दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापूर येथे झाला.
महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना दत्ता धर्माधिकारी कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक वामनबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रोक्त गाणे शिकायला जात. ‘प्रभात फिल्म कंपनी’त त्यांना नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यांना ‘टाईमकीपर’ची ‘हजेरी मास्तर’ नोकरी मिळाली. ‘प्रभात’मध्ये त्यावेळी कुठल्याही कर्मचाऱ्याला चित्रपटात एखादी किरकोळ भूमिका करावयास सांगत.
काही मंडळी अगदी हौसेनं ती भूमिका करीत. हजेरी मास्तर असलेल्या दत्ताजींना १९३७ सालच्या ‘कुंकू’मध्ये नायिका शांता आपटे हिला लग्नासाठी दाखवण्यात येणाऱ्या एका तरुण मुलाचे काम देण्यात आले. नायिका शांता आपटे हिचा त्यावेळी इतका प्रचंड दबदबा होता की तिच्यासमोर दत्ताजी जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला व त्यांनी कॅमेऱ्या्समोरून एकदम पळ काढला. ते काम मग संकलन विभागात काम करणाऱ्या अनंत माने यांनी केलं.
कॅमेऱ्या समोरून घाबरून पळणाऱ्याे याच दत्ताजींनी पुढे ‘माणूस’मधील ‘कशाला उद्याची बात’ या गाण्यातल्या सारंगीयाचं व ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटातील सोपानदेवाचं काम अगदी निर्भयपणे केलं होतं. ‘संत ज्ञानेश्वर’च्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक राजा नेने यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री झाली. ‘प्रभात’मध्ये असल्यापासून दत्ताजींनी राजा नेने यांची धरलेली संगत ‘प्रभात’ सोडल्यावरही सुटली नव्हती. राजा नेने यांनी ‘प्रभात’बाहेरच्या दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांचे सहाय्यक म्हणून दत्ताजींनी काम केले होते. १९४७च्या ‘शादी से पहले’ या चित्रपटापर्यंत ते राजा नेने यांचे सहाय्यक होते. ‘मायाबाजार’ पासून दत्ता धर्माधिकांरींची दिग्दर्शक म्हणून ओळख झाली. त्यांनी स्वत:ची ‘आल्हाद चित्र’ नावाची चित्रपट काढणारी संस्था स्थापन केली. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. वि. बोकील यांच्या ‘गाठीभेठी’ या कथेवरून ‘आल्हाद’चा पहिला चित्रपट ‘बाळा जो जो रे’ निघाला. आशा भोसलेंच्या आवाजातलं ‘बाळा जो जो रे’ हे अंगाईगीत महाराष्ट्रातल्या घराघरात गेलं. ‘आल्हाद’चा पुढचा ‘स्त्री जन्माही तुझी कहाणी’ हाही चित्रपट खूप गाजला. त्याच्या यशामुळे हिंदीतील प्रसिद्ध निर्माते सरदार चंदूलाल शहा यांनी त्यांच्या ‘रणजित मूव्हीज’तर्फे औरत तेरी कहानी (भारतभूषण- निरूपा रॉय) हा चित्रपट काढला. आधीचे दोन्ही चित्रपट बाहेरच्या निर्मात्यांनी हिंदीत काढल्यामुळे यावेळचा म्हणजे पुढचा तिसरा चित्रपट ‘आल्हाद’ने मराठी व हिंदी दोन्ही भाषात काढायचं ठरवलं. चित्रपटाचे नाव होते – ‘चिमणी पाखरं’ (हिंदीत-नन्हे मुन्ने) याही चित्रपटाने रौप्यमहोत्सव केला.
१९५२ सालचा हा काळ म्हणजे ‘आल्हाद चित्र’चा ऐश्वर्याचा काळ होता. सर्वांचं भलं चिंतणाऱ्या धर्माधिकारींची नियत अतिशय चांगली होती. चित्रपटसृष्टीत शोधून सापडणार नाही असा प्रामाणिकपणाचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता. वेगळ्या विषयावरचा म्हणजे बहिऱ्याी-मुक्या मुलीच्या भावस्पर्शी कथेवरचा ‘अबोली’ हा सुंदर चित्रपट अपयशी ठरला. खादीचा पांढराशुभ्र शर्ट, पायजमा व टोपी घालणारे पुढाऱ्यादसारख्या पोषाखातले धर्माधिकारी चित्रपटसृष्टीतले वाटत नसत. चेहऱ्यावर कायम हास्य असणाऱ्याा धर्माधिकारींचे सर्वांशी जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध असत.
दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून दत्ता धर्माधिकारी यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply