नवीन लेखन...

अरविंद रे यांची कादंबरी – ‘दिसें वांयां गेलों’

अरविंद रे  यांच्या ‘दिसें वांयां गेलों’ या  कादंबरीतील काही अंश आपल्यासमोर आणत आहोत.


।। प्रकरण  नऊ ।।

विद्यापीठाच्या कँटीनमधे चहा घेऊन लायब्ररीकडे परतणाऱ्या चक्रधरनं नेहमीप्रमाणं जर्नल सेक्शनमध्ये डोकावून पाहिलं. पहिल्या टेबलाशीच पुस्तकात डोकं खुपसून बसलेली ऊर्मी त्याला दिसली. जर्द पिवळ्या फुलांच्या साडीतील ती खुर्चीत मांडी घालून बसली होती. थोडी गंमत करावी म्हणून तो तिच्या पाठीशी जाऊन पुस्तकात डोकावत उभा राहिला. चाहूल लागून तिनं त्रासिकपणे मान वर केली. त्याला बघून मात्र तिच्या कपाळावरच्या आठ्या अदृश्य झाल्या. नेहमीच्या हसऱ्या चेहऱ्यानं उल्हसित स्वरात ती म्हणाली, “काय रे? किती दिवसांनी दिसतोयस? आहेस कुठं तू हल्ली? ”

“कुठं असणार? ” चक्रधर वाकून तिच्या कानाशी पुटपुटला, “इथं लायब्ररीत ओंडक्यासारखा पडलेला असतो दिवसभर.”

“ते नको सांगूस.” ऊर्मीनं हातातील पुस्तक मिटवून टेबलावर ठेवलं आणि काहीशा लाडीकपणं ती म्हणाली, “तू लेक्चर्सना का बसत नाहीस ते सांग आधी.”

“कंटाळा आला. त्यांची लेक्चर्स सुरु झाली की इकडं माझी दिवास्वप्नं सुरु 6

होतात. तू अजून करतेस अटेन्ड? ”

“देवधरांची फक्त.’

“प्रकरण सुरू झालेलं दिसतंय.”

‘“हो. झालंय.” ऊर्मी खुर्चीतून उठून, टेबलावरचं पुस्तक पर्समध्ये कोंबत ठसक्यात म्हणाली, “चल, बाहेर बोलू. इथं बाकीच्यांना डिस्टर्ब होतोय. मी कॉफीसाठी उठणारच होते एवढ्यात.”

बाहेर पडल्यावर कँटीनच्या दिशेने चाललेल्या चक्रधरचा हात खेचून ऊर्मी त्याला डावीकडे वळवत म्हणाली, “आपल्या कँटीनमध्ये नव्हे रे. एकटी असले की इथली टुकार कॉफी प्यावी लागते मला. चल, तुला वैभवमधली क्लासिक कॉफी पाजते.’ चक्रधर म्हणाला, “नको, आत्ताच उठलोय मी कँटीनमधून चहाच घेऊन. कॉफी तर मला मुळीच आवडत नाही.”

वैभवमधली घेऊन बघ एकदा माझ्याबरोबर. मग बोल.”

“अग बाई इडली जशी सगळीकडं इडलीच असते तशी कॉफी ही कुठेही कॉफीच असणार ना.”

“समजेल असं बोल रे काहीतरी.”

“मला इडली आवडत नाही ना तर त्यादिवशी पॉलनं अगदी ह्या तुझ्याच स्टाईलनं मला ती सुविधात खिलवली.

“पॉल भेटतो रे तुला?”

“भेटतो की, हल्ली तो डेची लेक्चर्स अटेन्ड करतो. तुला माहीत नाही? ”

“तरीच म्हटलं…” मग ती काहीशा गंभीर स्वरात म्हणाली, “तू देवधर सरांविषयी बोल्लास ना मघाशी! मी खरंच पडले आहे त्यांच्या प्रेमात. बट इटस अ वन वे अफेअर.

अँड दॅट इज इनफ फॉर मी. पुढच्या आठवड्यात त्यांची लेक्चर्स संपली की मी तरी कसची अटेन्ड करतेय नंतर? एकटीला फारच बोअर होतं रे.”

“पॉलची कंपनी असायची ना तुला?”

“नको रे बाबा त्याची कंपनी. त्यानं एमेला अॅडमिशन घेतलंय की पोरी पटवायला हे तू विचार त्याला एकदा. एरिकानं त्याची डाळ शिजू दिली नाही. तर ह्या मजनूनं माझी पाठ धरली. बोलू नकोस त्याला हे, मध्यंतरी हा चक्क सिनेमाची तिकिटं घेऊन मलाच अपरोच झाला. तुम्ही पुरूष असे काय रे? आम्ही थोडं मोकळं वागलं की तुम्ही अगदी टपून बसल्यासारखे.”

“मी तुझ्याकडे तिकिटं घेऊन येणार नाही. लिहून देतो. तू घेऊन आलीस तर जरुर विचार करीन.”

“फाजीलपणा नको.” चक्रधरच्या हातावर चापटी मारत ऊर्मी म्हणाली, माझे संबंध फार वेगळे आहेत रे. आम्हा बायकांना कळतात पुरूष. मी पुरुषांबद्दल बोलतेय इन जनरल.” “मला वगळल्याबद्दल धन्यवाद.”

वैभवमध्ये ते मोकळंसं टेबल बघून समोरासमोर बसले. “तू अजूनही चहाच घेणार की कॉफी? ” ऊर्मीनं विचारलं. “पॉलची इडली खाऊन झाली.” चक्रधर काहीसं हसत म्हणाला, “तुझ्या कॉफीनं ”

काय गाढव मारलंय? ” दोन स्ट्राँग नेसकॅफेची ऑर्डर देऊन ऊर्मी गंभीरशी होत म्हणाली, “धिस इज अॅक्चुली नॉट माय बिझनेस. तरी बोलते. चालेल? ” “चालेल.’

“तुला वाटेल की मी तुमच्या प्रकरणात उगीचच कडमडतेय. पण तुझी मैत्रीण म्हणून बोलावंसं वाटतंय.”

“बोल, तुझं नाक फार लांबोडकं नाहीय. आणि मी नको म्हटलं तरी तू बोलायची थांबणार नाहीस.’

“नाहीच बोलणार आता, जा.” ऊर्मी फुरंगटून म्हणाली.

“कडमड ग बाई, माझी मैत्रीण म्हणवतेस आणि किती भाव खाते आहेस? ” मग एकेक अक्षर सुटट्ं उच्चारत तो म्हणाला. “क ड म ड.’

“तू मोहिनीमध्ये जरा अधिकच इन्वॉल्व्हड झाला आहेस असं वाटत नाय तुला?

तिला मी तशी फारशी ओळखत नाही. पण तिच्याकडे बघून साधारण अंदाज येतो त्या मुलीचा. मध्यंतरी पॉलदेखील माझ्याकडे बोल्ला होता तुमच्याविषयी.” “पुढे? ”

“अंहं. म्हणजे तिच्यात तू किती इन्वॉल्व्ह व्हायचंस हा पूर्णपणे तुझा प्रश्नय. पण मला त्या मुलीची लक्षणं ठीक दिसत नाहीत.”

“पुढे? ”

“पुढे तुझं डोंबलं.” ऊर्मी त्याच्याकडे डोळे वटारुन म्हणाली, “मी म्हटलं ना तुला आधीच की इटस् नॉट माय बिझनेस. मला सुचवायचं एवढंच आहे की शी डजन्ट डिझर्व अ फेलो लाईक यू. यू आर टू गूड टु बी हर. शूड आय से… व्हाट शूड आय से? ”

“यू डोन्ट हॅव टू से एनिथिंग.” चक्रधर मोठमोठ्यानं हसत म्हणाला, “ऊर्मी, मी तिचा लव्हर बिव्हर नाहीय. तुला वाटतं तसा मी तिच्यात इन्वॉल्व्ह झालेलो नाहीय.

आय वॉन्ट टू बी हर फ्रेन्ड. जस्ट अ गूड फ्रेन्ड. सध्याची माझी पृथ्वीवरची आवडती स्त्री कोण आहे सांगू तुला? डिम्पल कापडिया. बॉबीतली. उद्या ती जरी तयार झाली.

