१९८९ सालातील गोष्ट आहे. बालगंधर्वला राजाभाऊंच्या नाटकाचा प्रयोग होता. पाचचा प्रयोग, आठ वाजता संपणार होता. मी विंगेत प्रयोग संपण्याची वाट पहात होतो. प्रयोग संपल्याची बेल वाजली, पडदा पडला. राजाभाऊ मेकअप रुममध्ये जाताना मी त्यांना भेटलो. त्यांना बिल देण्याविषयी विनंती करताना, मला मुलगा झाल्याचे मी सांगितले. राजाभाऊंनी मिळालेल्या पाकीटातून बिलाची रक्कम काढून हातावर ठेवली. आणि म्हणाले, ‘सुरेश, तुझी परिस्थिती मी जाणू शकतो, कारण मी देखील दोन हुंड्या व तीन बेअरर चेकचा, बाप झालेलो आहे.’ एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराने दिलेल्या त्या उत्तराने, मी भावनावश झालो.
राजा गोसावी हे ‘राजा’ स्वभावाचे, कलंदर व्यक्तिमत्त्व होते. आम्ही सदाशिव पेठेत रहात असताना एके दिवशी दारावरचा पडदा सारुन त्यांनी विचारलं, ‘नावडकर इथेच रहातात का?’ मी त्यांना पाहून आश्चर्यचकित झालो. ज्यांना लहानपणापासून पडद्यावर पाहिलं, ते ‘राजस व्यक्तिमत्त्व’ समोर उभं होतं. त्यांचं राम गणेश गडकरींच्या निवडक नाटकातील प्रवेशांचं, पोस्टर डिझाईन त्यांना करुन दिलं. तेव्हापासून आमचं ‘मैत्रीयुग’ सुरु झालं.
ते रहायचे मुकुंदनगर येथे. नाटकांचे प्रयोग अथवा चित्रपटाच्या शुटींग वरुन आले की, आम्हा दोघांना फोन करायचे. मग ठरल्यावेळी रिक्षाने ऑफिसवर हजर व्हायचे. पांढरा शुभ्र शर्ट व पांढरी शुभ्र पॅन्ट असा त्यांचा पोशाख ठरलेला असे. दारात रिक्षा थांबली की, राजाभाऊ हातात काळ्या रंगाचं पाऊच घेऊन, ऐटीत ऑफिसमध्ये प्रवेश करायचे. मग तास दोन तास गप्पा होत असत. मधेच उठून ते तंबाखूच्या पेस्टने, दंतमंजन करीत असत. पुन्हा एकदा चहाची फेरी झाली की ते रिक्षाने घरी जात असत. त्यांना कधीही, कुठेही पायी चालताना कुणीही पाहिलेलं नाही.
त्यांच्या गप्पांतून लहानपणापासूनच्या आठवणी कळायच्या. लहानपणी त्यांनी हाॅटेलात कपबश्यासुद्धा विसळलेल्या होत्या. मग नाटक कंपनीत छोटीमोठी कामं करता करता चित्रपटात प्रवेश झाला. मास्टर विनायक यांच्याकडे असताना, बेबी नंदाला सायकलवरुन शाळेत घेऊन जायचे. सुरुवातीला हिंदी चित्रपटात काम केले, नंतर मराठी चित्रपट. राजाभाऊ परांजपे यांनी त्यांच्यातला कलाकार ओळखला व ‘लाखाची गोष्ट’ मुळे ते सर्वत्र परिचित झाले. भानुविलास टाॅकीजमध्ये ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट चालू असताना, त्यातील हिरो, त्याच सिनेमाची तिकीटे विक्री करीत होता. ही जगभरात कुठेही न घडलेली ‘न भुतो न भविष्यती’ अशी घटना आहे.
राजाभाऊंची जोडी जयश्री गडकर यांच्यासोबत छान जमली होती. त्यांचा ‘अवघाचि संसार’ हा चित्रपट, सुपरडुपर हिट आहे. त्याचप्रमाणे उषा किरण, नलिनी चोणकर, सीमा, रंजना अशा अनेक अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केले आहे. दामुअण्णा मालवणकर यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ विनोदी कलाकारांकडून त्यांनी अभिनयातील बारकावे शिकून घेतले.
चित्रपटांपेक्षा त्यांना नाटकांमध्ये काम करणे अधिक पसंत असायचे. गडकरींच्या नाटकांतील विनोदी पात्रं ते लीलया साकारायचे. ‘सौजन्याची ऐशीतैशी’ या नाटकातील ‘नाना बेरके’ ही व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने अजरामर करुन ठेवलेली आहे. मी स्वतः या नाटकाचे अनेक प्रयोग पाहिले आहेत, प्रत्येक प्रयोगात त्यांनी दिलेल्या फक्त एका ‘लूक’वर प्रेक्षकांना मनसोक्त हसवलेलं आहे. ‘लग्नाची बेडी’ मधील गोकर्ण, त्यांनीच साकारावा!! त्यांच्या अनेक नाटकांची डिझाईन्स करताना मी त्यांचे फोटोसेशन केले आहे.
बारामतीला झालेल्या नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, तेव्हा त्यांचा फोटोग्राफर म्हणून मी सदैव सोबत होतो. शरद पवार यांची कन्या, सुप्रियाच्या लग्नाला राजाभाऊंना खास निमंत्रण होते, त्यावेळीही मी त्यांच्या सोबत होतो.
एकदा राजाभाऊंकडे सिनेअभिनेत्री शशिकला येणार होत्या. त्यांनी आम्हा दोघांना बोलावून घेतले. मी त्यांचे फोटो काढले. शशिकलाशी गप्पा झाल्या. ती भेट अविस्मरणीय ठरली.
राजाभाऊंना दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करायची होती. त्यातील पहिला विषय होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘जीवा महाल्या’चा! ज्यानं जीवावर उदार होऊन, औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी महाराजांना मदत केली होती. दुसरा विषय होता, अगस्ती ऋषींचा! या दोन्ही विषयांवर ते नेहमी भरभरून बोलायचे.
राजाभाऊंचं एक स्वप्नं होतं. ‘नटसम्राट’ मधील ‘अप्पा बेलवलकर’ साकारायचं. ते त्यांनी प्रत्यक्षात आणलंदेखील! विनोदी भूमिकेत ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं, त्या राजाभाऊंना, रसिकांनी ‘अप्पा बेलवलकर’च्या भूमिकेत अव्हेरलं.
राजाभाऊंना आम्ही दोघेही नेहमी सांगायचो, ‘राजाभाऊ, तुम्ही आत्मचरित्र लिहायला घ्या. त्यांनी प्रत्येकवेळी ते हसण्यावारी नेलं. ते म्हणायचे, ‘मी शंभरी गाठणार आहे, लिहू नंतर. आत्ता तर मी, रांगतोय.’
सुधीर भट यांच्या सुयोग नाट्य संस्थेने ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकाचे प्रयोग पुनश्च सुरु केले होते. राजाभाऊंना मुंबईतील एका प्रयोगाची तयारी करीत असताना मेकअपरुममध्येच, छातीत कळ आली. ताबडतोब त्यांना हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तोपर्यंत राजाभाऊंनी ‘एक्झिट’ घेतली होती.
त्यादिवशी मी सातारला गेलो होतो. मी वर्तमानपत्रात बातमी वाचली. त्यांचं अंत्यदर्शनही मला घेता आलं नाही.
राजाभाऊंची तीन मुलं. गिरीश, जगदीश व दिनेश. दोन मुलींपैकी शमा देशपांडेला पाहिलं होतं. गिरीशच्या मुलाच्या मुंजीचे फोटो मीच काढले होते. तेव्हा सर्व भेटले होते.
१९९८ साली राजाभाऊ गेल्यानंतर, घराचा एखादा मधलाच, भक्कम खांब नाहिसा झाल्यावर जी घराची जी अवस्था होते तशीच झाली. काही वर्षांनंतर मोठा मुलगा गिरीश गेला. काही वर्षांनी कोरोना काळात धाकट्या दिनेशची पत्नी गेली. काही महिन्यांनी स्वतः दिनेश गेला. कोरोनाच्या दिवसांत राजाभाऊंची मोठ्या सूनबाई, माझ्या ऑफिसात आल्या. त्यांनी ‘राजाभाऊं’वरती पुस्तक करण्याचा मनोदय सांगितला. तशी मला तयारी करायला सांगितली. काही महिन्यांनी त्याही गेल्याचं समजलं.
राजाभाऊंना जाऊन दोन तपं झाली. आता त्यांच्या आठवणी, माझ्या पिढीलाच ठाऊक आहेत. अलीकडच्या तरुण पिढीला, त्यांना युट्युबवरच पहावं लागेल. आम्ही देवाचे आभार मानतो की, त्यानं अशा दिग्गज कलाकारांशी आमची भेट घालून दिली. आज भले आमच्याकडे बॅंकबॅलन्स नसेल, मात्र राजाभाऊंच्या लाखमोलाच्या आठवणी ‘हृदयाच्या लाॅकर’मध्ये सुरक्षित आहेत.
राजाभाऊंच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२८-३-२२.
Leave a Reply