नवीन लेखन...

दिग्दर्शकांचे ठाणे

लेखकाच्या कल्पनेमधून कागदावर उतरलेलं नाटक, प्रेक्षकांपर्यंत दृश्य स्वरूपात आणण्याची कामगिरी बजावण्याची जबाबदारी ज्याची असते आणि ही जबाबदारी निभावताना आपल्या प्रतिभेनं, कलाकारांच्या मदतीनं, तांत्रिक गोष्टींची मदत घेऊन जो नाटकात प्राण फुंकतो तो दिग्दर्शक. ठाण्याच्या रंगपरंपरेमध्ये दिग्दर्शकीय प्रतिभेनं स्वतचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या दिग्दर्शकांची संख्या कमी नाही. राज्य नाट्यस्पर्धांपासून ते व्यावसायिक रंगभूमीपर्यंत दिग्दर्शनाची जादू दाखवणाऱ्या ठाण्याच्या दिग्दर्शकांची गणनाच करायची झाली तर यशवंतराव पालवणकर यांच्यापासून सुरुवात करावी लागेल. 50च्या दशकात ठाण्यात नाटकाचा अंकुर जोपासण्याचं काम करणारे दिग्दर्शक म्हणजे यशवंतराव पालवणकर. ‘लोकांचा राजा’, ‘एक रात्र अर्धा दिवस’, ‘मैलाचा दगड’, ‘तुज आहे तुजपाशी’ ही नाटके दिग्दर्शित करून यशवतंरावांनी ठाण्यात नाटकाचे वातावरण निर्माण केले.

राजा गद्रे, प्रभाकर साठे, गोविंद केळकर, नाना कुलकर्णी, विभावरी गांगल, मधुसुदन ताम्हाणे, वसंत केळकर, जगन्नाथ केळकर, मोरूकाका सहस्त्रबुद्धे, मोरूकाका ताम्हाणे यांनी यशवंतरावांच्या दिग्दर्शनाखाली ठाण्यामध्ये नाटके सादर केली. त्यानंतरच्या काळातले आणि आजही ठाणेकर नाट्यरसिकांच्या स्मरणात ताजे असलेले दिग्दर्शक म्हणजे भालचंद्र अर्थात चंदा रणदिवे. ठाण्याचे आर्य क्रीडा मंडळ, स्वत स्थापन केलेली ‘कलायतन’ ही नाट्यसंस्था यातून रणदिव्यांचे नाट्यप्रेम फुलले. चंदांच्या दिग्दर्शनाखाली रंगमंचावर आलेली नाटके म्हणजे ‘तोतयाचे बंड’,‘भ्रमाचा भोपळा’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘प्रेमा तुझा रंग कसा?’, ‘जिद्द’, ‘रत्नदीप’. त्याकाळात नवा असलेला (!) एकांकिका हा नाट्यप्रकार ठाण्यात रूजवण्याचे श्रेय रणदिवेंना दिले जाते. ‘पांडव प्रताप’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘एका ओल्या रात्री’, ‘घुबड’, ‘ब्रह्मचारी यक्ष’, अशा एकापेक्षा एक बहारदार एकांकिका सादर करून त्यांनी भावी रंगकर्मींसाठी जणू नवी वाट खुली केली. शालेय रंगभूमीपासून ते राज्य नाट्यस्पर्धेपर्यंत विविध स्तरांवर दिग्दर्शन करणारे आणि ठाण्यात संस्थात्मक नाट्यचळवळ रूजावी म्हणून झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वि.रा.परांजपे मो. ह. विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांच्या नाटकांचे आणि नाट्यमन्वंतर या आपल्या नाट्यसंस्थेच्या नाटकांचे दिग्दर्शन करणारे परांजपेसर ठाण्यातील अनेक रंगकर्मींचे मार्गदर्शक होते. नाट्य परिषद ठाणे शाखेच्या माध्यमातून परांजपेसरांनी ‘बेबंदशाही’, ‘लग्नाची बेडी’, ‘कुलवधू’, ‘वेड्यांचा बाजार’ अशी नाटके दिग्दर्शित केली. खुसखुशीत विनोदी नाटकांपासून ते समस्याप्रधान गंभीर नाटकांपर्यंत विविध प्रवृत्तीची नाटके लिहिणाऱ्या श्याम फडकेंनी स्वतच्या नाटकांचे दिग्दर्शनही केले. ‘एनिमी ऑफ द पीपल’ या परकीय नाटकावर आधारित ‘विद्रोही’ या स्वतच्या नाटकाचे दिग्दर्शन फडके यांनी सन 1969 मध्ये केले होते. बालरंगभूमीला चेतना देताना बालनाट्ये लिहून, ती दिग्दर्शित करण्याची कामगिरीही त्यांनी बजावली.

ठाण्यामध्ये राज्य नाट्यस्पर्धा सुरू झाल्यानंतर ठाणेकर दिग्दर्शकांच्या प्रतिभेला मुक्त वाव मिळाला. 60च्या दशकातील दिग्दर्शकांच्या फळीतले एक महत्त्वाचे नाव म्हणजे, केशवराव मोरे! चिपळूण जवळच्या शिरळ या गावी जन्मलेल्या केशवरावांनी आपल्या गावातच ‘चैनीची चट’ या एकांकिकेत काम करून आपली रंगयात्रा सुरू केली. 1952 पासून ठाणे जिह्यात शिक्षकाची नोकरी करताना शाळेतील विद्यार्थ्यांची नाटके बसवून केशवरावांनी दिग्दर्शनाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर ठाण्यात आल्यावर कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यस्पर्धेत ‘देवमाणूस’ या नाटकात त्यांनी केलेली दादांची भूमिका गाजली. 1964 साली त्यांनी आत्माराम भेंडेंच्या दिग्दर्शनाखाली ‘जग काय म्हणेल’ या नाटकात आणि गोविंदस्वामी आफळेंच्या ‘बैल गेला नि झोपा केला’ या नाटकात भूमिका केल्या. 1967 मध्ये त्यांनी आदर्श मित्रमंडळ ही हौशी नाट्यसंस्था स्थापन केली आणि ‘लग्नाआधी वरात’ , ‘भले बहाद्दर’, ‘तीन चोक तेरा’ या नाटकांचे दिग्दर्शन केले. यातील ‘तीन चोक तेरा’ या नाटकाला कामगार नाट्यस्पर्धेत दुसरे बक्षीस मिळाले. त्यानंतर राजा कारळेंनी रूपांतर केलेलं ‘स्टील फ्रेम’, शशिकांत कोनकर लिखित ‘खुनी पळाला काळजी नसावी’ ही नाटके राज्य नाट्यस्पर्धेत सादर केली. केशवरावांचे स्पर्धेत सर्वाधिक गाजलेलं नाटक म्हणजे ‘महापुरुष’. कामगार कल्याण नाट्यस्पर्धेत आणि कोल्हटकर नाट्यस्पर्धेत या नाटकाला पहिलं पारितोषिक मिळालं होतं. या नाटकातील करीमदादाच्या भूमिकेसाठी आणि नाटकाच्या दिग्दर्शनासाठीही केशवरावांनी पारितोषिक पटकावले. त्यानंतर 77 – 78 साली राज्य नाट्यस्पर्धेत केशवरावांनी ‘आंटी’ हे सत्यघटनेवर आधारित खळबळजनक नाटक दिग्दर्शित केले. पुढे हेच नाटक केशवरावांच्या दिग्दर्शनाखाली व्यावसायिक रंगमंचावर आले. व्यावसायिक रंगभूमीवर केशवरावांनी बसवलेल्या शरद निफाडकर लिखित ‘देखणी बायको दुसऱ्याची’ या नाटकात राजा गोसावींची प्रमुख भूमिका होती. याखेरीज व्यावसायिक रंगभूमीसाठी केशवरावांनी ‘भक्त पुंडलिक’, ‘भामिनी’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘उंटावरचे शहाणे’, ‘लेडिज स्पेशालिस्ट’, ‘घटकंचुकी’, ‘युगपुरुष’, ‘गौतम बुद्ध’ या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.

