नवीन लेखन...

दिग्दर्शक सुनील सुकथनकर

दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांचा जन्म ३१ मे १९६६ रोजी कराड येथे झाला.

सुनील सुकथनकर हे मूळचे कराडचे. पुण्यातल्या बीएमसीसीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शन शिकण्यासाठी पुण्यातल्याच ‘एफटीआयआय’मध्ये प्रवेश घेतला. सुनील सुकथनकर यांनी रंगकर्मी म्हणूनही काम केलं. त्यांनी अनेक नाटकं, पथनाट्यं लिहिली आणि दिग्दर्शित केली. सुमित्रा भावे ‘बाई’ हा लघुपट तयार करत असताना त्यांच्या मुलीमुळे – सतीमुळे – सुनील यांची सुमित्रा भावेंशी ओळख झाली. त्यातून पुढे १९९५मध्ये या दोघांनी ‘दोघी’ हा पूर्ण लांबीचा पहिला मराठी चित्रपट तयार केला. तिथून त्यांच्या संयुक्त दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. आत्तापर्यंत या दोघांनी १४ चित्रपट, पन्नासहून अधिक लघुपट आणि चार टीव्ही सीरिअल्स तयार केल्या आहेत. या सर्व कलाकृतींचं लेखन सुमित्रामावशींनीच केलं आहे. ‘दोघी’मध्ये सोनाली कुलकर्णी आणि रेणुका दफ्तरदार यांनी काम केलं होतं. सामाजिक बंधनांच्या जाचात सापडलेल्या दोन बहिणी आणि त्यांची आई (उत्तरा बावकर) यांची करुण कहाणी या चित्रपटातून भावे-सुकथनकर यांनी मांडली होती. सुरुवातीच्या काळात सर्वांना सोनाली कुलकर्णीच्या अभिनयक्षमतेची ओळख करून देणारा चित्रपट म्हणून ‘दोघी’चं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्यानंतर या दोघांनी ‘जिंदगी जिंदाबाद’ (१९९७) हा हिंदी चित्रपट तयार केला. एका तरुणाच्या आयुष्यात घडलेल्या सत्यघटनेची पार्श्वभूमी या चित्रपटाला होती. तेव्हा एड्सची समस्या खूप चर्चेत होती. या सिनेमानं एड्सच्या आणि तद्अनुषंगिक समस्यांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला होता. हा सिनेमा फार चालला नाही; मात्र एखादी समस्या किंवा एखादा आजार/विकार घेऊन सिनेमा करण्याची या जोडीची परंपरा या सिनेमापासून सुरू झाली होती असं म्हणता येईल.

त्यानंतर २००२मध्ये या जोडीचे एकदम दोन चित्रपट आले आणि दोन्ही खूप गाजले. या दोन्ही चित्रपटांनी भावे सुकथनकरांना नाव मिळवून दिलं. हे चित्रपट होते ‘दहावी फ’ आणि ‘वास्तुपुरुष’! ‘दहावी फ’ हा सिनेमाही पुण्यातल्या सत्य परिस्थितीवर आधारित होता. वृत्तपत्रात आलेल्या एका बातमीनं सुमित्रामावशींचं लक्ष वेधून घेतलं होतं. एका शाळेतल्या दांडगाई, उनाडक्या करणाऱ्या मुलांनी शाळेचं केलेलं नुकसान स्वतः काम करून भरून दिलं आणि त्यासाठी एका शिक्षकांनी कसा पुढाकार घेतला अशी ती बातमी होती. याच बातमीवरून प्रेरणा घेऊन ‘दहावी फ’ हा सिनेमा तयार करण्यात आला होता. यात अतुल कुलकर्णीनं केलेली शिक्षकाची भूमिका गाजली. यातल्या निमिष काठाळे, वृषसेन दाभोळकर या मुलांनीही चांगलं काम केलं होतं. हा चित्रपट चिल्ड्रन फिल्म सोसायटीनं काढावा यासाठी भावे-सुकथनकर सोसायटीकडे गेले होते. मात्र या चित्रपटाची कथा त्यांच्या ‘मार्गदर्शक तत्त्वां’त बसत नसल्यानं त्यांनी या चित्रपटाची निर्मिती करायला नकार दिला होता. नंतर भावे-सुकथनकर यांनी मित्रांकडून पैसे गोळा करून हा चित्रपट तयार केला. ‘विचित्र निर्मिती’ची सुरुवातही हीच. या चित्रपटाला चांगलं यशही मिळालं. या जोडीचा अजून एक चित्रपट म्हणजे ‘वास्तुपुरुष’! हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं तयार केला होता. साठच्या दशकातल्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या सामाजिक स्थित्यंतराचा उभाआडवा छेद अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटात घेण्यात आला आहे. भास्कर देशपांडे (सिद्धार्थ दफ्तरदार/महेश एलकुंचवार) या मुलाची ही कथा आहे. विपरीत परिस्थितीला तोंड देत तो डॉक्टर कसा होतो याची ही कथा आहे, पण ही कथा भास्करसोबतच त्याच्या आईची – सरस्वतीचीही (उत्तरा बावकर) आहे असं मला वाटतं. काळाची पावलं ओळखणारी, खोट्या वतनदारीला न भुलणारी, स्वतः कष्ट करून पैसे कमावण्यावर विश्वास असलेली, गुप्तधनासारख्या भाकडकथांना थारा न देणारी, मुलानं डॉक्टर होऊन जनतेची सेवा केली म्हणजेच आपली वास्तू ‘शांत’ होईल असं मानणारी यातली ‘सरस्वती’ ही मराठी रूपेरी पडद्यावर आलेल्या सर्वांत ताकदवान, प्रभावी पात्रांपैकी एक आहे. उत्तरा बावकरांनी ही सरस्वती खूप जबरदस्त उभी केली आहे. या चित्रपटाची प्रत्येक फ्रेमन्फ्रेम, प्रत्येक संवाद सारं कसं जमून आलं आहे! ग्रामीण महाराष्ट्रातल्या परिस्थितीत १९६० ते १९९० या काळात फार प्रचंड फरक पडला नव्हता हेच याचं कारण असावं. या चित्रपटात मोठ्या भास्करच्या भूमिकेसाठी सुमित्रामावशींनी चक्क महेश एलकुंचवार यांनाच घेतलं. या चित्रपटातला त्यांचा वावर सुखद आहे. स्वतः एलकुंचवार ग्रामीण महाराष्ट्रातल्या सामाजिक जीवनावर, स्थलांतरावर, स्थित्यंतरावर किती तरी खोल, अर्थपूर्ण असं लिहीत आले आहेत. त्यांची ‘त्रिनाट्यधारा’ याचंच प्रतीक आहे. त्या तिन्ही नाटकांचा आणि या ‘वास्तुपुरुष’चा एक जैव संबंध आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. ‘वास्तुपुरुष’मधली एलकुंचवारांची उपस्थिती हे त्यांचं दृश्य प्रतीक आहे. या चित्रपटातले सगळेच कलाकार जबरदस्त होते. सिद्धार्थ दफ्तरदार, महेश एलकुंचवार आणि उत्तरा बावकर यांच्या जोडीला सदाशिव अमरापूरकर, रवींद्र मंकणी, अतुल कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार, रेखा कामत, तुषार दळवी, निमिष काठाळे अशी सगळी नामवंत मंडळी होती. नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात जामगाव इथल्या शिंदेशाही वाड्यात या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं.

या दोन्ही सिनेमांनंतर भावे-सुकथनकर जोडीला एका परीनं आपल्या सिनेमाचा आत्मा गवसला असं म्हणायला हरकत नाही. मग २००४ मध्ये आलेल्या ‘देवराई’नं यावर शिक्कामोर्तबच केलं. तोपर्यंत मराठी सिनेमात अपवादानंच आलेली स्किझोफ्रेनियासारखी समस्या यात हाताळण्यात आली होती. अतुल कुलकर्णीनं यात साकारलेली शेषची भूमिका ही त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकांपैकी एक आहे. या चित्रपटालाही अनेक पुरस्कार मिळाले. मग २००६मध्ये या जोडीचा ‘नितळ’ हा आणखी एक नितांतसुंदर चित्रपट आला. आपल्याकडं सामाजिक समस्या होऊन बसलेल्या कोडासारख्या विषयावर या सिनेमात फार सुंदर मांडणी होती. ‘वास्तुपुरुष’मध्ये भावे सुकथनकरांनी एलकुंचवारांना कॅमेऱ्यासमोर उभं केलं होतं, तसं या सिनेमात त्यांनी विजय तेंडुलकरांना रूपेरी पडद्यावर आणलं. या सिनेमात देविका दफ्तरदार, अमृता सुभाष यांच्या भूमिका अप्रतिम होत्या. श्रीरंग उमराणींनी दिलेल्या संगीताबरोबरच यातली गाणीही खूप मस्त आणि वेगळी होती.

‘अंधाराच्या भोवती आहे नवा नवा अंधार’ हे गाणं विशेष गाजलं. याच वर्षी या जोडीचा ‘बाधा’ हा चित्रपटही आला. मात्र तो सर्वत्र प्रदर्शित होऊ शकला नाही. मी स्वतः तो चित्रपट महोत्सवातच पाहिला. अमृता सुभाष आणि राजेश मोरे यात प्रमुख भूमिकांत होते. धनगर समाजातल्या अंधश्रद्धेचा विषय यात हाताळण्यात आला होता. फलटण परिसरातल्या धनगर तांड्यांवर जाऊन केलेलं चित्रीकरण हेही याचं वैशिष्ट्य. या जोडीचं चित्रपट निर्मितीतलं सातत्य या काळात वाखाणण्याजोगं होतं, कारण २००९मध्ये त्यांचे दोन चित्रपट आले. एक होता ‘एक कप च्या’ आणि दुसरा ‘घो मला असला हवा!’ यातला ‘एक कप च्या’ मला वैयक्तिकरीत्या आवडला होता. माहिती अधिकार कायदा नुकताच आला होता. कोकणातला एक कंडक्टर या कायद्याची मदत घेऊन आपला लढा कसा लढतो याची ही छान, प्रेरणादायी गोष्ट होती. यात किशोर कदमनं त्या कंडक्टरची भूमिका अफलातून केली होती. एलकुंचवारांना आणि तेंडुलकरांना रूपेरी पडद्यावर झळकवल्यानंतर या चित्रपटात भावे सुकथनकरांनी कमल देसाईंना रूपेरी पडद्यावर आणलं होतं. त्यांनीपण आजीची भूमिका खूप गोड केली होती. शिवाय अश्विनी गिरी, देविका दफ्तरदार, ओम भुतकर, पर्ण पेठे आदी कलाकार यात होते. दुर्दैवानं हा सिनेमा फार चालला नाही. ‘घो मला असला हवा!’ या सिनेमाद्वारे या जोडीनं प्रथमच आपली मळवाट सोडून विनोदाची कास धरली. कोकणच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही एक हलकीफुलकी कॉमेडी होती. राधिका आपटेचा हा पहिला चित्रपट. यातला नर्मविनोद उत्कृष्ट होता, पण याही चित्रपटाला मर्यादित प्रतिसाद लाभला. नंतर २०११ मध्ये आलेला ‘हा भारत माझा’ हा चित्रपट तेव्हा देशात सुरू असलेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनानं प्रेरित होता. हा चित्रपट प्रयोगशील असला, तरी प्रेक्षकांनी त्याची फार दखल घेतली नाही. मात्र २०१३मध्ये आलेला ‘संहिता’ हा या जोडीचा एक उत्कृष्ट चित्रपट होता. या चित्रपटाची उत्कृष्ट पटकथा, रंगभूषा, संगीत यांचं कौतुक झालं.

पुढच्याच वर्षी म्हणजे २०१४मध्ये आलेला ‘अस्तु’ हा विस्मरणाच्या आजारावर आधारित चित्रपट होता. यातली प्रा. चक्रपाणींची भूमिका डॉ. मोहन आगाशे यांनी सुंदर साकारली आहे. एकूणच हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय असा अनुभव आहे. यातली इरावती हर्षेची भूमिकाही पाहण्यासारखी आहे. ‘अस्तु’ चित्रपट चांगला असला, तरी सुरुवातीला तो मर्यादित ठिकाणीच प्रदर्शित झाला. पुढं त्याला अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर काही संस्थांनी ‘क्राउड फंडिंग’ करून तो पुन्हा प्रदर्शित केला.

या जोडीचा अजून एक पुरस्कार विजेता चित्रपट म्हणजे ‘कासव’. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सुवर्णकमळ मिळालं. मनाचा आजार या एरवी आपल्याकडं दुर्लक्षित विषयाला हा चित्रपट फार हळुवारपणे स्पर्श करतो. यात आलोक राजवाडे, इरावती हर्षे यांचं काम सुंदर आहे.

— श्रीपाद ब्रह्मे.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..