जीवन म्हणजे ऊन पावसाचा खेळ. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे,…. ’ असे म्हटले जाते.
जेव्हा आपण आपल्या पेक्षा कठीण परिस्थिती मध्ये जगणाऱ्या लोकांना बघतो तेव्हा जे आपल्याला मिळाले ते किती चांगले आहे त्याची जाणीव होते. खरंच, कधीतरी अंतर्मनात झाकून बघा. जीवनाच्या प्रवासाला न्याहाळा, खूप काही आपल्या पदरात नशिबाने पडले आहे. कदाचित त्या वेळी त्याची किंमत समजली नसेल पण ज्यावेळी ती व्यक्ति, वस्तु.. आपल्यापासून दूर जाते तेव्हा त्याची किंमत आपल्याला समजते. असं का होते? कारण त्या व्यक्ति, वस्तु, प्रसंगाप्रति आदर न बाळगता, त्यात किती चुका आहेत हेच बघण्याची वृत्ती असते. ह्यामुळे त्या गोष्टी आपल्यापासून दूर जातात. ‘व्यक्ति मध्ये कमी काढत राहिले तर त्या व्यक्तीची कमी आयुष्यात कधी ना कधी अनुभवावी लागते’. हा नियम आहे. म्हणून नेहमी जे आपल्याला लाभले त्याचा सत्कार करा, आभार व्यक्त करा.
ह्या शरीररूपी गाडी मध्ये बसून हा प्रवास सुरू झाला. ह्या शरीराचे रोज आभार माना. जर हे शरीर स्वस्थ नसेल तर जीवनाचा प्रवास टुकू टुकू चालेल. पण शरीराची साथ असेल तर सर्व काही प्राप्त करणे सहज होईल. आपल्या प्रत्येक अंगांना रोज धन्यवाद करा. कारण ही आपली स्वतःची संपदा आहे. ‘health is wealth’ म्हटले जाते. स्वास्थ्य ठीक नसेल तर छोटी छोटी कामे ही कठीण वाटू लागतात. म्हणून रोज ह्या शरीराशी संवाद साधा. प्रत्येक अवयवांना प्रेमाचा स्पर्श द्या, त्यांच्या स्वस्थ होण्याने मी किती सुखी आहे हे स्वतःला समजवा. असे केल्याने शरीराचे सर्व अंग नीट काम करू लागतील. जसे एखाद्या कंपनीचा मालक जर प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जाऊन लहान मोठ्या सर्वांची काळजी घेत असेल तर ती कंपनी चांगली प्रगती करताना दिसते. तसेच शरीर ही आत्म्याची कंपनी आहे. आपण ह्या तनाची चांगली देखभाल केली तर आपल्या कार्याची गती वाढून सर्वोपरी विकास होऊ लागेल. म्हणून शरीराचे आपल्या जीवनातले महत्व समजून त्याची काळजी घ्यावी. रोज मनापासून ह्याचे आभार मानावे.
ह्या छोट्याशा आयुष्यात अनेक नाती, संबंध मिळाले. प्रत्येकाचे महत्व वेगळे. रोज सकाळी पेपर, दूध दरवाज्या पर्यन्त पोहोचवणाऱ्या पासून अगदी जवळची नाती (पती-पत्नी, मुलं .. ). ह्या सर्वांचे महत्व आहे. ‘एखादी व्यक्ति माझ्या जीवनात नसेल तर मला चालेल’ हा फाजील अभिमान बाळगू नये. कोणास ठाऊक आयुष्यात असा प्रसंग आपल्या समोर येईल की ज्याने त्या व्यक्तीची उणीव वारंवार मनाला टोचत राहील. म्हणून जे आणि जसे मिळाले त्याचा स्वीकार करा. आजच्या पिढीला आपलेच आई-वडील किती भुरसटलेल्या विचारांचे, अडाणी वाटतात पण लहान असताना त्यांनी ज्या हाल अपेष्टा सहन करून आपल्याला मोठे केले. स्वतःच्या तोंडाचा घास काढून आपल्याला भरवले. ह्या सर्व गोष्टी मुलं वेळेनुसार विसरत जातात. व ज्या थोड्या उणीव राहिल्या त्यांना मनामध्ये ठेऊन सतत दोष देत राहतात. हे कितपत बरोबर आहे हा प्रत्येकाने विचार करावा. जे लाभले त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करा. जितके धन्यवाद करू तितके धन्यवाद करण्याचे अनेक प्रसंग जीवनात येतील.
वस्तु, पदार्थ, प्रकृती सर्वांची आवश्यकता आपल्याला आहे. त्यांचा शिवाय आपले जीवन नीरस आहे. म्हणून त्यांना ही हृदयाच्या निर्मळ भावनांनी धन्यवाद. तसेच ज्या ईश्वराने वेळोवेळी आपल्याला मदत केली. जिथे सगळ्या आशा संपल्या होत्या अशा वेळी जीवन सुखांनी भरून टाकले अश्या त्या परम सत्येला धन्यवाद करायला विसरू नका. हा धन्यवाद मंत्र सतत करत राहिले तर कधीच दुःखाची झळ आपल्याला लागू शकणार नाही.
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply