नवीन लेखन...

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग चार

शेतात पडलेली डायरी मला दिसली आणि न राहवून मी ती उचलली. डायरीची रया गेली होती. एकतर ती जुनी वाटत होती, पण पानांवर जागोजाग चिखलाचे, मातीचे डाग दिसत होते. त्यामुळे पानांवरचा मजकूर काहीसा अस्पष्ट झाला होता.

ही डायरी कुणी लिहिली होती, ती अशी शेतात कुणी आणून टाकली याचा काही अंदाज लागत नव्हता. विस्कटलेली पाने एकत्र करून मी वाचायचा प्रयत्न करू लागलो आणि हो, या डायरीतील पानांवर क्रमांक नव्हते. त्यामुळे पाने एकत्र करून वाचताना संदर्भ मागेपुढे होत होते. काही संदर्भ लागत नव्हते.
पण काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते. काहीतरी चुकल्याची जाणीव त्यातून व्यक्त होत होती.

मी वाचू लागलो.

माय चा चेहरा आठवला. दीनवाण्या बाबाच्या नजरेतला भकास भाव आठवला आणि हात पाय गळाठुन गेले. वाटलं, सगळं इथंच टाकावं आणि घरी जावं. माय च्या कुशीत शिरून रडावं, माफी मागावी आणि बाबाला जवळ घेऊन त्याला सांगावं, की बाबा उद्यापासून तू कुठं जायचं नाहीस. मी बघतो सगळं.
पण…

कुणीतरी मला हलवलं. “ए, चल ओत ते कॅन मधील दूध. तो बघ, सगळा मीडिया आपल्यावर कॅमेरा रोखून बसलाय. ए, चला लवकर ओता दूध. घोषणा द्या. आंदोलन पेटल्यासारखं वाटलं पायजेल.”

सगळ्यांबरोबर आपणही दूध ओतलं महामार्गावर. पांढरं शुभ्र, दाट आणि निर्भेळ.

दूध ओतलं. आंदोलन म्हणून. सरकारला जाग यावी म्हणून. भाऊंचं नेतृत्व किती खंबीर आहे, किती आक्रमक आहे, किती लोकप्रिय आहे हे दाखवायचं म्हणून. शेतकऱ्यांच्या, कामकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून. भाऊ आमदार झाले तर सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवतील, यासाठी त्यांना पाठिंबा म्हणून. आंदोलन केलं.

अशी कितीतरी आंदोलनं केली. पंधरा दिवसांपूर्वी भाऊंच्या शब्दासाठी, सगळ्या पोरांनी आपापल्या शेतातला विक्रीला तयार झालेला टोमॅटो काढून रस्त्यावर फेकून आंदोलन केलं. मिडियानं जबरदस्त दखल घेतली. आता सरकार शरण येणार अशा थाटात, सगळी पोरं मिशीवर हात फिरवत गावभर उंडारत होती.

महिन्यांपूर्वी कारखान्याला न्यायचा ऊस, ट्रॅक्टर फिरवून शेतातच चिपाडागत करून टाकला. नॅशनल मिडियानं आंदोलनाची दखल घेतली. सगळ्यांना वाटलं आता केंद्रातल्या सरकारचं काही खरं नाही. दर महिन्यादोन महिन्यांनी भाऊसाहेब आंदोलन करायला पोरांना भाग पाडत होते. कधी रस्त्यावर शेतातल्या ताज्या भाज्या फेकून. कधी वाहनांची जाळपोळ करून. कधी महामार्ग खणून ठेऊन. कधी रस्त्यावर झोपून, तर कधी चक्काजाम करून. पोरं आंदोलनात भाग घेण्यासाठी उत्साहानं पेटून उठत होती. अंगावर पोलीस केसीस घेत होती. मार खात होती. पण पोरं आंदोलन सोडत नव्हती. दोन वेळचा चहा नाश्ता, रात्री एकेक चपटी आणि मटण. एवढ्यावर भागत होतं. पण काहीतरी वेगळं घडतंय हे मला जाणवत होतं.

माय चं तेव्हा ऐकायला हवं होतं. ती सांगायची, शिकला सवरलास तर आता नोकरी बघ. नसेल तर शेतीकडे लक्ष दे. तेही नसेल तर दोन म्हशी आणखी घे कर्ज काढून आणि दुधाचा धंदा तरी कर. आम्ही आता म्हातारे झालो. पण ना माय चं ऐकलं, ना बाबाच्या डोळ्यातलं पाणी दिसलं. कसली झिंग चढली होती आपल्याला या आंदोलनाची? कोण तो भाऊसाहेब? त्याला मोठं करण्याकरता आपण काय काय गमावलं? मला माय ची सारखी आठवण येतेय. बाबाची आठवण येतेय. आता थांबायलाच हवं.

“तू काय अपोझिटला मिळालास की काय? आंदोलन सोडतोयस म्हणे. मला सोडून गेलास तर कुत्र्यासारखा मारून टाकीन. तुकडे तुकडे करून गुऱ्हाळात जाळून टाकीन. चल जा, उद्या सकाळी शेपूट हलवत ये कुत्र्यासारखा. नाश्ता गिळायला ये आणि नाही आलास तर…”

भाऊसाहेबांचा हा रुद्रावतार नवीनच होता. मान खाली घालून मी घरी आलो. माय ला सगळं सांगितलं. तिनं धीर दिला. म्हणाली, “असाच शहरात जा , काम धंदा बघ, आमची काळजी करू नको. तुझ्या भाऊसाहेबाला मी धडा शिकवीन इथं आला तर.” दोघांच्या पाया पडून हायवे वर आलो आणि दिसला त्या ट्रकला हात दाखवून मुंबईला आलो आणि सुटलो.

जवळच्या मित्राला फोन करून माय आणि बाबाला मुंबईला बोलावून घेतलं आणि धारावीच्या झोपडपट्टीत गुडूप होऊन गेलो. आता चहाची गाडी चांगली चालते. बाबा शांतपणे बसून असतो. कौतुकानं बघत असतो. माय च्या हातचा वडा, भजी खायला अनेक जण येतात. कोण नसेल तेव्हा माय डिवचते अधून मधून. “जाणारेस भाऊसाहेबकडे, आंदोलन करायला?” आणि मग एकच शिल्लक असलेला हलणारा दात दाखवत दिलखुलास हसते. मी विचार करतो.
आंदोलनासाठी दूध ओतून काय मिळवलं आपण? हिरव्यागार ताज्या भाज्या रस्त्यावर फेकून काय मिळवलं? ऊस जाळून, वाहनं पेटवून, रस्ते खणून काय मिळवलं? आपल्याला माय मुळं अक्कल आली, बाकीच्यांना कधी येणार अक्कल? आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो हे का समजत नाही? असे अनेक भाऊसाहेब किती पोरांचं आयुष्य वाया घालवतात. त्याहीपेक्षा आपण कुणाच्या तरी हातातलं खेळणं का बनतो? कधी संपणार हे नाशाकडे घेऊन जाणारं राजकारण?

काही सुचत नव्हतं. गावाकडे गेलो तर समजलं, भाऊसाहेबांनं अनेकांना गंडवून पोबारा केलाय, पोलिस त्याच्या शोधात आहेत. बाकीची पोरं कोर्टात खेटे घालतायत. त्यांचे आईबाबा भीक मागून पोट भरतायत. अनेकांनी शेती विकली. काही दारूत मेले.

मी घराकडे पाहिलं. घर मोडकळीस आलं होतं. हातातली डायरी केव्हा गळून पडली ते कळलंच नाही. माय आणि बाबाला घेऊन मी घर साफ करायला पुढे झालो.

डॉ. श्रीकृष्ण जोशी

९४२३८७५८०६

रत्नागिरी.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..