सोडत नसतो केव्हाही, निसर्ग आपुल्या मर्यादा,
चमत्कार करीत नसतो, नियमित चालतो सदा १
साधूबाबा महाराज कित्येक आहेत ह्या जगती
नांव घेवूनी प्रभूचे चमत्कार दाखविती २
अज्ञानाने भरलो आम्ही विश्वास वाटतो त्यांचा
चमत्कार दाखविण्यामध्ये हात नसतो प्रभूचा ३
तो महान असूनी क्षुल्लक त्यासी ह्या गोष्टी
प्रेमभावना घेण्या कशास पडेल कष्टी ४
नष्ट केला ईश्वर धर्म, ह्या साऱ्या भोंदूनी,
दु:खींचे शोषण करती वाम मार्गाने जावूनी ५
आम्ही केवळ भाविक, वेडे श्रद्धाळू असती,
जो आपल्या अकलेने, उपयोग त्याचा घेती ६
गंडे, दोरे, जादू – टोणा हे सारे थोतांड,
चूक मार्गाने जावून शोधत राहतो ब्रह्मांड ७
विश्वास साधूंवरी देवापेक्षाही जास्त
म्हणून चटकन लाभे किंमत त्याची स्वस्त ८
भाषा त्यांची ठरलेली, राहू, केतू, शनी
जर फारच भोळे असाल तर म्हणती झाली करणी ९
संकटाचा काळ सांगती तीन वर्षाचा
दु:ख जावुनी सुखी व्हाल, शब्द देती आशेचा १०
ह्यात काही नवे नसते, हे तर चक्र निसर्गाचे,
सुख दु:खाच्या घटना घडते घडणे चालते नित्याचे ११
विश्लेषण करीता कळेल, आम्हीच करितो घटना,
परि हिंमत नसते आमची फळ त्याचे घेण्या १२
आम्हास हवा इतर कुणी झेलण्यास त्या दु:खाते
शब्द दाखवूनी प्रेमळ लुटीत असतो धनाते १३
फरक पडत नसतो, आमच्या कर्म फळात,
त्यांच्या मंत्र – तंत्राने, सहन करतो समाधानात १४
भयग्रस्त असूनी मन, चिंतेत आम्ही असतो,
आधाराचा शब्द बोलूनी, आशा आम्हास दाखवीतो १५
पारखोनी घ्या खरा गुरु दूर रहा भोंदूपासून,
फरफटत जाल जीवनी मृगजळास नीर समजोनी १६
गुरु दाखवी मार्ग, तुमच्या आत्मशुद्धीचा,
त्यातच त्याला समाधान, संदेश देतो ईश्वराचा १७
जवळ असूनी दूर असतो, हेच सार ईश्वराचे,
भक्तीभाव ठेवा , यश मिळेल जीवनाचे १८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply