दिग्दर्शक संजय भाकरे यांचा जन्म ९ एप्रिल १९६२ रोजी नागपूर येथे झाला.
सतत नाविन्याच्या शोधात. प्रेक्षक रंगभूमीकडे यावेत यासाठी सातत्याने धडपडणारे व नागपूरला व्यावसायिक रंगभूमी सुरू व्हावी यासाठी प्राणांतिक धडपड करणारे रंगकर्मी संजय भाकरे हे नागपूरचे असून विदर्भाच्या रंगभूमीवर गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून कार्यरत आहेत. ‘घोटभर पाणी’ या प्रेमानंद गज्वी यांच्या एकांकिकेने त्यांना प्रकाशात आणले. १९८१ साला पासून त्यांचा राज्य नाट्य स्पर्धा सातत्याने सहभाग राहीला असून एक होत कुरुक्षेत्र, बोन्साय, दिस इज फॉर रिअल, कॉल मि कॅप्टन रॉबर्ट, डाय बिफोर डेथ, आज अचानक, केस नं 99, रूपक, कल्या या लागल्या जीवा, टू ईज कंपनी, मिच्च काळ्या रंगमधे बुडवून, बाप हा बापच असतो, अनिमा (प्रथम आलेले नाटक, अंतिम साठी निवड) ही गाजलेली नाटके अधिक चाळीस हुन अधिक नाटके स्पर्धेत सादर केली आहेत.
संजय भाकरे यांनी अनेक नाटकातून साकारलेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाची अनेक पदके त्यांना लाभली आहे. अघोर, ओली रे माती, मन उदास आदी चित्रपटातून त्यांनी भूमिकाही केल्या आहेत. संजय भाकरे यांचे स्वत:चे ‘संजय भाकरे फाउंडेशन’ असून संजय भाकरे फाऊंडेशन च्या माध्यमातून दर महिन्यात एकांकिका सादर करण्याचे व त्या माध्यमातून नवीन कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम व नाटकांच्यासाठी नवी पिढी तयार करण्याचे कार्य २०१४ पासून सुरू आहे. सुरुवातीला प्रेक्षक नाटकाला येत नाहीत तर आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, ही भूमिका स्वीकारली. गच्चीवरचे प्रयोग सुरू केले. शेकडो एकांकिका विनामूल्य निरनिराळ्या वसाहतीत जाऊन केल्या. निरनिराळ्या चौकांत पथनाट्ये केलीत. जनसंपर्काच्या भरवशावर सभासद नोंदणी सुरू केली.
संजय भाकरे यांची ४५०० सहितांची स्वतःची लायब्ररी असून बारा वर्ष सतत वेगवेगळ्या झाड़ीपट्टी नाटकात भूमीका करुन त्याचे २०० हुन अधिक प्रयोग केले आहेत. संजय भाकरे यांनी पुट्टपती येथे श्री सत्य साईबाबा यांच्या समोर दरबारात “कृष्ण उद्धव” हे नाटक १५० कलावंतांना घेऊन सादर केले होते. तसेच गजानन माझा शेगावीचा, राणा शिर्डी साईबाबा ही महानाट्य सादर केली आहेत.
त्यांनी सात वर्षे रंगभूमी परीनिरीक्षण मंडळावर काम केले असून त्यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्ड)च्या कमिटीवर सदस्य म्हणूनही काम केले आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट अधिकारी पुरस्कार तसेच स्मिता पाटील स्मृती पुरस्कारदेखील त्यांना प्राप्त झाला आहे. शिक्षक सहकारी बँकेत ते उपमहाव्यवस्थापक पदावर कार्यरत देखील आहेत. विदर्भातील अनेक शाळांच्यात हस्ताक्षर सुधार प्रकल्प चालू असून संजय भाकरे त्यांना हस्ताक्षर दुरुस्त करण्यात ते मदत करत असतात.
संजय भाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply