चित्रपटाच्या क्लायमॅक्सला मुख्यमंत्री जीवाजीराव शिंदे हे मंत्री मंडळाचा केलेला विस्तार पत्रकार परिषदेत सांगू लागतात, तेव्हा पत्रकार दिगू टिपणीसला मानसिक धक्का बसतो. त्याने केलेल्या कल्पनेच्या पलीकडचे प्रत्यक्षात घडताना पाहून तो तिरीमिरीत उठतो व मंत्रालयाच्या बाहेर पडतो.. रस्त्यावरील एक भिकारी त्याच्या समोर येऊन हात पसरतो.. दिगू भिकाऱ्याकडे एकटक पाहता पाहता हसू लागतो. भिकारीही त्याच्या हसण्यात सामील होतो आणि ‘समाप्त’ ची पाटी पडद्यावर झळकते.
४२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला अडीच तासाचा ‘सिंहासन’ हा चित्रपट पाहून, बाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांची मनस्थिती दिगू टिपणीस सारखीच होत असे.
अरूण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या कादबऱ्यांमधील काही निवडक प्रसंगांवरुन विजय तेंडुलकरांनी या चित्रपटाची पटकथा व संवाद लिहिले. दिग्दर्शन जब्बार पटेल यांचं तर संगीत हृदयनाथ मंगेशकरांनी दिलं. चित्रपटात ‘उषःकाल होता होता..’ हे एकच गाणं आहे, ते लिहिलंय सुरेश भट यांनी. सूर्यकांत लवंदे या छायाचित्रकाराने कृष्ण-धवल माध्यमातून, चित्रपटात सप्तरंग भरले.
ऐंशीच्या दशकातील सत्तेचं राजकारण दाखवताना दिग्दर्शकानं दिग्गज कलाकारांचा अप्रतिम वापर करुन घेतलेला आहे. हा चित्रपट आपण दिगूच्या चष्म्यातून पहातो. दिगू स्वतः एक पत्रकार आहे. बातम्यांचा मागोवा घेताना त्याला प्रत्येक मंत्र्यांसंबंधी बरीच माहिती असते. मुख्यमंत्री व अर्थमंत्री दिगूच्या मध्यस्थीने, कामगार नेता डिकास्टाची भेट घेतात. स्वतःची परखड मतं असलेला, डिकास्टा कुणालाच जुमानत नाही. शेवटी त्याचा अपघात होतो. मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चे बांधणी करण्यासाठी अर्थमंत्री इतर मंत्र्यांना आश्र्वासनं देऊ पहातात. मात्र मुरलेले मुख्यमंत्री बुद्धीबळाच्या चालीने सर्वांवर कुरघोडी करतात व चित्रपट संपतो..
या संपूर्ण चित्रपटात लक्षात राहतो, तो दिगू टिपणीस.. त्याचं शांतीवर प्रेम आहे, मात्र आईला तिच्याशी लग्न केलं तर पटणार नाही.. म्हणून तो थांबतो. आई गेल्यानंतर शांती असाध्य रोगाने आजारी पडते. ती बरी होईल या आशेने दिगू तिला भेटत राहतो, खर्च करतो. एक दिवस ती मरण पावते. दिगू हताश होतो. शेवटी मंत्री मंडळाचा विस्तार ऐकून तो मनाने खचतो व त्याचं मानसिक संतुलन बिघडतं…
या चित्रपटातील उपकथानक त्या काळातील स्मगलींगचे आहे. इर्शाद हश्मीकडे नाना पाटेकर व जयराम हर्डीकर हे स्मगलींगचे काम करीत असतात. जयराम हर्डीकरला हे काम सोडून साधं जीवन जगायचं असतं, मात्र ते होऊ शकत नाही. नाना त्याला गोळी घालून ठार मारतो..
बेचाळीस वर्षांपूर्वीचा हा राजकारणावरील चित्रपट, खरंच ‘माईलस्टोन’ आहे. ज्या काळात मराठी चित्रपट निर्मितीला वीस पंचवीस लाख रुपये लागत असत त्या काळात हा चित्रपट अवघ्या साडेचार लाखांत केलेला आहे. इतका कमी खर्च येण्याचं कारण असं की, यातील मान्यवर कलाकारांनी ‘फक्त एक रुपया’ मानधनावर काम केलं आहे. कारण या सर्व कलाकारांना माहिती होतं की, आपण एक अजरामर चित्रपट करीत आहोत, अशावेळी निर्मात्याच्या पाठीशी, आपण उभं राहिलं पाहिजे. या सर्व प्रथितयश कलाकारांनी आपल्या नाटकांच्या तारखा प्राधान्याने या चित्रपटासाठी देऊन ‘सिंहासन’ साकारला..
आज या चित्रपटातील निम्म्याहून अधिक कलाकार स्वर्गवासी झालेले आहेत. दिगू टिपणीस उर्फ निळूभाऊ फुले यांना जाऊन तर, एक तप पूर्ण झालं आहे…
नीळकंठ कृष्णाजी फुले यांनी १९३० ते २००९ या ७९ वर्षांच्या कालावधीत पन्नास वर्षे राष्ट्र सेवा दल, नाट्य व चित्रपटसृष्टीला वाहून घेतले. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या नाटकापासून ते नावारूपाला आले. ‘एक गाव बारा भानगडी’ यातील झेल्याअण्णा साकारल्यापासून त्यांनी १४० मराठी व १२ हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. हिंदीमधील त्यांचा पहिला चित्रपट होता ‘भयानक’.
निळूभाऊंना ७२, ७३, ७४ असा सलग तीन वर्षे महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. चोरीचा मामला, शापित, पुढचं पाऊल, जैत रे जैत, थापाड्या, सतीची पुण्याई, सोंगाड्या, हमाल दे धमाल अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी लक्ष्यवेधी भूमिका साकारलेल्या आहेत.
राजकारण गेलं चुलीत, सखाराम बाईंडर, सूर्यास्त, जंगली कबूतर, बेबी अशा अनेक नाटकांमधून प्रेक्षकांनी निळूभाऊंना मनसोक्त दाद दिलेली आहे..
१९७० साली ‘आर्यन’ थिएटरमध्ये ‘एक गाव बारा भानगडी’ चित्रपट पहाणारा मी, तीस वर्षांनंतर महेश टिळेकर निर्मित ‘अबोली’ या टेलिफिल्मच्या शुटींगसाठी निळूभाऊंचे फोटो काढत होतो.. त्यानंतर संजय सूरकर दिग्दर्शित ‘सातच्या आत घरात’ चित्रपटाचे स्थिरचित्रण करताना मकरंद अनासपुरेच्या वडिलांची भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे मी फोटो काढले.. ‘सासूबाईंचं असंच असतं’ या नाटकाच्या ५००व्या प्रयोगाला निळूभाऊंच्या हस्ते मी सत्कार स्विकारला.. धन्य झालो!!
हा कलाकार सर्वसामान्यांचा होता. हातात आलेलं नाईटचं पाकीट घरी न नेता, त्यांनी कित्येक गरजूंना तसंच दिलेलं आहे.. कारकिर्दीमध्ये अनेक निर्मात्यांनी त्यांच्या भिडस्त स्वभावाचा फायदा घेतलेला आहे. कधीही शुटींगला जाताना साध्या एसटीने प्रवास करणारा असा ‘डाऊन टू अर्थ’ कलाकार, पुन्हा होणे नाही…
आज १३ जुलै, निळूभाऊंचा स्मृतिदिन!! या ‘माणूस’ म्हणून थोर असलेल्या कलाकारास विनम्र अभिवादन!!
सातारला जाताना खंबाटकी घाट उतरल्यावर उजव्या हाताला ओळीने हॉटेल्स दिसू लागतात. त्यांपैकी एका हॉटेलसमोर नमस्कार करताना निळूभाऊंचा एक मोठ्ठा बॅनर दिसतो…त्या खाली लिहिलेलं आहे..’मोठा माणूस’
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१३-७-२१.
Leave a Reply