स्त्राr भूमिकेत रंगमंचावर पाऊल ठेवून नंतर दिग्दर्शक म्हणून नावाजलेले ठाणेकर कलावंत म्हणजे दत्तात्रय तथा दत्ता काणे. 1944 साली वयाच्या 22 व्या वर्षी दत्तोपंतांनी मराठी रंगभूमीच्या जन्मशताब्दी वर्षात रंगभूमीला साष्टांग नमस्कार घातला तो अत्र्यांच्या ‘साष्टांग नमस्कार’ मधील शोभनाच्या भूमिकेत. त्यानंतर ‘सौभद्र’मधील रुक्मिणी, ‘भावबंधन’मधील लतिका, या भूमिका हौशी रंगभूमीवर गाजवल्या. काळ बदलला आणि पुरुषांनी स्त्राr भूमिका करायची पद्धत मागे पडली. तसे दत्तोपंत पुरुष भूमिकांकडे आणि दिग्दर्शनाकडे वळले. कामगार कल्याण केंद्राच्या नाट्यस्पर्धेत त्यांनी ‘देवमाणूस’ नाटकासाठी दिग्दर्शनाचे आणि अभिनयाचे (भूमिका जीवबा) प्रथम पारितोषिक मिळवले. सेंट्रल रेल्वेत कार्यरत असताना रेल्वे इन्स्टिट्यूटच्या ‘घराबाहेर’, ‘म्युनिसिपाल्टी’, ‘हाच मुलाचा बाप’, ‘भाऊबंदकी’ इ. नाटकांचे दिग्दर्शन करून आणि त्यात भूमिका करून प्रेक्षकांची दाद तर मिळवलीच, पण पारितोषिकेही पटकावली. भालचंद्र रणदिवे यांच्या संस्थेत ‘भ्रमाचा भोपळा’, ‘बिचारा डायरेक्टर’ तर कुर्ल्याच्या राजहंस कला सेवा मंडळात आणि ठाण्याच्या नाट्यमन्वंतरमध्ये ‘वैजयंता’, ‘खडाष्टक’, ‘देवमाणूस’, ‘लग्नाची बेडी’, ‘उर्मीला’, ‘मुंबईची माणसं’ अशी दत्तोपंतांची नाट्यकारकीर्द बहरली. ‘लग्नाची बेडी’साठी त्यांनी दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळवले. ठाण्याच्या नाट्याभिमानी या संस्थेत ते स्थापनेपासून क्रियाशील होते. संस्थेच्या डॉ. मधुसुदन जोशी लिखित ‘हरवले ते गवसले का?’ या नाटकाचे दिग्दर्शन करून त्यांनी त्यात प्रमुख भूमिका केली होती. त्यानंतर ‘काका किशाचा’, ‘एखाद्याचं नशीब’, ‘त्रिकोणी प्रेमाची पॉलिसी’, ‘सुराविण तार या सोनियाची’ या नाट्याभिमानीच्या अन्य नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. रायगड जिह्यातील नेरे (पनवेल) या गावातली खंडित नाट्यपरंपरा पुढे चालू ठेवण्यात दत्तोपंतांचा मोठा वाटा होता. नेरे, चिखले, कराडे, वरसाई या गावांमधील उत्सवाची नाटकेही त्यांनी दिग्दर्शित केली.

दिग्दर्शक म्हणजे ‘कॅप्टन ऑफ शिप’, दिग्दर्शक म्हणजे जणू कुटुंबातला कर्ता, दिग्दर्शक म्हणजे प्रसंगी लेखकाच्या अधिकारावर अतिक्रमण करून नाटकाचा प्रयोग सर्वांगसुंदर होण्यासाठी धडपडणारा जिनियस हा विचार रंगकर्मींच्या मनात पक्का रूजला तो या स्पर्धांमुळेच. स्पर्धांमध्ये ठाण्याचा झेंडा उंचावणारे दिग्दर्शक म्हणजे रजन ताम्हाणे, अशोक साठे, विजय कुलकर्णी, कुमार सोहोनी, विजय जोशी, विनायक दिवेकर, देवाशिष शेडगे इ. मित्रसहयोग, कलासरगम, नाट्यछंदी या संस्थांच्या नाट्ययादीकडे नजर टाकल्यावर लक्षात येतं की, या संस्थेच्या नाटकांनी प्राथमिक फेरीप्रमाणेच अंतिम फेरीतही दिग्दर्शनाची पारितोषिके मिळवून स्पर्धेवरचं आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. दिग्दर्शकांच्या या प्रभावळीत विशेष स्थान आहे ते कुमार सोहोनी यांचं! 24व्या राज्य नाट्य महोत्सवात कुमारने दिग्दर्शित केलेलं ‘अथ मनुस जगन हं’ हे प्र.ल. मयेकर लिखित नाटक प्राथमिक फेरीत दिग्दर्शनासह सर्व पारितोषिके मिळवून पहिले आलेच, पण अंतिम फेरीत देखील अशीच पारितोषिके मिळवून पहिले आले. कुमारने दिग्दर्शित केलेल्या ‘अरूपाचे रूप’ या नाटकाने राज्य नाट्यस्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला होता, तर कामगार कल्याणच्या अंतिम फेरीत कुमारच्या दिग्दर्शनात ‘मा अस साबरिन’ पहिले आले होते. हौशी रंगभूमीवरून व्यावसायिकवर गेल्यावरही कुमारची विजयी दौड सुरूच राहिली.

