अवध नगरीचा राजा कुरसेन नावाप्रमाणेच अतिशय क्रूर होता. राज्यातील जनतेवर त्याने अनेक अन्याय-अत्याचार तर केलेच शिवाय शेजारील देशावर अनेकदा आक्रमणे करून तेथील राजा व प्रजेला जेरीस आणले. सत्तेबरोबरच तो संपतीचा भुकेला होता. त्यामुळे एकेका सुवर्णमुद्रेसाठी तो हिंसाचार करायला मागेपुढे पहायचा नाही. संपत्तीचे त्याचे हे वेड वरचेवर वाढतच होते. अवध नगरीच्या बाहेरच रस्त्याला लागून असलेल्या एका झोपडीत एक साधू रहात होता. अखंड ईश्वराचे स्मरण व गोरगरिबांना अडचणीच्या वेळी मदत एवढेच त्याचे ध्येयकार्य होते. त्यामुळे अनेकजण त्याच्या दर्शनाला येत व त्याचा उपदेश ऐकून जात. एके दिवशी सायंकाळी एक श्रीमंत गृहस्थ त्या साधुची कीर्ती ऐकून तेथे आला. त्याने साधूमहाराजाचे दर्शन घेतले व जाताना त्याने एक सुवर्णमुद्रा साधुच्या पुढे ठेवली.
निरीच्छ वृत्तीचे साधू महाराज त्याला म्हणाले, मला सुवर्णमुद्रा नको. तूच कोण्या गरजू माणसाला दे. त्यावर तो श्रीमंत गृहस्थ म्हणाला की मी तुम्हाला ती श्रद्धेने दिली. त्यामुळे तुम्हीच तिचा योग्य विनियोग करा. थोड्या वेळातच रस्त्यावरून राजा क्रुरसेनाची स्वारी येत होती. बरेचसे सैनिक त्याचाबरोबर होते. राजा क्रुरसेन स्वतः हत्तीवर अंबारीत बसला होता. राजाचा हत्ती झोपडीजवळ आला तसा तो साधू झोपडीबाहेर आला व त्याने त्याला दिलेली सुवर्णमुद्रा राजावर फेकून मारली. ती राजाच्या डोक्याला लागून अंबारीत पडली. ते पाहून राजा खूपच संतापला. तो खाली उतरला व त्याने त्या साधुला त्या कृत्याचा जाब विचारला. त्यावर साधू राजाला म्हणाला, मी मुद्दामच तुला सुवर्णमुद्रा फेकून मारली. कारण धनाचा तू लोभी आहेस त्यासाठी तू अनेकांवर अत्याचार केलेस म्हणून तुला ती सुवर्णमुद्रा देत आहे. ते ऐकून राजा अधिकच संतापला व त्याने साधूला पकडून ठार मारण्याचा सैनिकांना आदेश दिला. मात्र साधू अतिशय शांत होता.
राजाबरोबर असलेल्या प्रधानाला त्या साधुची योग्यता माहीत होती. त्यामुळे त्याने लगेच राजाला साधूमहाराजांना पकडू नये अशी विनंती केली. कारण मनात आणले तर त्या साधुची राजाचा सर्वनाश करायची तयारी होती. प्रधानाने राजाला समजावून सांगितल्यावर राजालाही साधूच्या दिव्यत्वाची प्रचिती आली व त्याने साधूचे पाय धरले. त्या वेळी साधूने त्याला संपत्तीसाठी हिंसाचार न करण्याचा सल्ला दिला व तो प्रमाण मानून राजा तेथून माघारी गेला.
Leave a Reply