्थी साधूचं रूप अधिक भावलं होतं. तसं त्याला ती स्पष्टपणे सांगूही शकत नव्हती. इतकी ती त्याच्यासमोर हतबल झाली होती. कविताला भेटून तिचा निरोप घेत ती जातच होती तोच तिला कोणीतरी जोरात धक्का मारला. ती धक्का मारणा-याला शिव्या घालणार तोच तिच्या लक्षात आलं तिला धक्का मारणारा दुसरा-तिसरा कोणी नसून विजयच होता. विजय तिच्याकडे पहात गोड हसत होता आणि ती त्याच्याकडे एकटक पहात होती. ती भानावर येताच विजय तिला हात जोडत म्हणाला, ‘‘सॉरी ! सॉरी ! ! मला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही आणि हे काय तुझ्या होणा-या नणंदेच लग्न अर्धवट सोडून तू कुठे निघालीस ? माझा खरंच इतका राग आलाय का ?’’ त्यावर प्रतिभा त्याला म्हणाली, ‘‘इतक्या साध्या गोष्टीचा राग यायला मी आता कोणा सामान्य माणसाची होणारी बायको नाही ! आहे, आई-बाबा घरी गेलेत आणि घराची चावी माझ्याकडे आहे ती लगेच देऊन मी परत येते. तेच सांगायला कविताजवळ गेले होते. चावी देऊन मी परत आले की आपण बोलूच. कारण मधल्या काळात तुझ्या जीवनात बरचं काही बदललयं ते कसं आणि का हे जाणून घ्यायला मला आवडेल. कारण आपला प्रेम विवाह नाही ठरवून केलेला विवाह होणार आहे म्हणून ! आपल्या पहिल्या भेटीची सुरवात एका धक्क्यानेच झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत तू मला एकामागून एक धक्केच देतो आहेस फक्त त्या धक्क्याचं स्वरूप आणि अर्थ बदलला आहे इतकचं…

— निलेश दत्ताराम बामणे
202, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए ,बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई – ४०० ०६५.
मो. 8692923310 / 8169282058

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..