कोरोनाची दुसरी लाट आली आणि गेल्या वर्षीपेक्षा यावेळी सामान्य जनता कमालीची घाबरून गेली. पहिल्या लाटेमुळे बंद झालेले कामधंदे पुन्हा कुठे सुरळीत चालू झाले तर, या मार्च महिन्यापासून कोरोना बाधितांचा आकडा पाऱ्यासारखा वाढू लागला.
लसीची वाट पहाणारे कंटाळून गेले तेव्हा एकदाचे लसीकरण सुरु झाले. आधी ज्येष्ठांसाठी लसीकरण झाले. पुन्हा लसीचा तुटवडा पडू लागला. हळूहळू पंचेचाळीसच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाले. पहिल्या लाटेच्या वेळी कोरोनावर औषध उपलब्ध नव्हते. ती लाट संपताना ‘रेमडेसिविर’ हे इंजेक्शन बाजारात आले.
सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग अशा एकूण तीन युगांनंतरच्या सर्वात वाईट अशा ‘कलीयुगा’त आत्ता आपण आहोत. या युगाच्या शेवटी पृथ्वीचा सर्वनाश होणार आहे. त्याचीच एक ‘चुणूक’ म्हणून ही कोरोनाची महामारी सध्या सर्वत्र धुमाकूळ घालते आहे.
गेल्या दोनशे वर्षांत मोठमोठ्या रोगराईने कोटींच्या संख्येने माणसं मेली. कॉलरा, प्लेग, टीबी, बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू रोगांनी जगामध्ये प्रत्येकवेळी मृत्यूचे थैमान मांडले.
पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाने लाखो सैनिक मृत्युमुखी पडले व जगाची अर्थव्यवस्था खिळखिळी करुन टाकली. त्सुनामीसारख्या संकटाने निसर्गाच्यापुढे माणूस हतबल असतो, हे निसर्गाच्या रौद्र रुपाने दाखवून दिले.
नैसर्गिक संकटाला माणूस निसर्गाला दोष तरी देऊ शकतो, मात्र मानवनिर्मित कोरोनासारख्या रोगाला मुकाटपणे सामोरा जातो. परदेशात असे विषाणू निर्माण करुन त्यांच्या औषध कंपन्यांना उठाव मिळावा म्हणून ते देश जनमानसात हे विष पसरवतात. चीनने तेच केले. यामध्ये त्यांचीही जनता बळी पडली व जगातील अनेक राष्ट्रांना त्याची झळ पोहोचली. म्हणजेच माणूसच माणसाच्या ‘जीवावर उठला आहे’, त्यांच्या डोक्यात ‘कली’ शिरला आहे…
भारतात देखील कोरोनाचे भीषण पडसाद उमटले. पंतप्रधानांनी त्यावर उपाययोजना राबवून जनतेला यातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी शर्थ केली. प्रत्येक कोरोना पेशंटच्या उपचारासाठी केंद्राकडून राज्याला आर्थिक मदत दिली. राज्याने जिल्ह्याला, जिल्ह्याकडून तालुक्याला, नगरपालिकेला मदत पोहोचविली. इथे पुन्हा ‘कली’ने घोटाळे करुन रुग्णांची संख्या वाढवली. बातम्यांमधील रुग्णांचे वाढणारे आकडे घाबरवून सोडणारे होते. पहिली लाट ओसरताना तिने कित्येक संबंधितांना ‘मालामाल’ करुन टाकले.
दुसऱ्या लाटेच्या वेळी कोरोनावर ‘संजीवनी’ म्हणून अमृतासमान ‘रेमडेसिविर’ मिळू लागले. कोरोनाची लागण झाल्यापासून नऊ दिवसांतच या इंजेक्शनचा उपयोग होऊ शकतो. त्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर त्याचा काही देखील उपयोग होत नाही, हे नातेवाईकांना माहिती नसेल तर तो खर्च अनाठायी होतो. इंजेक्शनची खरी किंमत पाच हजार रुपये आहे ते काळ्या बाजारातून गरजू पेशंटचा जीव वाचवण्यासाठी तीस हजाराला घेऊ लागले. डाॅक्टरसुद्धा ते आणून दिले तरच पेशंटला वाचवू शकू, असं नातेवाईकांना बजावू लागले. इथे कित्येकांनी आपली सद्विवेकबुद्धी गहाण ठेवून नातेवाईकांनी अवाच्या सव्वा किंमत मोजून आणलेले इंजेक्शन प्रत्यक्ष पेशंटला न देता त्याची परस्पर काळ्या बाजारात पुन्हा विक्री करु लागले.
आजच ‘दै. लोकमत’ मधील बातमीनुसार बारामती येथे ‘रेमडेसिविर’च्या पंधरा रुपयाच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटीमाॅलचे द्रावण घालून तीच बाटली पस्तीस हजार रुपयांना विकणारी टोळी पकडली आहे. म्हणजेच माणूस आयते पैसे मिळविण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे ‘विकृत’ दर्शन आहे….
ज्यांनी ही माणूसकीला काळीमा फासणारी कृत्य केली आहेत, त्यांना यथावकाश शासनाकडून व परमेश्वराकडून शिक्षा मिळेलच. मात्र या त्यांच्या कृत्यामुळे ज्यांचे हकनाक जीव गेले, त्यांचा काय दोष होता? या कोरोनामुळे मानवजातीचे जे नुकसान झालंय, ते भरुन निघायला अनेक वर्षे लागतील. आत्ता ही दुसरी लाट जाईपर्यंत आपण सर्वजण काळजी घेऊयात. पुन्हा चांगले दिवस येतील, हे कोरोनाचं मळभ आता परतीच्या मार्गावर आहे. तोपर्यंत आपण वाट पहात, घरातच बसू.
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
१८-४-२१.
Leave a Reply