ठाण्याच्याच दत्तविजय संस्थेची निर्मिती असलेल्या, कुमारने दिग्दर्शित केलेल्या ‘देहभान’ नाटकाला व्यावसायिक नाटकांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. कलासरगम आणि संस्था या दोन नाट्यसंस्थांमधून आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याचं दर्शन घडवणाऱ्या कुमारचा व्यावसायिक रंगमंचावर दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला तो ‘अग्निपंख’ या नाटकाने. त्यानंतर ‘रातराणी’, ‘वासूची सासू’, ‘जंगली कबूतर’, ‘कुणीतरी आहे तिथं’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’, ‘देहभान’, ‘क्षण एक पुरे’, ‘बोल बच्चन’, ‘शेवटचे घरटे माझे’, ‘तुझ्याविना’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘मी रेवती देशपांडे’, ‘फक्त तुझी साथ हवेय’, ‘माणसा माणसा हुप्प’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘जन्मरहस्य’ असा कुमारचा दिग्दर्शक म्हणून प्रवास सुआणि मालिकांच्या क्षेत्रातही कुमारने दिग्दर्शक म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. राज्य नाट्यस्पर्धेत 12 पारितोषिके, नाट्यदर्पणचे आठ पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तीन पुरस्कार (दिग्दर्शनासाठी), संस्कृती कलादर्पण, राज्य शासनाचा चित्रपट महोत्सव, झी गौरव, म. टा.सन्मान यांनी गौरवलेल्या कुमार सोहोनींची मुळे ठाण्यातच रुजलेली आहेत.

1964 सालापासून रंगभूमीवर कार्यरत असलेले ठाण्यात राहणारे दिग्दर्शक म्हणजे रवींद्र दिवेकर. वेगवेगळ्या स्पर्धांमधून दिग्दर्शनाची चमक दाखवणारे दिवेकर जोडलेले होते ते मुंबईच्या ‘उदय कला केंद्र’ या संस्थेबरोबर. दिवेकरांनी रंगमंचीय कारकीर्दीची सुरुवात ‘मधल्या भिंती’, ‘निखारे’, ‘का? असंच का?’, ‘ग्रॅण्ड रिडक्शन सेल’, ‘पाचोळा जळत नाहीये’ या नाटकांमध्ये अभिनय करून केली. राज्य नाट्यस्पर्धा आणि इतर स्पर्धांसाठी दिवेकरांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांपैकी उल्लेखनीय नाटके म्हणजे ‘बहुरूपी’, ‘अणुयुगातून पलीकडे’, ‘सूट’, ‘मुंबईचे कावळे’, ‘स्वप्नमंदिर’, ‘प्रेषित’, ‘काचेची खेळणी’, ‘शो मस्ट गो ऑन’. 1974 साली ‘सारे प्रवासी तिमिराचे’ या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगमंचावर त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर ‘बेडरूम बेडरूम’, ‘एका चिमण्या जीवासाठी’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘ट्रप’, ‘श्री तशी सौ’, ‘स्माइल प्लीज’, ‘प्रिय पप्पा’, ‘श्रीयुत सामान्य माणूस’ या नाटकांचे दिग्दर्शन करून व्यावसायिक रंगमंचावर भरीव कामगिरी केली. मुंबई विद्यापीठाच्या कल्चरल कमिटीवर थिएटर एक्सपर्ट म्हणून त्यांनी सात वर्षे काम केलं आहे.

