जगातील प्राचीनतम स्वास्थ्याचा वेध घेणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद! या आयुर्वेदात वर्णन केलेली आरोग्याची देवता म्हणजे धन्वंतरी! धन्वंतरी देवता म्हणजे देवांचाही फॅमिली डॉक्टर! भारतात सर्वात आनंदी क्षण आणणाऱ्या दीपावलीच्या सुरूवातीस येणारी ही धनत्रयोदशी. सुख-धन-आरोग्य संपन्नतेसाठी प्रार्थना करण्याचा हा दिवस. दीपावली हा सुख-शांती देणारा सण. धनत्रयोदशीस धनाची पूजा करून धनाच्या वृद्धीसाठी प्रार्थना जशी करतात तशीच धन्वंतरी जयंती निमित्त भगवान धन्वंतरीची पूजा करून आरोग्य नांदण्याची प्रार्थनाही केली जाते. सर्व वैद्य-डॉक्टरांच्या देवतेचा हा महत्वाचा दिवस. रोगांविषयी, औषधांविषयी तसेच आरोग्य प्राप्तीसाठीचे सर्व ज्ञान ज्याने भूतलावर दिले त्याचा हा वाढदिवस.
धन्वंतरी जन्माची कहाणी आपल्याकडे प्रसिद्ध आहे. देव व दानव यांच्या समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर आली त्यातील एक रत्न म्हणजे सर्व रोगनाशनार्थ एका हातात अमृत कलश घेऊन प्रकट झालेले भगवान धन्वंतरी. धन्वंतरींनी आपल्याकडील निरोगी राहण्याचे ज्ञान आयुर्वेदाच्या रुपाने आठ अंगांमध्ये विभागून शिष्यांना दिले व त्यातून निर्माण झाली आजची चिकीत्सा शाखा. ज्याला आपण ‘मेडिसीन’ म्हणतो. वैद्यकीय शाखेचे जनक म्हणून भगवान धन्वंतरींची ओळख आहे.
भगवान धन्वंतरी प्रकट झाले ते वैद्यकीय शाखा व त्यांची शस्त्रे घेऊनच. धन्वंतरींनी प्रकटताना एका हातात औषधी वनस्पतीचे अर्क, औषध, पातळ औषधे यांचे प्रतिक म्हणून अमृत कलश घेतला तर त्यांच्या दुसऱ्या हातात शंख आहे. शंखरुपाने सर्व वातावरणातील दूषितता दूर करून आरोग्यपूर्ण-शुद्ध-हवा मनुष्यास प्राप्त होऊन निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. धन्वंतरींच्या तिसऱ्या हातात आहे धार असलेले चक्र. चक्र हे शल्यचिकित्सा करताना लागणाऱ्या शस्त्राचे प्रतिक आहे. धन्वंतरींनी चौथ्या हातामध्ये ‘जळवा’ हा प्राणी आणला आहे. जळवा हा स्वत:ला यातना देऊन मनुष्याचा शरीरातील व्याधी कमी करणारा जीव आहे. रक्त दूषित झाल्यामुळे त्वचेवर होणाऱ्या असंख्य व्याधी तसेच रक्त शुद्ध करण्याचे बळ जळवांमध्ये आहे. ते त्याच्या रक्त शोषणाच्या गुणधर्मामुळे.
भगवान धन्वंतरींनी काय-बाल-ग्रह-उध्र्वाग-शल्य-दष्ट्रा-जरा-वृषान या आठ शाखा निर्माण केल्या. आज या आठ शाखांच्या उपशाखा होऊन अनेक डॉक्टर ‘पदव्या’ घेऊन समाजाचे आरोग्य राखत आहेत. धन्वंतरीच्या हातामधील जळवांचे विशेष सांगावसे वाटते. इंग्लंड मधील हॉवर्ड विद्यापीठाचा त्वचा रोग, रक्त गोठणे, कॅन्सर मधील सूजेवर तसेच काही मेंदू ज्वरातील रुग्णांवरही जळूद्वारे उपचार केले जातात. त्यासाठी वेगळी इमारत बांधण्यात आली आहे. तेथे जळवांचे पोषण, त्यांचे प्रजोत्पादन सर्व अतिशय व्यवस्थीतपणे करण्यात येते. याचा भारतीयांना अभिमान वाटावा तेवढा कमीच.
धन्वंतरींनी धारण केलेली ही आयुधे रोग नाशनार्थ वेगवेगळ्या रुपात वापरली जात आहेत.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply