बरे झाले एकाअर्थी. त्यांना कोणीतरी जमीनीवर आणायलाच हवे होते. भारताच्या कागदी वाघांचा पतंग उगाचच भरार्या घेत होता आणि लोकांनाही मूर्ख बनवत होता. आम्ही जगातले सर्वोत्कृष्ट “क्रिकेटवीर” आहोत याचा आम्हाला माज होता. तो नेमका मकरसंक्रांतीच्या दिवशीच कांगारुंनी उतरवला.
जगातल्या सर्वात बलवान(?) आणि धनवान क्रिकेट खेळाडूंचा संघ आज
सॉलिड थोबाडावर आपटला. पहिल्या डावात एक दिवसही खेळून काढता आला नाही. विरुपैलवान भोपळ्यावरच आत गेले. भारतरत्न-इन-वेटिंग चं महाशतक अजूनही रुसलेलंच आहे. महाशतकाच्या प्रतिक्षेचं आता पावशतक होईल. हो, कारण जवळपास २० सामने झाले पण महाशतकाची महाप्रतिक्षा आहेच. आता थोड्याच दिवसात “भारतरत्ना”ची घोषणा होईल. तोपर्यंत तरी महाशतक होणार का?
जिथे यांचे तीनतेरा वाजले त्याच मैदानावर उरलेल्या २० षटकात वॉर्नरने शतक झळकावले आणि कांगारुंनी दीडशेच्या वेशीवर पोहोचून भारताला पुन्हा धू धू धूतलं. पाउण दिवसात एका संघाचे सगळे फलंदाज तंबूत जातात आणि उरलेल्या पाव दिवसात दुसरा संघ दीडशे दावा कुटून एकही विकेट देत नाही म्हणजे जरा जास्तच झालं.
बरं एवढं होउन सुधारतील तर ते भारतीय क्रिकेटवीर कुठले? दुसर्या डावात कांगारुंनी धावांचा डोंगर उभा करुनसुद्धा आमची हाराकिरी सुरुच. सामन्याच्या तिसर्याच दिवशी, अर्धा दिवसही संपला नसेल तर सर्वबाद १७१. हो आता दुसर्या डावात पहिल्या डावापेक्षा तब्बल १० धावा जास्त बनवल्या त्याबद्दल मेडल वगैरे द्यायलाच पाहिजे.
क्रिकेटमध्ये फलंदाजाला गडी म्हणतात ते अगदी सार्थ नाव आहे. दोन सामन्यात नामुष्की येउनही मिळालेल्या वेळेत सराव करण्याऐवजी गो-कार्टींगला जाणार्या कार्ट्यांना आता गड्याचीच कामं द्यायला पाहिजेत.
बघुया… मालिका ३-० ने हरतायत की ४-० ने. आणि हेही बघूया की हरल्यावर चप्पल-बूट खायला घरी येताहेत की तोंडं लपवायला कुठेतरी हवाई वगैरे बेटांवर मुक्काम करतायत.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply