दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म २३ जून १९४२ रोजी पंढरपूर येथे झाला.
जन्म पंढरपूरचा असला तरी जब्बार यांचे बालपण सोलापूरात गेलं. वडील रेल्वेत नोकरीला होते. त्यांना रेल्वेच्या क्वार्टर्समध्ये राहायला जागा मिळत होती. पण मुलांवर चांगले संस्कार व्हावे या हेतूने त्यांनी मोदीखाना नावाच्या चांगल्या वस्तीत जागा घेतली. तिथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होई. ‘कवि राम जोशी’ या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कवी रा. ना. पवार तिथे गणेशोत्सवात नाटक बसवायचे. त्यांच्या ओळखीमुळे अनेक साहित्यिक मंडळी तिथे भेट देत. जब्बार तेव्हा नगरपालिकेच्या शाळेत शिकत होते. त्याच्या घरासमोर मोठं पटांगण होतं. तिथे गणेशोत्सवातली नाटके होत. तिथे एका वर्षी आचार्य अत्रे यांच्या ‘मी उभा आहे’ नाटकात त्यांनी पहिल्यांदा काम केलं. जब्बार यांच्या घराच्या पडवीमध्ये गणपतीची स्थापना होई. जब्बारच्या वडिलांना घर दिल्यावर लोकांच्या लक्षात आलं की आपण यांना घर दिलं खरं. पण त्या घराच्या पडवीत नेहमी गणपती बसवतो आहे ते घर मुस्लिम कुटुंबाचं आहे. गणपती पडवीत कसा बसवायचा? पण जब्बारचे वडील धर्मातीत वृत्तीचे होते. त्यांनीच हा तिढा सोडवला. ते गणपती मंडळाच्या लोकांना म्हणाले, ‘‘गणपती बसवायला माझी काहीच हरकत नाही. पण तुम्हाला चालेल का बघा?’’ आणि मग त्या पडवीतच गणपती बसला. इतकंच नाही तर जब्बार यांचे वडील त्या मंडळात काम करू लागले. त्या काळी हिंदू-मुस्लिम बंधूभाव होताच. पण त्यांच्या भेदात संवेदनक्षमता नसण्याचा तो काळ होता. या अशा वातावरणात बालपणाचा काही काळ गेलेल्या जब्बारची सेक्युलर वृत्ती भक्कमपणे तयार झाली.
सातवी नंतर जब्बार सोलापूरच्याच हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये गेले. या शाळेत त्याच्यावर वाङ्मयीन आणि कलात्मक संस्कार झाले. पाठ्यपुस्तकाच्या पलिकडेसुद्धा शिकण्यासारखं बरंच असतं. कविता म्हणजे काय? मुक्तछंद कसा असतो? हे सारं त्यांना कळू लागलं. शाळेत त्यावेळी आचार्य अत्रे यांचं ‘उद्याचा संसार’ बसवायची तयारी सुरू झाली. जब्बार यांना त्यात काम करायची इच्छा होती. पण जास्त उंची असल्यामुळे स्त्री भूमिका साकारण्याची संधी नाही आणि आवाज पातळ असल्यामुळे पुरुष भूमिकाही नाही. शिक्षकांचा नकार त्याला फार लागला. शाळेत असताना जब्बार कविता करायचा. त्याच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या होत्या.याच सुमारास कविवर्य बा. भ. बोरकर एका कविसंमेलनासाठी सोलापूरला आले होते. कुणीतरी त्यांना सांगितलं- ‘एक नवीन मुलगा आहे. त्याला कविता म्हणायची आहे.’ जब्बार यांनी निसर्गावर त्यावेळी केलेली त्याची कविता म्हटली. बोरकर फारच खूष झाले. ‘या मुलात एक चांगला कवी दिसतोय…’ असं म्हणून त्यांनी त्याचं कौतुकही केलं. या वयात जब्बार यांनी वक्तृत्वकला ही चांगली जोपासली. त्यांचे कलागुण ओळखूनच विविध गुणदर्शनाच्या शिक्षकांनी त्याला ‘तू स्वतंत्र काहीतरी कर बघू!’ असं सांगितलं. जब्बार यांना ते आव्हानच होतं. त्यांनी एक लोकनाट्य बसवलं. त्यात त्याने स्वतः निवेदकाचं काम केलं. शिवाय बाकीच्या पात्रांच्या मूकाभिनयाच्या वेळी त्या पात्रांचे आवाजही जब्बार यांनीच काढले. हे नाटक फार यशस्वी झालं. लेखकाला जे अभिप्रेत असतं ते दिग्दर्शक सार्याय नटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. दिग्दर्शक सांगेल तसं सारं नट ऐकतात. दिग्दर्शकाला झालेलं त्या संहितेचं अर्थबोधन त्याच अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं काम तो करतो, ही नवी दृष्टी, विचार, जब्बारला या नाटकापासून मिळाला. त्याच्यातल्या सक्षम दिग्दर्शकाची ही सुरुवात होती.
