नवीन लेखन...

धनुषकोडी आणि रामसेतू…

भारतात प्रत्येक ठिकाणी विविधता आहे. भारतात अशा काही जागा आहेत जिथे आजही माणूस आणि निसर्ग एकरूप होतो. जिकडे आजही काही रहस्य आहेत. तामिळनाडूच्या रामेश्वर जिल्ह्यातलं धनुषकोडी हे असंच एक गावं. ह्या गावाचा संदर्भ अगदी रामायणातील आहे. पण असं असलं तरी हे गाव १९६४ पर्यंत नंदनवन होतं. १९६४ साली आलेल्या वादळाने होत्याचं नव्हतं केलं आणि धनुषकोडी पुन्हा एकदा विस्मरणात गेलं. एका बाजूला बंगालचा उपसागर तर दुसऱ्या बाजूला हिंद महासागर अशा दोन्ही सागरांच्या मध्ये धनुषकोडी वसलेलं आहे. सुंदर किनारे आणि चौफेर असलेलं क्षितिज यामुळे त्याच्या सौंदर्यात एक वेगळीच भर पडते. असं म्हणतात की प्रभू श्री रामाने हनुमानाला इकडेच लंकेत जाण्यासाठी सेतू बांधण्याचा आदेश दिला. वानर सेनेने मग रामसेतूची सुरवात ह्याच धनुषकोडी पासून केली. ह्याच रामसेतूला याची देह याची डोळा बघण्यासाठी धनुषकोडीला एकदा तरी जायला हवं.

 

रामसेतू म्हणजे ज्याला एडम्स ब्रिज असं म्हंटल जाते. भारताच्या पामबन बेटापासून ज्याला रामेश्वर बेट असंही म्हटलं जाते त्याच बेटावरील धनुषकोडी ते श्रीलंकेच्या मन्नार बेटापर्यंत चुनखडीच्या दगडांची एक रांग आहे. ही रांग ५० किमी लांबीची असून ती मन्नार ची सामुद्रधुनी आणि पाल्क स्ट्रेटला वेगळं करते. इतकी समुद्रात खोल असून पण इथल्या पाण्याची खोली ही १ ते १० मिटर (३ ते ३० फुट) इतकीच आहे. ह्या छोट्या खोलीमुळे इकडून नौकांचं वहन करण्यात अडचणी येतात. इतिहासातील नोंदींप्रमाणे १५०० व्या शतकापर्यंत रामसेतू हा पाण्याबाहेर होता. त्यावरून चालत जाता येत असे. १४८० साली आलेल्या वादळामध्ये समुद्र आत शिरल्याने पाण्याखाली गेला असावा असं म्हटलं जाते.

 

हिंदू धर्माच्या रामायणात ह्या रामसेतू चा उल्लेख असून रामाने लंकेत जाण्यासाठी हा बांधला अस सांगितलं आहे. रामसेतू हा एकमेव स्थापत्यशास्त्राचा आणि रामायणाच्या इतिहासातील नोंदीचा एकमेव साक्षीदार आहे असं म्हटलं जाते. ह्यावर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की ह्याच्या दगडांच्या कार्बन तारखांवरून ह्याचं वय ७००० वर्ष आहे. हे वय रामायण ज्या काळात घडलं त्याच काळाशी मिळतं जुळतं आहे. आता हे मानवनिर्मित कसं आहे ह्याचा संदर्भ असा दिला जातो. इथली वाळू किंवा एक नैसर्गिक उंचवटा जो ह्या रामसेतू या खाली आहे. त्या उंचवट्या किंवा तिथल्या दगडांचं, मातीचं वय हे अवघं ४००० वर्ष आहे. म्हणजेच ज्या दगडांनी हा सेतू बनला आहे ते दगड दुसरीकडून कुठून तरी आणून त्यांची ब्रिजप्रमाणे रचना केली गेली आहे. म्हणजेच हा सेतू मानवनिर्मित आहे ह्यावर शिक्कामोर्तब होतो. आता हे दगड कसे आणले आणि हे काम कसं केलं गेलं असेल हे अजून गुलदस्त्यात आहे. पण संशोधकांच्या मते त्या काळी असा सेतू बांधणं हे अभियांत्रिकी, विज्ञान, स्थापत्यशास्त्र ह्याचा एक चमत्कार असेल ह्यात वाद नाही.

 

नासाच्या उपग्रहांनी जे टिपलं आहे तो ब्रिज किंवा सेतू हा नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. ह्याला दुजोरा देणारा अजून एक चमत्कार म्हणा वा नैसर्गिक रचना म्हणा इकडे आढळून येते. रामायणात सांगितल्याप्रमाणे समुद्रात टाकलेले दगड हे पाण्यावर तरंगत होते. वानारसेनेनी श्रीराम लिहुन टाकलेला प्रत्येक दगड हा तरंगायला लागला आणि त्यावरून मग वानरसेनेने लंकेत पाउल ठेवलं असं रामायण सांगते. तर असे तरंगणारे दगड असू शकतात का? ह्यामागचं विज्ञान बघणं हे महत्त्वाचं आहे. तरंगणारे दगड किंवा ज्याला प्युमाईस असं म्हणतात ते ज्वालामुखीच्या उद्रेकात तयार होतात. ज्वालामुखीतील आतला भाग प्रचंड दाबाखाली असून त्याच तापमान १६०० डिग्री सेल्सियस पर्यंत असते. जेव्हा हा ज्वालामुखी बाहेर येऊन हवेशी किंवा समुद्राच्या पाण्याशी संपर्क करतो तेव्हा पाण्याची वाफ तात्काळ होते. पण त्याच वेळी तापमानातील हा प्रचंड फरक लाव्ह्याला कोल्ड शॉक देतो. अचानक झालेल्या तापमानातील फरकामुळे लाव्हा तिथल्या तिथे फ्रोझन होतो. या प्रक्रियेत तयार झालेले गॅसचे बुडबुडे आतमध्ये अडकून राहतात. यामुळे ह्या दगडाला स्पंजसारखे बनवतात. काही प्युमाईसमध्ये हे बुडबुडे ९०% जागा व्यापतात. ह्या अडकलेल्या हवेमुळे किंवा रिकाम्या जागेमुळे ह्या दगडांची घनता प्रचंड कमी असते. इतकी कमी की आत व्यापलेल्या हवेमुळे हे दगड पाण्यात टाकल्यावर काही काळ तरंगतात. जेव्हा पाणी हळूहळू हवेची जागा घेतं तेव्हा हे दगड पाण्यात बुडतात. तो अवधी काही मिनिटांचा असू शकतो.

 

हे प्युमाईस किंवा तरंगणारे दगड ह्या परिसरात असून रामसेतूच्या वेळेस असे दगड वापरले गेले असण्याची खूप शक्यता आहे. ज्याला आपण एक भावनिक आणि धर्माचा रंग दिला तरी त्यात एक विज्ञान आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. ह्या ठिकाणी समुद्रम् प्रोजेक्ट आणण्याचा आधी विचार होता. ह्या ठिकाणी हिंदू धर्माच्या धार्मिक भावना असल्याने हा प्रोजेक्ट लांबणीवर पडला आहे. खरे तर ह्या रामसेतूमुळे इकडे नैसर्गिक कोरल तयार झाले असून समुद्रातील एक विश्व इकडे रहाते आहे. इकडे मानवाने हस्तक्षेप करून जर ह्या रामसेतूला धक्का लावला तर एक विश्व आपण उद्ध्वस्त करणार आहोत. त्यामुळे हा सेतू रामाने बांधला हे आत्ता सांगणं अगदी कठीण असलं तरी तो मानवनिर्मित आहे हे खरं आहे. तसेच तेथील खडक, सागररचना तसेच येथील जैवविविधतेचं जतन करण्याची गरज नक्कीच आहे. रामसेतूला फक्त धार्मिक आणि राजकीय चष्म्यातून न बघता त्यामागचं विज्ञान आणि त्याचं महत्त्व समजून घेतलं तर रामसेतूचं रक्षण आणि महत्त्व तसेच राहील ह्यात शंका नाही.

-विनीत वर्तक

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..