नवीन वर्षाची सुरुवात झाली की, डायरी खरेदी करण्याची इच्छा मला होतेच. मग अप्पा बळवंत चौकात जायचं आणि अनेक दुकानाच्या काऊंटरवर मांडलेल्या डायऱ्यांवर नजर टाकायची व रविवारचं पूर्ण पान असलेली डायरी खरेदी करायची, असं कित्येक वर्ष घडलेलं आहे.
नोव्हेंबरच्या शेवटी नवीन वर्षाच्या डायऱ्या बाजारात विक्रीसाठी येतात. डिसेंबर अखेरपर्यंत त्यांची किंमत जास्त असते. जानेवारी सुरु झाला की, सवलतीच्या दरात त्या मिळू लागतात. जानेवारीच्या मध्यानंतर त्या अजून स्वस्त मिळू लागतात. नंतर मात्र त्यांची अवस्था केविलवाणी होते. जुनी झाल्यावर ती एक ‘महागडी वही’ होते.
डायरीचं मराठी भाषांतर हे ‘रोजनिशी’ असं आहे. रोजच्या घडामोडींची रितसर करुन ठेवलेली खाजगी नोंद एवढाच त्याचा माफक अर्थ आहे. पूर्वीची माणसं त्यांच्या चोपड्यांमध्ये मोडीलिपीत नोंदी करून ठेवत असत. नंतर उच्च शिक्षण घेतलेली माणसं रोजनिशी लिहू लागली. सदर नोंदीवरून त्या काळातील सामाजिक परिस्थिती कळून येते. डायरी लिहिल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. माझ्या वडिलांना डायरी लिहिण्याची सवय होती. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती जबरदस्त होती.
डायरी ही एक भेट देण्यासाठी उत्तम वस्तू आहे. वर्षातील प्रत्येक दिवस तुमची आठवण ‘ती डायरी’ त्या व्यक्तीला देत राहते. म्हणूनच पूर्वी मोठ्या कंपन्या व्यवसाय वृद्धीसाठी डायऱ्या भेट द्यायच्या. जेणेकरून त्या कंपनीचे नाव वर्षभर ग्राहकांच्या समोर राहिल.
नामवंत व्यक्तिमत्त्व माधव गडकरी यांच्या लेखामध्ये मी वाचलं होतं की, नवीन वर्षाची डायरी हाती आल्यावर पहिल्यांदा ते आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तीं व स्नेहींच्या जन्मतारखांच्या पानावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नोंदी करुन ठेवत असत, जेणेकरून त्यांना न चुकता त्या दिवशी शुभेच्छा देता येतील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण वर्षातून एकदाच येणाऱ्या या दिवशी जर त्या व्यक्तीचे विस्मरण झाले तर मनाला रुखरुख लागून रहाते. दोन शब्दांच्या शुभेच्छा दिल्याने नातं ‘चिरंजीव’ रहातं.
डायरीमध्ये प्रकार भरपूर असतात. पुठ्याची डायरी वर्षभर शाबूत राहते. प्लॅस्टीक कव्हरच्याही टिकाऊ असतात. एक्झिक्युटीव्ह डायरी सर्वात महाग असते. आता मोबाईलमध्येही नोंदी करता येऊ लागल्याने डायरी घेणारांचं प्रमाण घटले आहे. दरवर्षी मी एक डायरी घरी देखील देतो. त्यामधील पानं ही पदार्थांच्या रेसिपींनी भरलेली असतात. शिवाय काही आयुर्वेदिक औषधांची माहिती दिसते. नातेवाईकांचे फोन नंबर व त्यांचे बदललेले पत्ते जागोजागी दिसतात.
माझ्या लहानपणी मला डायरीचं फार आकर्षण होतं. मात्र नवीन वर्षाची डायरी कधी मिळाली नाही. जुन्या डायरीचाच नवीन वर्षात मी वापर करीत असे. मोठ्या भावाला मात्र कंपनीतून डायरी भेट मिळत असे. मी दहावीपासून डायरी लिहू लागलो. माझं अक्षर पहिल्या पासूनच मोठं, त्यामुळे कमी मजकुरातच पान भरुन जायचं. त्याकाळी मी रोज सकाळी उठून पर्वती चढायला जायचो. बरोबर मित्र असायचे. या नोंदी रोजच्या रोज सारख्याच होऊ लागल्या. नंतर रोज सारसबागेतील गणपतीला जाण्याचे सुरु झाले.
काॅलेजमध्ये असतानाही डायरी लिहित होतो. आजही त्या वाचताना ‘ते दिवस’ समोर येतात. कारण जे काही मनातलं असतं ते प्रामाणिकपणे त्यात उतरवलेलं असतं. ‘स्वप्निल जीवना’चं ते एक प्रतिबिंबच भासतं. ज्या गोष्टी कधीही प्रत्यक्षात येऊ शकणार नाहीत, त्या आत्मविश्वासाने शब्दबद्ध केलेल्या पानापानातून दिसून येतात…
काॅलेज संपल्यावर व्यवसाय सुरु केला. आता डायरीतील नोंदी या ग्राहकांच्या संपर्काच्या होत्या. त्यांचे फोन नंबर, पत्ते, इ. माहिती लिहिली जाऊ लागली. केलेली कामं, मिळालेलं मानधन, राहिलेली बाकी अशा नोंदींनी डायरी भरु लागली. आॅफिसमध्ये कोणी नामवंत व्यक्ती आल्याची, कामानिमित्ताने मुंबईला गेल्याची, राज्यसरकारचं पारितोषिक मिळाल्याची, एखाद्या प्रिमियर शो ला उपस्थित राहिल्याची नोंद होत राहिली. आजही त्या सर्व डायऱ्या जपून ठेवलेल्या आहेत. शेकडो ग्राहकांनी करुन घेतलेल्या कामाची नोंद पाहून, आपण त्या काळात इतकं काम केलं याचं आश्चर्य वाटतं.
एक रोटे नावाचे मित्र दरवर्षी न चुकता डायरी भेट द्यायचे. नंतर काही वर्षे प्राध्यापक आबा गायकवाड डायरी भेट देऊ लागले. एक रायरीकर नावाचा मित्र आहे, तो स्वतः ‘ज्ञानेश्वर डायरी’चा निर्माता आहे. तो दरवर्षी डायरी भेट देत असे.
कालांतराने व्यवसाय पहिल्यासारखा राहिला नाही. डायरीची पानं सुनीसुनी दिसू लागली. अलीकडच्या डायऱ्या बहुतांशी कोऱ्या राहू लागल्या. गेल्या वर्षीची डायरी कोरोनामुळे सॅनिटाईज न करताही स्वच्छ व संसर्गविरहीत राहिलेली आहे. आजच नवीन डायरीची खरेदी केली आहे. आशा करतो की, ती पुन्हा पहिल्यासारखी नोंदींनी भरुन जाईल….
– सुरेश नावडकर ३-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply