कोण होते भगवान धन्वंतरी?
आज धनत्रयोदशी. आजच्या दिवशी धनाची पूजा करावी असे म्हणतात. वास्तविक पाहता संपत्तीची पूजा लक्ष्मीपुजनाच्या दिवशी करण्याची प्रथा आहे. मग आजच्या दिवशी नेमकी कुठल्या धनाची पूजा करणे अपेक्षित आहे?? याचे उत्तर म्हणजे आरोग्याधनाची!! कारण आजच्या दिवशीच समुद्रमंथनातून ‘धन्वंतरी’ या आरोग्यरत्नाची प्राप्ती झाली.म्हणूनच आजचा दिवस हा आम्ही सारे वैद्य ‘धन्वंतरी जयंती’ म्हणून साजरा करतो. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने यावर्षीपासूनच हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून घोषित केला आहे ही अतिशय समाधानाची बाब.
भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे आद्यप्रवर्तक होत. त्यांना ‘शल्यतंत्र’ (Surgery) या शाखेचे प्रमुखदेखील मानले जाते. समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या या रत्नाचे वर्णन पुढीलप्रमाणे आले आहे – घननीळ वर्णाची ही देवता चतुर्भुज असून त्यांनी शंख, चक्र, जलौका व अमृतकुंभ धारण केले आहेत.यातील चक्र हे आयुध रोगांच्या नाशाचे प्रतीक आहे. शंखध्वनी हा भारतीय संस्कृतीने पवित्र मानला आहे. वातावरणशुद्धी, मानसिक स्थैर्य व शांतते करता हा नाद उपयुक्त आहे. शंखभस्मासारख्या कल्पाच्या माध्यमातून आयुर्वेदीय चिकित्सेत शंखाचा वापर होतो.जलौका म्हणजेच जळू ही रक्तमोक्षण व पर्यायाने आयुर्वेदातील पंचकर्माचे प्रतिनिधित्व करते. अमृतकुंभ म्हणजेच दीर्घायुष्य. आयुर्वेदीय चिकित्सेने दीर्घायुष्य प्राप्त होते असे येथे सुचविले आहे.
हरिवंशाच्या पहिल्याच पर्वात अशी कथा आली आहे की भगवान विष्णूंनी धन्वन्तरीना असा वर दिला की; द्वापारयुगात जेव्हा विष्णु कृष्णस्वरुपात अवतरतील तेव्हाच काशी अधिपती दिवोराजाच्या रुपात धन्वन्तरीदेखील अवतरतील व आयुर्वेदास अनन्यसाधारण महत्व येईल!! या वराप्रमाणेच काशीराज धन्वाच्या पुत्राच्या स्वरुपात भगवान धन्वन्तरी अवतरले. या दिवोदासाने वाराणसीची पुनर्स्थापना करून नालंदा,विक्रमशिलेसारखी विश्वविद्यालये नावारुपास आणली.या ठिकाणी संपूर्ण जगातून हजारो विद्यार्थी ज्ञान मिळविण्यास येवू लागले.मात्र बख्तियार खिलजीसारख्या यवन आक्रमकाने ही विश्वविद्यालये उध्वस्त केली. ही विद्यापीठे इतकी प्रचंड होती त्यांची ग्रंथालये जळण्यासाठी काही महिन्यांचा काळ लागला!! अशा आक्रमणांमुळे आयुर्वेदाचा अतोनात ह्रास झाला….हा या देशाचा इतिहास आहे.
काशीराज दिवोदासाने केवळ विद्यापीठे स्थापन केली असे नाही तर त्याने सुश्रुतासारख्या अनेक शिष्यांना स्वतः शिकविले. ’सुश्रुतसंहिता’ हा धन्वन्तरी संप्रदायाचा ग्रंथ मानला जातो.
आजच्या दिवशी धन्वंतरीच्या प्रतिमेची वा मूर्तीची पूजा करून धने-गुळाचा नैवेद्य दाखवावा व आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या आयुरारोग्यासाठी तसेच आयुर्वेदाच्या पुनरुत्थानासाठी प्रार्थना करावी.आपणा सर्वांस; खास करून माझ्या सर्व वैद्य बंधू-भगिनींना धन्वंतरी जयंतीच्या आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या अनंत शुभेच्छा!!
ओम् धं धन्वन्तरये नमः|
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply