फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत. कामे करीत असताना त्यांना आपोआपच व्यवहारज्ञानही प्राप्त होई; आणि त्यांची शरीरे सुदृढ बनत. धौम्य ऋषींच्या आश्रमातील सर्व शिष्यांत उपमन्यू, वेद आणि आरुणी हे तीन अत्यंत बुद्धिमान आणि आज्ञाधारक शिष्य गुरुजींचे फार आवडते होते. विद्येसाठी उपमन्यू जेव्हा आश्रमात होता, तेव्हा धौम्यांनी त्याच्याकडे गाई चारण्याचे काम सोपविले. या कामानिमित्त उपमन्यूला रानावनात, अरण्यात, इकडे तिकडे हिंडावे लागे. तेथील शुद्ध हवा, निर्मळ पाणी, यामुळे उपमन्यू थोड्याच दिवसांत चांगला धष्टपुष्ट दिसू लागला. एके दिवशी गुरुजींनी त्याला विचारले, “बाळ उपमन्यू, तू रानावनात वणवण हिंडतोस; उन्हाने, श्रमाने थकून जातोस; त्यामुळे खरे म्हणजे तू अशक्त व्हायला पाहिजेस. परंतु, तू तर दिवसेंदिवस चांगला धष्टपुष्ट होत चालला आहे, याचे कारण काय बरे?”
उपमन्यूने मोठ्या विनयाने उत्तर दिले, “गुरुवर्य, आश्रमात तर मी यथेच्छ खातोच; शिवाय गावात गेल्यावर भिक्षा मागून मिळेल ते पण मी मनसोक्त खातो, यामुळे.” त्याला मध्येच थांबवून आचार्य म्हणाले, “ छे! छे! हे तुझे करणे मुळीच बरोबर नाही. आश्रमात तुला पोटभर खायला मिळत असताना भिक्षा मागणे अगदी चुकीचे आहे. खरं म्हणजे, भिक्षान्न साऱ्या आश्रमाला मिळाले पाहिजे. आता येथून पुढे आश्रमात तर तुला भोजन मिळणार नाहीच; शिवाय मिळालेले सर्व भिक्षान्न तू मला आणून दिले पाहिजेस.” धौम्यांना उपमन्यूची परीक्षा घ्यावयाची होती. म्हणूनच त्यांनी अशी कठीण अट उपमन्यूला घातली.
उपमन्यू अत्यंत आज्ञाधारक शिष्य असल्यामुळे त्याने गुरुंची आज्ञा शब्दश: पाळली. त्यानंतर तो रोज काही न खाता पिता गाई घेऊन जाऊ लागला आणि संध्याकाळी परतल्यावर मिळालेले सर्व भिक्षान्न गुरुजींना देऊ लागला. असे कांही दिवस गेले; परंतु उपमन्यूच्या शरीरावर काहीही परिणाम झालेला नाही असे पाहून धौम्यांना मोठे आश्चर्य वाटले. एके दिवशी त्यांनी उपमन्यूला विचारले, “उपमन्यू, तू आश्रमात जेवत नाही. संध्याकाळी सर्व भिक्षन्न माझ्याकडे देतोस. तरीही तुझ्या शरीरावर काही परिणाम झालेला दिसत नाही.
आजकाल तू खातोस तरी काय?: उपमन्यूने खरे ते सांगितले. “आचार्य, त्या दिवसापासून मी गाईचे दूध पितो.
त्यामुळे माझी भूक तर भागतेच, शिवाय गाई चारण्याचे श्रमही नाहीसे होतात.” मनातून धौम्य उपमन्यूच्या खरे बोलण्यावर खूष झाले. पण बाहेरून मात्र कठोर होऊन ते त्याला म्हणाले, “बाळ उपमन्यू, ही तर अत्यंत वाईट गोष्ट आहे.
गाई आश्रमाच्या असल्यामुळे त्यांच्या दूधावर आश्रमातल्या सर्वांचा अधिकार आहे. तेव्हा माझ्या परवानगीवाचून गाईचे दूध पिणे, ही तर शुद्ध चोरी आहे.
येथून पुढे असे करू नकोस.”
उपमन्यूने गुरुंची ही आज्ञाही पूर्णपणे पाळली. दुसऱ्या दिवसापासून दूध पिणे त्याने सोडून दिले. असेच आणखी काही दिवस गेले. गुरूंना त्याने ‘मी आता काय खाऊ?’ असे कधीही विचारले नाही. धौम्य ऋषी आता हा काय करतो, यावर लक्ष ठेवून होते. उपमन्यू आता झाडाची पाने खाऊ लागला. परंतु झाडांच्या पानांनी पोट कसे भरणार? तो दिवसेंदिवस अशक्त होत चालला.