मित्रसहयोग या ठाण्यातल्या जुन्या नाट्यसंस्थेच्या वातावरणात नाटकाचे संस्कार घेऊन लहानाचा मोठा झालेला आणि हौशी -व्यावसायिक दोन्हीकडे चमकणारा अभिनेता-दिग्दर्शक म्हणजे प्रबोध कुलकर्णी. ‘ॲ‍श इज बर्निंग’, ‘भिंत’, ‘येथे डोळ्यांच्या खाचा करून मिळतील’ अशा एकांकिकांच्या दिग्दर्शनासाठी विविध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये दिग्दर्शनासाठी पारितोषिके मिळवणाऱ्या प्रबोधने श्याम फडके लिखित ‘छेद’ या नाटकासाठी राज्य नाट्यस्पर्धेच्या ठाणे केंद्रावर दिग्दर्शनाचे रौप्यपदक मिळवले आहे. प्रबोधच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीतल्या एक महत्त्वाचा उल्लेख म्हणजे ‘गावकुसाबाहेरचे गाव’ हे नाटक. गडकरी रंगायतन येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (ज्यात द्वारपालांपासून ते ऑफिस स्टाफपर्यंत सारेच होते) घेऊन प्रबोधने बसवलेल्या या नाटकाने कामगार कल्याण स्पर्धेत बक्षीसही मिळवले होते. कामगार कल्याण स्पर्धेत प्रबोधला ‘ती रात्र’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक तर नाटकाला सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून पारितोषिक मिळाले आहे. राज्य नाट्यच्या ठाणे केंद्रावरून प्रबोधने दिग्दर्शित केलेलं ‘सहस्त्र वर्षांचे साचले हे काळे’ या नाटकाची निवड अंतिम फेरीसाठी झाली होती. राज्य नाट्यमध्येच ‘बास्टर्ड्स’मधील भूमिकेसाठी प्रबोधला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक मिळाले आहे. व्यावसायिक रंगमंचावर प्रबोधने दिग्दर्शित केलेली ‘खुंटीला टांगलं’ (प्रदीप पटवर्धन, अंजली वळसंगकर, मनोरमा वागळे, राजन पाटील), ‘घर श्रीमंताचं’ (सुधीर जोशी, आशा काळे, शेखर फडके, पुष्कर श्रोत्री) ही नाटके येऊन गेली आहेत. त्याचप्रमाणे ‘चारचौघी’, ‘संध्याछाया’, ‘गर्भश्रीमंत’, ‘जंगली कबुतर’ या व्यावसायिक नाटकांमधून प्रबोधचा अभिनय रसिकांना पाहायला मिळाला. नाटकांप्रमाणेच दूरदर्शन मालिका आणि जाहिरातींचा अनुभव पाठीशी असलेला प्रबोध आता ‘दृष्टी’ या आपल्या संस्थेतर्फे अभिनय प्रशिक्षण वर्ग चालवतो.

ठाण्याच्या नाट्यवर्तुळात आपल्या रंगयात्रेला सुरुवात करून, नंतर 11 वर्षे मुंबई विद्यापीठाच्या ‘सर्टिफिकेट कोर्स इन ड्रमेटिक्स’साठी समन्वयकाची जबाबदारी सांभाळणारा दिग्दर्शक म्हणजे विनायक दिवेकर. मित्रसहयोग, कलासरगम या नाट्यसंस्थांमधून अभिनय आणि दिग्दर्शनाचे धडे गिरवलेल्या विनायकने महाविद्यालयीन काळापासूनच ‘चेस’, ‘काळ, काम, वेग’, ‘द ब्लाइंड पीपल’, ‘गोष्ट’, ‘पंचकम’ अशा एकापेक्षा एक एकांकिकांचे लक्षवेधी दिग्दर्शन करून रंगभूमीवरील वाटचाल सुरू केली. त्यानंतर राज्य नाट्यस्पर्धेसाठी ‘लढाई’, ‘खजिन्याची विहीर’, ‘चित्रलेखा’, ‘राधी’, ‘घरातलं परकं घर’ (तस्लिमा नसरीनच्या ‘लज्जा’वर आधारित) या नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या विनायकने एकांकिका आणि नाटकांच्या दिग्दर्शनासाठी 1984 ते 2003 या काळात 30 पारितोषिके मिळवली आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर विनायकने दिग्दर्शित केलेली ‘घर जपायला हवं’, ‘मुलगी मजेत आहे’ ही नाटके प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. विनायकच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या एस. एन. डी.टी. च्या ‘पंचकम’ या एकांकिकेला ‘नॅशनल युथ फेस्टिव्हल’मध्ये 2007 साली अखिल भारतीय स्तरावर पहिला क्रमांक मिळाला होता. आनंद म्हसवेकर लिखित ‘पाणी रे पाणी’ या एकांकिकेला विनायकच्या दिग्दर्शनाखाली नॅशनल युथ फेस्टिव्हलमध्ये अखिल भारतीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला होता. 1999 मध्ये त्याने आकाशवाणीवर सादर केलेल्या ‘राजा कालस्य कारणम’ या अभिनव कार्यक्रमाला ऑल इंडिया रेडिओच्या वार्षिक संमेलनात प्रथम क्रमांक मिळाला होता. बालरंगभूमीपासून ते माहितीपटापर्यंत चौफेर संचार करणारा विनायक दिवेकर दिग्दर्शनाबरोबरच अभिनय, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा यांतही तरबेज आहे.

‘मित्रसहयोग’ या ठाण्यातल्या संस्थेचं सर्वात मोठं योगदान म्हणजे सातत्याने चार दशके सुरू असलेली नाटकांची चळवळ, याच चळवळीतून घडलेला दिग्दर्शक म्हणजे ॲ‍ड. संजय बोरकर. मो. ह.विद्यालयात शिकत असतानाच संजय रंगभूमीकडे ओढला गेला. आधी शालेय आणि नंतर महाविद्यालयीन अभिनय. एकांकिका स्पर्धांमधून संजयचा प्रवास सुरू झाला. या प्रवासातच संजय मित्रसहयोगच्या नाट्यपरिवाराचा सदस्य बनला. 1988-89 मध्ये राज्य नाट्यस्पर्धेत त्याने श्याम फडके लिखित ‘कॅन्सर’ या नाटकाचे दिग्दर्शन करून ठाणे केंद्रात तिसरे बक्षीस मिळवले आणि ठाण्याच्या नाट्यवर्तुळात एका दमदार दिग्दर्शकाने एण्ट्री घेतल्याची जाणीव झाली. त्यानंतरच्या वर्षी संजयने शिरीष हिंगणे लिखित ‘परिसस्पर्श’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी ठाणे केंद्रात प्रथम पारितोषिक पटकावले. ठाणे केंद्रात प्रथम आलेले हे नाटक अंतिम फेरीत सादर झाल्यानंतर ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये लेख लिहून या नाटकाचे विशेष कौतुक केले होते. त्यानंतर दीपक कुलकर्णी लिखित ‘प्रयोग क्र. 999’, स्वलिखित ‘शर्यत’, मधू राय यांच्या गुजराती नाटकाचा उदय सबनीस यांनी केलेला स्वैर अनुवाद आणि त्यानंतर स्वलिखित ‘प्रदक्षिणा’ या नाटकांचे दिग्दर्शन करून राज्य नाट्यस्पर्धेमध्ये दर्जेदार नाटके सादर करण्याची मित्रसहयोगची परंपरा ॲ‍ड. संजय बोरकर यांनी अखंड राखली. त्याचप्रमाणे संजय बोरकर यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या एकांकिकांची यादीही मोठी आहे. निवडक नावे सांगायची तर ‘मन वढाव वढाव’, ‘इट्स अ बिझनेस’, ‘इट वॉज टू लेट’, ‘हुज गेम’, ‘काय हवं असतं आपल्याला’ ही सांगता येतील. संजय बोरकर यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या तीन एकांकिका नाट्यदर्पणच्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेत सलग तीन वर्षे अंतिम फेरीत निवडल्या गेल्या आणि पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्या, हा एक विक्रम म्हणावा लागेल. ॲ‍ड. संजय बोरकर यांनी लिहिलेल्या लोकन्यायालयाचे महत्त्व सांगणारं ‘उपाय आमचा – निर्णय तुमचा’ हा लघुपट महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा न्यायालयांतून रोज पक्षकारांना दाखवण्यात येतो. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘कायद्याचं बोला’ या चित्रपटाच्या पटकथेत संजयचा मोलाचा सहभाग होता. तसेच देवाशिष शेडगे दिग्दर्शित ‘रस्ता रोको’ या चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखनातही संजय सहभागी होता.

मराठी रंगभूमीवर महिला नाटककार आणि दिग्दर्शिका तशा अभावानेच आढळतात, पण ठाणे त्याबाबतीतही पुढे आहे. मित्रसहयोगमधूनच अभिनेत्री म्हणून पुढे आलेली आणि नंतर लेखन-दिग्दर्शनाकडे वळलेली कलावंत म्हणजे सौ. हर्षदा संजय बोरकर. मित्रसहयोगच्या ‘वेटिंग लिस्ट’ , ‘प्रदक्षिणा’, ‘काय हवं असतं आपल्याला’ या नाटकांसाठी दिग्दर्शन सहाय्य आणि रंगमंच व्यवस्था ही जबाबदारी पार पाडल्यानंतर हर्षदाने ‘कल्पना एक आविष्कार अनेक’साठी ‘मुखवटे’ ही एकांकिका लिहिली. या एकांकिकेत अभिनय करणाऱ्या पल्लवी वाघ-केळकर हिला अभिनयाचे प्रशस्तीपत्र मिळाले. त्यानंतर व्यावसायिक नाट्यनिर्माता संघाच्या स्पर्धेत हर्षदाने ‘तिन्हीसांज’ ही एकांकिका लिहून दिग्दर्शित केली. ‘तिसरा’ या एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शनही हर्षदाचेच होते. कुमार कला केंद्रच्या बाल नाट्यस्पर्धेत ‘बर्थडे गिफ्ट’, ‘ब्रेक के बाद’, ‘प्रिय बाबा’ या बालनाटिका लिहून तिने त्यांच्या दिग्दर्शनासाठी पारितोषिके मिळवली आहेत. ‘स्वसंवेद्या’ या स्वनिर्मित गुणवान महिलांच्या गटातर्फे विविध सामाजिक प्रश्नांवर पथनाट्ये लिहून, त्याचे दिग्दर्शन तिने केले आहे.

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजवून नंतर एकदम व्यावसायिक रंगभूमीवर दाखल झालेला आणि आपल्या ढंगदार सादरीकरणाने मराठी रंगभूमीचा ट्रक बदलणारा ठाण्याचा दिग्दर्शक म्हणजे संतोष पवार. अस्सल गावरान बाजाची, इथल्या मातीत रूजलेली आणि परंपरेच्या प्रवाहात भिजलेली हास्यस्फोटक नाटके तितक्याच परिणामकारक पद्धतीने सादर करणे ही संतोषची खासियत. लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा तिन्ही आघाड्या आरामात सांभाळण्याचे संतोषचे कसब वाखाणण्यासारखे आहे. संतोषचा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवास सुरू झाला तो ठाण्याच्या दत्ता घोसाळकर यांच्या ‘श्रीदत्तविजय’ नाट्यसंस्थेच्या माध्यमातून. ‘यदा कदाचित’ या संतोषच्या पहिल्याच नाटकाने प्रेक्षकांना (आणि नाट्य समीक्षकांनाही) खडबडून जागे व्हायला भाग पाडले. शाहीर साबळेंच्या कलापथकाचे संस्कार झालेल्या संतोषने आपल्या नाटकातून प्रामुख्याने लोककलांचा, लोकरंगभूमीचा धमाकेदार वापर केला. ताजा विषय, चुरचुरीत संवाद आणि त्याला संगीताची बहारदार जोड हा त्याचा हमखास हिट्चा फॉर्म्युला. ‘यदा कदाचित’ नंतर ‘यदा यदाही अधर्मस्य’, ‘जाणून बुजून’, ‘सुयोग्य असा मी अशी मी’, ‘तुम्हीच माझे बाजीराव’, ‘पती माझे छत्रपती’, ‘राधा ही कावरी बावरी’, ‘यंदा कदाचित’, ‘तीन जीव सदाशिव’, ‘तू तू मी मी’ अशी संतोषची यादी मोठी आहे. रंगभूमीवरून चित्रपट लेखनाकडे संतोषचा प्रवास सुरू झालेला असला तरी या नाटकवाल्या ठाणेकराला आजही रंगभूमीवर काम करायला अधिक आवडते.

आज ‘शर्यत’, ‘खेळ मांडला’, ‘एक होता काऊ’ अशा वेगळ्या विषयांवरच्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जाणारा ठाण्याचा विजू माने मनाने आणि कृतीनेही अस्सल नाट्यधर्मी आहे. महाविद्यालयीन काळापासून रंगभूमीचा पाईक बनलेल्या विजूने विविध स्पर्धांमध्ये दिग्दर्शनासाठी पंधरापेक्षा जास्त पारितोषिके मिळवली आहेत. विजूने दिग्दर्शित केलेल्या काही एकांकिका ‘वंदे मातरम्’, ‘जेथे जातो तिथे’, ‘भीती’, ‘सिग्नल’, ‘वळण’, ‘कौन संग डोर बांधे’, ‘सारीपाट’, ‘फेअरी टेल’, ‘केस नं 99’, ‘जो भी होगा देखा जाएगा’, ‘अंधारवाटा’ इ. हौशी नाट्यस्पर्धांमध्ये विजूने दिग्दर्शित केलेली ‘ती रात्र’ आणि ‘छोटी तिची सावली’ ही नाटके सादर झाली आहेत. व्यावसायिक रंगमंचावर ‘सेम टू सेम’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ आणि ‘बंदे मे था दम’ या नाटकांचे दिग्दर्शन विजूने केले आहे.

ठाण्याच्या नाट्यवर्तुळात मोठी झालेली आणि उत्कृष्ट अभिनेत्री असलेली ‘संपदा जोगळेकर-कुलकर्णी’ आता व्यावसायिक रंगमंचावर लेखिका-दिग्दर्शिका म्हणून स्थिरावत आहे, ही ठाणेकर नाट्यरसिकांसाठी आनंदाची आणि अभिमानाचीच गोष्ट आहे. ‘सोबत संगत’ या स्वलिखित नाटकाचे दिग्दर्शन करून संपदाने व्यावसायिक रंगमंचावर लेखिका-दिग्दर्शिका म्हणून पदार्पण केले. त्यानंतर हेलन केलरच्या प्रेरणादायी सत्यकथेवरचं तितकंच रोचक ‘किमयागार’ या नाटकाचं दिग्दर्शन करून त्यात तिने भूमिका केली. सध्या राजन ताम्हाणे लिखित ‘तिन्हीसांज’ हे वेगळ्या वाटेवरचं नाटक संपदाच्या कुशल दिग्दर्शनाखाली लोकप्रिय झाले आहे. या गुणी अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिकेकडून नाट्यरसिकांना मोठÎा अपेक्षा आहेत.

ठाण्यातील नव्या पिढीच्या दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे प्रा. मंदार टिल्लू. गेली 20 वर्षे मंदार बालरंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. या काळात छोट्या छोट्या नाटिका आणि पूर्ण लांबीची बालनाट्ये मिळून त्याने सुमारे शंभर बालनाट्यांचे दिग्दर्शन केले आहे. मंदारच्या या रंगयात्रेतील काही ठळक नावे म्हणजे ‘जंतर मंतर पोरं बिलंदर’, ‘महाराजांचा महामुकुट’, ‘बोक्या सातबंडे’, ‘झाली काय गंमत’, ‘केल्याने होत आहे रे’, ‘अरेच्चा कमाल आहे’, या बालनाटकांशिवाय मंदारने केलेला एक अनोखा प्रयोग म्हणजे ‘बालसुरांच्या मैफलीत’ हा 60 बालकलाकारांचा वाद्यवृंद. गेली अनेकवर्षे बाळकृष्ण ओडेकर या आपल्या मित्राबरोबर स्वतच्या ‘गंधार’ या बालनाट्य संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना अभिनयाचे मार्गदर्शन करतो. 80 कलावंतांच्या संचाला दिग्दर्शन करून ‘शिवबा’ हे भव्य नाट्य रंगमंचावर आणणारा मंदार टिल्लू कोकण चषक एकांकिका स्पर्धेच्या संयोजनात सहभागी असतो. प्रेरणा सांस्कृतिक व्यासपीठचा सचिव आहे.

लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही आघाड्या सांभाळणारा युवा रंगकर्मी म्हणजे राजेश राणे. ज्ञानसाधना, जोशी – बेडेकर कॉलेज या महाविद्यालयांच्या एकांकिका दिग्दर्शित करून उन्मेष, आय. एन. टी, मृगजळ, अल्फा, पुरुषोत्तम इ. स्पर्धांमध्ये राजेशने सादर केल्या आहेत. ‘मुखवटा’ या एकांकिकेसाठी त्याला ठाणे महापौर चषकमध्ये दुसरे पारितोषिक, तर खोताची वाडी स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘सायली पेंडसे बिस्टो’ या एकांकिकेला प्रथम पारितोषिक मिळाले होते.

ठाण्याच्या हौशी नाट्यवर्तुळातील दिग्दर्शकांचा आढावा- शशी जोशी (सिंहगर्जना), नरेंद्र बेडेकर (घनदाट, भ-भ भूताची भंबेरी भम्), दिलीप पातकर, विनोद कुलकर्णी, संजय लक्ष्मण बोरकर यांचा उल्लेख केल्याखेरीज पूर्ण होऊ शकत नाही.

साभार- ठाणे रंगयात्रा २०१६.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..