हल्ली फक्त भांडी आणि घरातील लादी पुसण्यासाठीच बाई कामाला लावतात. पण पूर्वी घरात लेकीसुना ही कामे करत असत. आणि काही प्रमाणात भांडी घासायला बाई यायची. भांडी घासणे ही सुद्धा एक कलाच आहे. याचे वर्गीकरण असे व्हायचे.मला वाटते की ही भांडी घासताना मनाचे चित्रण त्यात दिसून येते कदाचित यात काही तरी संबंध असावेत. ….
1) देवाची उपकरणे…. यात तांब्याचे ताम्हण. तांब्या फुलपात्र. पळी. तर निरांजने वगैरे.
2)यात घरातील माणसागणिक तांब्या फुलपात्र. पुजेची व पिण्याची भांडी चिंच लावून लावून राखेने घासून पुसून ठेवली जायची.जणू मनावरचे ताणतणाव. दडपण आणि मनातील गैरसमजाचे मळभ दूर केली पाहिजेत. पैकी देवाची उपकरणे घासताना मनात सेवेची भावना असते. आणि यातून समाधान मिळायचे. वाटायचे यात देवाचे आशीर्वाद मिळतील.पाणी पिणारे तृप्त होतील.
3) स्वयंपाकाची भांडी आणि जेवायची भांडी ही सगळी बाहेर अंगणात किंवा परसात. नारळाच्या काथ्या आणि राख हे घेऊन घसघसा घासताना एखाद्या सासुरवाशीणीच्या मनातील घुसमट बाहेर पडत असेल. किंवा एखाद्या कारणाने राग येतो पण तो कुणावरही काढता येत नाही म्हणून भांडी आपटून मलाही आवाज चढवता येतो. हे दाखवून देता येण्याचा उत्तम मार्ग…
4) लोखंडी तवा. कढई व पळी हे तर सर्वात जास्त प्रभावी माध्यम.. द्या द्या किती त्रास द्यायचा तो द्या पण मी हटणार नाही. जेवढी ताकद आहे तेवढा जोर लावून विटेने घासून सगळे डाग घालवले जातात तसेच पाठ न फिरवता तोंड कसे द्यायचे आणि आरोप. दोष कसे घालवायचे याचा वस्तुपाठच की नाही बघा.
भांडी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय नाही तर ऐश्वर्य असते संसाराचे. भांड्याने भरलेले स्वयंपाक घर पाहून तिचा जीव भांड्यात पडतो. भांडी काय काय आणि किती किती शिकवतात. चुलीवरची भांडी काळी होतात. घासताना त्रास होतो म्हणून त्यांना चिखलाचा पातळ थर देणे. संशोधन. कोणत्या भांड्यात किती प्रमाणात शिजवता येते याच्या अनेक प्रयोगांनी गणितात तज्ञ.. कोणत्या भांड्यात कोणते पदार्थ शिजवावे म्हणजे ते चांगले शिजतील. उदाहरणार्थ जाड बुडाच्या गुंडीत डाळी छान मऊसूत शिजतात. अशाच प्रकारे लहान तोंड असलेल्या भांड्यात भात. गव्हाच्या खिरी सारखे पदार्थ वगैरे इथे व्यवहारज्ञान. त्यामुळे ती सुगरण ठरते. नुसते घासणे पुसणेच नाही तर आकर्षक पद्धतीने घरात मांडली की येणारे जाणारे कौतुक करतात. म्हणजे प्रदर्शन आयोजित कसे करायचे व बक्षिस कसे मिळवायचे ही कलाकारी अंगी असणे. आणि आळीपाळीने येणाऱ्या प्रत्येक भांड्यावरील नांवे अनेक आठवणी जागी करतात हे वेगळेच…
यात काचेच्या भांड्यांना विषेश प्राधान्य दिले जायचे ते फक्त लोणच्याच्या बरण्या. कपबशी. आणि सट. अगदी घरातील मोठय़ा वयोवृद्ध माणसांची आणि लहान मुलांना कसे काळजीपूर्वक आणि मानाने वागवावे याची माणुसकी व नात्याला बांधून ठेवण्याचे संस्कार शिकवण्याची आदर्श शिक्षकाची भूमिका ही काचेची भांडी शिकवतात. आणि मुलींना एक नकळत उपदेश केला जातो की बाई ग शील चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखे असते. तडकले की सांधता येत नाही म्हणून जपून पाऊल पुढे टाकत जा.
धन्यवाद.
–सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply