धन्य तो एकलव्य, जीवन ज्याचे दिव्य
इतिहास घडवी भव्य, कौरव पांडवा संगे ।।१।।
साधा होता भिल्ल, शरीर संपदा मल्ल
धनुर्विदेचे शल्य, त्याच्या अंगी होते ।।२।।
जन्मता धनुर्धारी, बनोनी शिकारी
हिंस्र जनावरे मारी, अचूक नेम मारूनी ।।३।।
पाहोनी भक्ष्य, होवूनी दक्ष
देवूनी लक्ष, शिकार करी ।।४।।
गुरूच्या होता शोधात, तीच त्याची खंत
पूर्णता नसे ज्ञानात, गुरूविना ।।५।।
शोधता आला आश्रमी, कौरव पांडवाचे मुक्कामी
प्रसन्न झाला चित्ती ।।६।।
गुरू द्रोणाचार्य, महान ते आचार्य
अद्वितीय त्यांचे कार्य, महाभारतामध्ये ।।७।।
कौरव पांडवाचे गुरू, धनुर्विद्येत तरबेज करू
कुणी न त्यांचे हात धरू, ही इच्छा द्रोणाची ।।८।।
कौरव पांडव मेळाव्यांत, बसता द्रोण मध्यभागांत
एकलव्य येई तेथ, अभिवादन करी गुरुला ।।९।।
इच्छा प्रदर्शिली विद्येची, धनुर्धारी बनण्याची
द्रोणास गुरू करण्याची, एकलव्याने ।।१०।।
बघूनी एकलव्याची स्फूर्ती, द्रोणास हर्ष होती
कौतुके आशिर्वाद देती, गुरू द्रोणाचार्य ।।११।।
विद्या माझी क्षत्रियासी, परी तू भिल्ल असशी
कसे शिकवू मी तुजसी, द्रोण विचारी ।।१२।।
गुरुचरणा खालची माती, एकलव्य घेई हाती
हाच माझा गुरू असती, आशिर्वाद मागी द्रोणासी ।।१३।।
मानूनी गुरू द्रोणा, घेवूनी त्यांची प्रेरणा
जाई निघोनी वना, एकलव्य ।।१४।।
घेवूनी चरणाखालील माती, बनवी तयाची द्रोण मूर्ती
गुरू त्या प्रतीमे समजती, शिष्य होई एकलव्य ।।१५।।
नमन करूनी द्रोण प्रतिमेला, धनुर्विद्येचा सराव केला
मेहनत तो घेवू लागला, रात्रंदिनी ।।१६।।
करूनी गुरूचे चिंतन, एकाग्र करूनी मन
धनुर्विद्येचे ज्ञान, घेवू लागला ।।१७।।
गुरू समजोनी मूर्तीचे ठायी, धनूर्विद्येचे ज्ञान घेई
शिष्याचे प्रतीक होई, ह्या जगामध्ये ।।१८।।
नसता गुरू समोरी, ज्ञान संपादन करी
हीच असामान्यता खरी, एकलव्याची ।।१९।।
एकाग्र चित्तेचे फळ, हेच यशाचे बळ
समजोनी घ्यावे सकळ, विद्यार्थी जन हो ।।२०।।
कौरवा पांडवा संगे, द्रोण जाता त्याच मार्गे
अघटीत घटना होई गे, एकलव्याच्या वनांत ।।२१।।
गुरू मूर्ती समोरील चिंतनात, एकलव्याच्या एकाग्रतेत
अडथळा उत्पन्न होत, श्वानाच्या भूंकण्याने ।।२२।।
कौरव पांडवांची शिकारी कुत्री, भूंकू लागली एकलव्या वरती
थांबविण्या त्यांच्या भुंकण्याती, बाण सोडला त्यांचे वर ।।२३।।
अचूक वेध साधला, इजा न करी श्वानाला
बंद करी भूंकण्याला, मुखी बाण रोवूनी ।।२४।।
विस्मयीत झाले द्रोण, बघूनी त्याचे अचूक बाण
गुरू असावा ह्यांचा कोण, प्रश्न मनी पडला ।।२५।।
वंदन केले द्रोण चरणी, तुम्हीच माझे गुरू असूनी
विद्या शिकवली तव मूर्तीनी, चिंतन करिता तुमचे ।।२६।।
एकलव्याची वेध शक्ती, अर्जुनाहून सरस ठरती
मात करील त्याचे वरती, एकाग्रता शक्तीमुळे ।।२७।।
एकाग्रता हीच शक्ती, एकलव्याने जाणली युक्ती
करूनी गुरू मूर्तीवर भक्ती, साध्य केली धनुर्विद्या ।।२८।।
जर वाढेल हे तपसाधन, एकलव्य बनेल महान
धनुर्विद्येतील अजिंक्यपद, प्राप्त होईल त्यासी ।।२९।।
जाणता हे मर्म, विचार करी अधर्म
‘विद्येस बाधा’ हे कर्म, शोधू लागले द्रोण ।।३०।।
प्रसन्न आहे तूज विद्येवरी, माझे आशिर्वाद तुझेवरी,
परी तू गुरूदक्षिणा घ्यावी, खरी इच्छा करीती द्रोण ।।३१।।
उजवा अंगठा छाटूनी, गुरू दक्षिणा समजोनी
करावी तो मज अर्पूनी, द्रोण बोले ।।३२।।
निकामी झाला हात जाणून, अर्पण करी धनुष्य बाण
वंदन करुन गुरुद्रोण, एकलव्य गेला निघूनी ।।३३।।
एकलव्याची एकाग्रता महान, नियतीसी नव्हते मान्य
कर्ण अर्जूनासी मात करून, महाभारत बदलले असते ।।३४।।
एकलव्याचे जीवन, चमकती विज नभातून
एकाग्र चित्तेचे उदाहरण, देई करूनी जगाते ।।३५।।
शुभ भवतू
डॉ. भगवान नागापूरकर
५५८ – १६११८३
Leave a Reply