जीवनात गुरूचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरूशिवाय माणूस घडूच शकत नाही. मातीच्या गोळ्याला जसा कुंभार आकार देतो, तसंच गुरूकडून शिष्याला घडवलं जातं.
जीवनात गुरू विविध रूपांत भेटतो. कधी दृष्य स्वरुपात तर कधी अदृष्य स्वरुपात.. दृष्य स्वरुपात तो आई, वडील, बंधू, गुरूजी, मित्र, साधू, योगी, महाराज, तपस्वी, इ. अनेक नात्याने संपर्कात येतो. अदृष्य स्वरुपात तो परिस्थिती, पर्यावरण, संकट, संधी, ग्रंथ, साडेसाती, इ. रुपात शिकवून जातो..
घरामध्ये आई-वडील गुरूस्थानी असतात. त्यांच्या शिकवणुकीवर व संस्कारावरच जीवनाचा पाया मजबूत होतो. शाळेत गेल्यावर शिक्षक शिक्षिका पाठ्यपुस्तकांशिवाय जगात कसं जगायचं? ते शिकवितात..
शालेय वाचनाबरोबरच अवांतर वाचनाने ज्ञानात भर पडते. फक्त शालेय शिक्षणाने, ‘पुस्तकातला किडा’ असणारा, व्यवहारी जगात जगायला असमर्थ ठरु शकतो.
जी थोर व्यक्तिमत्त्व होऊन गेलेली आहेत, ती सर्व गुरूसमानच आहेत. त्यांची चरित्रं वाचून, तो आदर्श समोर ठेवला तर जीवनात यश हे मिळणारच!!
जे आपल्याला प्रत्यक्ष गुरू लाभले, ते कायमस्वरूपी आपल्या ध्यानात असतात.. जेव्हा कधी आपली वाट चुकते, तेव्हा त्यांच्या फक्त स्मरणाने आपण पुन्हा योग्य मार्गावर येतो.. त्यांची शिकवण कधीही वाया जात नाही..
रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, सर्वपल्ली राधाकृष्णन, इत्यादी थोर व्यक्तींनी, त्यांचा आदर्श घ्यावा अशी जीवनात कामगिरी केलेली आहे.. त्यांना गुरूस्थानी मानून, जर त्यांच्या चांगल्या गुणांचं अनुकरण केलं तर आपलं जीवन नक्कीच सफल होईल..
जे देव देवता आहेत, त्या प्रत्येकांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्याला आदर्श मानलं तर आपलेही व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होऊ शकते. उदा. राम, रामाचं वैशिष्ट्य एकपत्नीचं. हनुमान, बलसामर्थ्याचं. सीता, पतिव्रतेचं. भरत, बंधूप्रेमाचं. शंकर, विष पचविण्याचं. श्रीगणेश, चौसष्ट कलांचं. अशा अनेक आदर्शांना समोर ठेवून जीवन समृद्ध होतं..
मनातले जे गुरू आहेत, ते डोळे मिटल्यावरही आपल्या मनचक्षूंसमोर उभे राहतात… जसं स्वामी समर्थांना मनात आणलं की, मांडी घालून बसलेले स्वामी समोर येतात व म्हणतात, ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!’ स्वामी विवेकानंदांचे नाव घेतले की, हाताची घडी घातलेले, करारी मुद्रेचे स्वामी डोळ्यासमोर येतात. लोकमान्य टिळकांचे नाव निघाले की, जन्मसिद्ध हक्क मिळविण्याची प्रेरणा मिळते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मरण झालं की, अंदमानच्या कारागृहात स्वतंत्र भारताचे स्वप्न साकारण्यासाठी, तेलाचा घाणा ओढणारे देशभक्त सावरकर आठवतात. अशा असंख्य गुरूजनांनी दाखवून दिलेल्या मार्गावर आपण जीवनाची वाटचाल केली पाहिजे…
मोठी माणसं गुरू असतातच, तसेच आपल्यापेक्षा वयाने लहान असलेलाही प्रसंगी, बुद्धीने गुरू ठरु शकतो. काव्य, शास्त्र, विनोद, साहित्य, कला या सर्व प्रांतातील गुरू आपल्याला ज्ञान देऊ शकतात. देणाऱ्यांचे हात हजारों…आपण किती आत्मसात करु इच्छिता, हे आपल्या पात्रतेवर अवलंबून असते..
आजच्या गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने, माझ्या पाच तपांच्या कालावधीतील, असंख्य ज्ञात व अज्ञात गुरूंना विनम्र अभिवादन!!!
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२३-७-२१.
Leave a Reply