मात्र गुरुंची सेवा आणि गायी चारण्याचे काम यात मात्र त्याने कधी चुकारपणा केला नाही. परंतु हळू हळू काही विषारी झाडांच्या पानांमुळे त्याची दृष्टी मंद होऊ लागली; आणि पुढे तर तो पूर्णपणे आंधळा झाला. तेव्हापासून गाई चारायला नेणे त्याला मोठे कठीण होऊन बसले.
एके दिवशी नित्याच्या सरावामुळे त्याने गाई चारायला नेल्या खऱ्या; परंतु आंधळेपणामुळे परत येताना त्याला उशीर झाला. रात्र होऊन काळोख पडला.
आधीच अशक्तपणामुळे त्याच्या पायांत त्राण उरले नव्हते; त्यामुळे अडखळत, ठेचाळत, येता येता तो एका खोल, पडक्या अंधाऱ्या विहिरीत पडला. इकडे आश्रमात गाई परत आल्या तरी उपमन्यूचा पत्ता नाही, असे पाहून धौम्य काळजीत पडले. गाईही हंबरून वनाकडे चालण्याचा इशारा देऊ लागल्या.
धौम्य मुनींना अंतर्ज्ञानाने सर्व घटनेची जाणीव झाली. आपल्या प्रमुख शिष्यांना घेऊन ते उपमन्यूच्या शोधासाठी बाहेर पडले. बराच शोध करूनही उपमन्यूचा पत्ता लागेना. तेव्हा “उपमन्यू, तू कुठे आहेस?” असा पुकारा त्यांनी केला.
थोड्या वेळाने जवळच्याच पडक्या विहिरीतून “आचार्य, मी येथे आहे, विहिरीत.” असा उपमन्यूचा थकलेला आवाज आला. महर्षी धौम्य लगबगीने विहिरीजवळ गेले. सर्व कल्पना आलीच होती. ते म्हणाले, अश्विनीकुमारांची प्रार्थाना कर. त्यांचा मंत्र मी तुला शिकविलेला आहे. ते प्रसन्न झाले म्हणजे, तुझा सर्व त्रास दूर होईल.” उपमन्यूने प्रार्थना केली. गुरुंनीही उपमन्यूसाठी अश्विनीकुमारांची प्रार्थना केली व ते आश्रमात निघून गेले. त्या प्रार्थनेने अश्विनीकुमार उपमन्यूवर प्रसन्न झाले. त्यावेळी विहिरीत सर्वत्र प्रकाश पसरला व उपमन्यू बाहेर आला.
अश्विनीकुमार त्याला म्हणाले, “तुझी गुरूभक्ती, सेवा, निष्ठा व कर्तव्यप्रेम पाहून आम्ही प्रसन्न झालो आहोत. तुझ्यासाठी आम्ही ही मधूर फळे आणली आहेत; ही खाल्ल्याने तू सर्व त्रासांतून मुक्त होशील.”
उपमन्यू नम्रतापूर्वक त्यांना म्हणाला, “मी आपला अत्यंत ऋणी आहे.
आपली आज्ञा मोडणे उचित नाही. परंतु माझा नाईलाज आहे. गुरूला अर्पण केल्याशिवाय मी ही फळे खाऊ शकत नाही. मला क्षमा करा.” उपमन्यूची ती दृढ गुरूभक्ती पाहून अश्विनीकुमारांना अधिकच आनंद वाटला. ते म्हणाले, “तुझे शरीर दिव्य व बलवान बनेल, सर्व प्रकारची विद्या तुला प्राप्त होईल.” इतके म्हणून अश्विनीकुमारांनी उपमन्यूला स्पर्श केला आणि ते अंतर्धान पावले. त्या स्पर्शाबरोबर उपमन्यूच्या साऱ्या शरीरात चैतन्य खेळू लागले. हातात ती फळे घेऊन आश्रमाकडे तो धावत सुटला. गुरुजींच्या पाया पडून आपल्या अश्रूंनी त्याने धौम्यांचे चरण भिजवले. आचार्य धौम्यांनी त्याला प्रेमपूर्वक जवळ घेतले व सद्गदीत कंठाने त्याला ते म्हणाले, “ वत्सा, तुझी साधना आज पूर्ण झाली. अश्विनीकुमार तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत. सारे वेद, सारी शास्त्रे, सारे ज्ञान, विज्ञान यांची तुला आज प्राप्ती झाली आहे. ती फळे खाऊन टाक.” दुसऱ्या दिवशी उपमन्यू ज्ञानसंपन्न होऊन कृतज्ञतेने बाहेर पडला. त्याला निरोप देताना धौम्य ऋषींचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून गेले होते.
[ ‘बालसुधा’, पुस्तक ४ थे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. ३-७]
Leave a Reply