दरम्यान जब्बार यांच्या वडिलांची दौंडला बदली झाली. जब्बार यांना सोलापुरात आत्या वा काकाकडे राहावं लागणार होतं. पण सुदैवाने त्यांच्या वडिलांचे मित्र असलेले त्याचे शिक्षक श्रीराम पुजारी यांनी जब्बार आमच्याकडे राहिल असं सुचवलं. जब्बार त्यावेळी नववीत होते. पुजारी सरांशी त्याचं फार सख्य होतं. पुजारी हे कर्मठ ब्राह्मण घराणं. पण श्रीराम पुजारी हे सेवादलातून आले असल्यामुळे त्यांच्यावर वेगळ्या वळणाचे संस्कार झाले होते. त्यांची साहित्याची, संगीताची व नृत्याची जाण अतिशय उत्तम होती. पुजारी सरांच्या घरात जब्बार तीन वर्षे राहिले. या काळात सरांच्या घरात त्याच्यावर जे संस्कार झाले ती त्याची आयुष्यभर पुरणारी पूजा होती. पुजारींच्या घरी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, व्यंकटेश माडगूळकर अशी दिग्गज साहित्यिक मंडळी त्याचप्रमाणे संगीताशी संबंधित लोकांचा वावर असे. या मंडळींना चहा देणे, आंघोळीचे पाणी काढून देणे… अशी कामे जब्बार करीत असे. रात्री या मंडळींच्या साहित्यिक गप्पाटप्पा, कविताचं वाचन हे तिथल्या कोपर्याकत बसून तो ऐकत असे. सारी ज्ञानेंद्रिये सजग ठेवून जब्बार ते सारं टिपत होता. उत्तम गाणं त्याला तिथे कळलं. नाद म्हणजे काय? लय कशी असते? नाटक लिहिणं म्हणजे काय असतं? साहित्यातील नवे प्रवाह, नवकथा, नवकविता… या सार्या् गोष्टी त्याला तिथं कळल्या. चांगलं बघणं आणि चांगलं निवडणं याचं ज्ञान पुजारी सरांकडून त्याला आयुष्याच्या महत्त्वाच्या घडणीच्या काळात मिळालं.
मॅट्रिकनंतर जब्बार दयानंद कॉलेजमध्ये शिकू लागले. तिथे त्यांना अभिव्यक्तीच्या संधी मिळत गेल्या आणि त्याचबरोबर त्यांच्या कलेवरच्या निष्ठाही वाढत गेल्या. तिथे ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वेड्याचं घर उन्हात’ या नाटकांबरोबरच ‘माणूस नावाचं बेट’ हे वेगळ्या धर्तीचं प्रायोगिक पातळीवरचं नाटकही जब्बार यांनी बसवलं होतं. त्यानंतर पुण्यात पुढच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बी. जे. मेडिकल महाविद्यालयात जब्बार यांनी प्रवेश घेतला. पुण्यात त्याच्या कलागुणांना मोठा वाव मिळाला. पहिल्याच वर्षी ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ हे नाटक बसवायला पी.डी.ए.चे वासुदेव पाळंदे आले होते. जब्बारचं त्यातलं काम पी.डी.ए.च्या भालबा केळकरांनी पाहिलं. त्यांनी जब्बार यांना बोलावून घेतलं. तिथे त्यानं ‘सत्तावनचा सेनानी’मध्ये काम केलं. डॉ. श्रीराम लागूंशी तिथंच त्याची ओळख झाली. त्यांच्यामुळे नाटकाची संहिता व एकूण नाट्यतंत्र यावर गांभीर्याने चर्चा करण्याचा भाग सुरू झाला. पुण्यात याच सुमारास ‘पुरुषोत्तम करंडक’ ही महाविद्यालयांसाठी असलेली एकांकिका स्पर्धा सुरू झाली. त्यात जब्बार यांच्या ‘बळी’ला अनेक पारितोषिकं मिळाली. डॉ. लागूंमुळे ‘रंगायन’च्या विजया मेहतांशी ओळख झाली. त्यांच्यामुळे जब्बार यांचा नाटकाकडे बघण्याच्या दृष्टीत आणखी फरक पडला. साहित्यावरील चर्चेमुळे ‘आविष्कार’ खूप वेगळा वाटत असे. ‘रंगायतन’मध्ये जब्बार यांना खूप शिकायला मिळाले. भालबांनी बसवलेल्या ‘तू वेडा कुंभार’मधल्या भूमिकेसाठी जब्बारला राज्यस्तरावरचं अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं आणि अभिनेता म्हणून जब्बार सर्वांना माहित झाले. हे सारं करताना वैद्यकीय शिक्षण चालूच होतं. विजय तेंडुलकरांचं ‘अशी पाखरे येती’ हे नाटक जब्बारच्या अभिनय व दिग्दर्शनामुळे खूप गाजलं. या नाटकाने एक इतिहास घडवला.
जब्बार यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण होऊन तो बालरोगतज्ज्ञ होऊन त्यांच्या बरोबरच डॉक्टर झालेल्या पत्नीबरोबर दौंड येथे प्रॅक्टिस करू लागले. पुण्याशी संपर्क राहावा म्हणून जवळच्या दौंडची त्यांनी प्रॅक्टिससाठी निवड केली. पुढे वादग्रस्त ठरलेलं विजय तेंडुकरांचं ‘घाशीराम कोतवाल’ हे जब्बार यांनी दिग्दर्शित केलेलं अतिशय महत्त्वाचं नाटक! ‘घाशीराम’ मुळे कलाविश्वाबत जब्बार यांचा दबदबा निर्माण झाला तर ‘अशी पाखरे येती’पासून शब्द-सूर-अभिनय याची लय त्यांना सापडली. १९७४ साली प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे हे जब्बार यांना भेटले. त्यांच्या मनात जब्बार यांना घेऊन चित्रपट करावा असं होतं. जब्बार यांची रंगमंचीय कारकीर्द बघणार्या फुटाण्यांना जब्बार यांना ‘दृश्य’ कळतंय याची खात्री असल्यामुळेच ते पैसे घेऊनच जब्बार यांच्याकडे आले होते. जब्बार यांनी सुरवातीला त्यांना हे माध्यम माझं नाही, मला त्यातलं काही कळत नाही असं सांगितलं. पण फुटाणे आपल्या निर्णयावर ठाम होते. ते म्हणाले, ‘अहो तुम्हाला ते कळेल. मी त्यावर खर्च करायला तयार आहे.’ मग विजय तेंडुलकरांकडून स्क्रीप्ट लिहून घ्यायचं ठरलं. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखे दिग्गज कलाकार प्रथमच आमने सामने आणणारा ‘सामना’ चित्रपट तयार झाला. चित्रपट गाजला. त्यातली ‘रंगमहाली रंगबाजीचा डाव आला रंगाला’ ही लावणी जब्बार यांनीच लिहिली होती. जब्बार यांचा पहिलंच दिग्दर्शन असलेला ‘सामना’ बर्लिनच्या महोत्सवात भारताची प्रवेशिका म्हणून गेलेला पहिलाच चित्रपट होता.
गो. नि. दांडेकरांच्या ‘जैत रे जैत’ या कादंबरीवरून काढलेला त्याच नावाचा चित्रपट म्हणजे चित्रपटातली सांगितिक वाटली. १९७९ सालचा ‘सिंहासन’ हा अरुण साधूंच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांवरून काढलेला राजकीय विषयावरचा पहिला मराठी चित्रपट होता. राजकारणातल्या सशक्तांमधले सत्तेसाठी होणारे आपापसातले छुपे व उघड संघर्ष त्याचप्रमाणे त्यांनी अशक्तांचा टूल म्हणून केलेल्या खेळी हा सर्व भाग त्यात अतिशय समर्थपणे दाखवला होता. त्यानंतर स्त्री अस्मितेचं भान देणारा ‘उंबरठा’ (१९८२), सृजनशील दिग्दर्शकीय हाताळणीमुळे अनेक पुरस्कार मिळवणारा ‘एक होता विदूषक’ (१९९२) आणि राष्ट्रीय एकात्मतेचा नर्गीसदत्त पुरस्कार मिळवणारा ‘मुक्ता’ (१९९४) हेही चित्रपट खूप गाजले. ‘आगे से राईट’ या हिंदी चित्रपटाचे लेखन आणि ‘मुसाफिर’ (१९८६) या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. मल्याळी सुपरस्टार मामुटी याला घेऊन काढलेला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ (२०००) हा इंग्रजी चित्रपट त्याला पुरस्कार मिळाल्यावर अन्य काही भारतीय भाषांमध्ये तो डब झाला. जब्बारनी महाराष्ट्र (१९८६), मी एस एम (१९८७), पथिक (१९८८), लक्ष्मण जोशी (१९८९), इंडियन थिएटर्स (१९९०), फोर्टस् ऑफ महाराष्ट्र (१९९१), डॉ. बाबासाहेब आंबेडकर(१९९२) अशा काही लघुपटांचीही निर्मिती केली. आपल्या सर्वच चित्रपटांत उत्तम दर्जाची गुणवत्ता ठेवणार्या, जब्बारना प्रसिद्धी वलयाचं तंत्र उत्तम अवगत आहे. त्यांची कलाकृती लोकांपर्यंत येण्यापूर्वीच तिचा बोलबाला होऊन प्रेक्षकांची उत्सुकता ताणलेली असते. जब्बार हे आधुनिक रंगभूमीचे प्रतिनिधी समजले जातात. पण त्यांना बालगंधर्व ते बाबूजी या थोर मराठी परंपरेची जाणीव आहे. आपल्या मिठ्ठास वाणीने आणि वृत्तीने श्रोत्यांवर छापा पाडून त्याचं मन जिंकणारा, कवितेवर प्रेम करणारा, राजकीय व कलाक्षेत्रातील असंख्य व्यक्तींशी चांगले स्नेहसंबंध असणारा, सरकारदरबारी प्रचंड वजन असणारा, दिलीप-राज यांचा प्रेमी आणि नाटक-चित्रपटांवर असंख्य पुरस्कारांची खैरात झालेला हा महान दिग्दर्शक आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मधू पोतदार
पुणे.
Leave a Reply