माझ्याशी लग्न करायला… बिचारीची घोर निराशा होईल. लग्न ही गोष्टच नको आहे मला आयुष्यात. आय हेट इट.”

“माझं रीडिंग कदाचित चुकलं असेल.” ऊर्मी पडतं घेत म्हणाली, “तुझीं तिच्याशी कॅज्युअल मैत्री असेल तर इटस् ओके. पण मी बोल्ले का, तर मला वाटलं शी मे यूज यू. एनी वे, माझं बोलून झालं.” टेबलावर आणून ठेवलेली कॉफी ऊर्मीनं चमच्यानं ढवळायला सुरवात केली होती.

या कादंबरीची खरेदी करण्यासाठी खालील बॅनरवर क्लिक करा. 

कॉफीचा उग्र वास चक्रधरला भयंकर आवडायचा. सफेद दुधाचं तपकीरी रंगाच्या कॉफीत रूपांतर होताना तो मन लावून पाहत होता. मग तिच्याकडे नजर उंचावून तो म्हणाला, “तुला काय म्हणायचंय ते समजतंय मला. आता खरं काय ते ऐक. मी गुंतलोय तिच्यात. पण तुला वाटतं त्या अर्थानं नव्हे. अगदीच वाटलं गाडी अडू लागलीय, तर रूळ बदलायचा.”

“व्हाट डू यू मीन बाय दॅट? ”

चक्रधर गप्प राहिला.

मग तीच समजून म्हणाली, “पण तरी तिथपर्यंतचा प्रवास फुकट जातोच ना? ”

“नाही, प्रवास कुठपर्यंतचाच फुकट जात नाही. खरं म्हणजे फुकट काहीच जात नाही, किंवा जाऊ द्यायचं नाही ह्या तत्त्वाचा मी आहे.”

“तुझी तत्त्वं तुलाच लखलाभ असोत.”

“थँक्यू.”

“ऊर्मी काहीच बोलत नाही पाहून चक्रधर म्हणाला, “एक गोष्ट मलाही तुझ्याकडे खूप दिवसांपासून बोलायची होती, बोलू का? ”

“सूड घेतो आहेस का लगेच्या लगेच? ”

“तसं समज.”

“घे.”

“खरं तर मी फक्त तुझ्यापर्यंत निरोप द्यायचं काम करतोय.”

“दे.”

“तुला हे पोरकट वाटू शकेल कदाचित.”

मग मात्र मुळीच बोलू नकोस.’

“हॉस्टेलमध्ये माझा एक मित्र आहे.”

“मी ऐकत नाहीये.” दोन्ही कानांवर हात ठेवून ऊर्मी म्हणाली.

“त्यानं तुला खूपदा माझ्याबरोबर पाहिलंय. लायब्रीत येतो तो बऱ्याचदा.”

“मी ऐकत नाही आहे.”

“तू ऐकू नकोस. पण कानांवरचे हात तर काढ. त्याचा असा दाट समज होता की

तू माझी खास मैत्रीण आहेस.”

“मग नाहीये का मी तुझी खास मैत्रीण? ”

“त्याला अनुस्यूत असलेल्या अर्थानं नाहीयेस.”

“त्याला कोणत्या अर्थानं म्हणायचंय? आणि अनुस्यूत वगैरे शब्द वापरायची गरज आहे का रे?”

“अनुस्यूत शब्द उच्चारायला बरा वाटतो. त्याचा समज होता की तू माझी लवर आहेस. लवर हा त्याचा शब्द उच्चारायला फारसा बरा वाटत नाही.’ “समजलं. पुढे बोल.”

“त्याला तू फारच क्यूट वाटतेस. तुझ्या सौंदर्यावर भाळलाय तो. अर्थात तू सुंदर आहेस हे मीही कबूल करतो.”

“त्याबद्दल तुला भजी सांगू का? ”

“नको. इडली सांग आणि नंतर कॉफी.”

“पण ह्या तुझ्या मित्राची दृष्टी नीट आहे ना रे?”

“जाड भिंगाचा चष्मा लावतो तो.” कॉफीचा शेवटचा घोट घेऊन चक्रधर म्हणाला, “पण तो स्कूटर चालवतो म्हणजे चष्म्यातून त्याला नीटच दिसत असावं. गम्मत म्हणजे, तू स्वभावानं कशी फ्रँक आहेस, तुला माझ्यासारखे कसे अनेक मित्र आहेत हे त्याला सांगूनही खरं तर सांगितल्यापासून तुझी ओळख करून दे म्हणून त्यानं माझ्या पाठी लकडा लावलाय. करायचीय त्याच्याशी ओळख तुला? ”

“हत्तीच्या! तूही काय शेवटी डोंगर पोखरून उंदीर काढलास.”

“उंदीर नाहीय, हत्तीय. बघितलंस त्याला की कळेल.”

“बघू या तरी खरं या प्राण्याला. माझी हरकत नाही.

“कधी ठरवू ओळखीचा प्रोग्राम? तू पुन्हा कधी येणार आहेस लायब्रीत? ” “येईन तेव्हा. लायब्ररीत योगायोगानं तो कधी असला तरच दे ओळख करून.”

“नक्की ना? ”

“म्हणजे तसा हा प्राणी नॉर्मल आहे ना रे? नाहीतर पॉलप्रमाणं सिनेमाची तिकीटं घेऊन यायचा.” ऊर्मी हसत हसत म्हणाली.

“पॉलची लक्षणं मी ओळखली होती.” चक्रधर म्हणाला, “पण म्हटलं आपण कशाला कडमडा मध्ये. तुला स्वतःहून शोध लागलेला बरा. हा प्राणी तसा नसावा.

सज्जन वाटतो खरा. पण त्याला नीट ओळखणं न ओळखणं तुझं काम.

हॉटेलबाहेर पडल्यावर ऊर्मी चक्रधरकडं लाडिक पाहत म्हणाली, “प्लीज, मला स्टेशनपर्यंत कंपनी दे ना.”

“बस्स् काय, लगेच्या लगेच अशी कॉफी वसूल करणं बरं नव्हे.”

“नको येऊस, जा.” म्हणत ऊर्मी तरात्रा चालू पडली.

चक्रधर तिला गाठून म्हणाला, “थांब ग. नाकावर एवढा राग तुझ्या मावत नाही.” “ठोंब्या, तुला मी त्यासाठी कॉफी पाजली होय रे? ”

“ते मला कसं कळणार. पण…”

“बोलू नकोस पुढे. तुला कथा ऐकवायची होती माझी रस्त्यात. खूप दिवसांपासून डोक्यात घोळतेय. अजून कागदावर उतरत नाहीये. त्याआधी तुला ऐकवून मत घ्यायचं होतं तुझं.”

“अग असं बोल की मग. स्टेशनपर्यंतच काय तुझ्या घरापर्यंत कंपनी द्यायला तयार आहे मी. महाराष्ट्रातल्या थोर भावी कथालेखिकेची कंपनी मिस करण्याएवढा अरसिक समजतेस की काय मला? थांब इथंच, दोन मिंटात पुस्तकं घेऊन येतो लायब्रीतून.”

“लवकर ये. तीन मिन्टांच्या पुढे मी थांबणार नाही.”

“तीन नव्हे दोन.”

हॉस्टेलवर नेहमीपेक्षा लवकर परतल्यानं चक्रधर कपडे वगैरे धुवून कॉटवर पाय हलवत बसला होता. बाहेर काळोख उतरायला सुरवात झालेली. ना धड प्रकाश ना धड काळोख अशा गूढ, उदास प्रदेशात त्याला अधांतरी लटकत असल्याप्रमाणं व्हायचं. मेंदूत कसल्या न कसल्या विचारांचे, कल्पनांचे उमाळ्यांमागून उमाळे फुटत रहायचे. मध्येच मृत्यूचा विचार जोरदार उसळी मारून यायचा. ह्या पृथ्वीचा आज ना उद्या आपल्याला कायमचा निरोप घ्यावा लागणार ह्या कल्पनेनं शरीराला घाम फुटायचा. रडकुंडीला यायला व्हायचं. उपाय काहीच सापडायचा नाही. आपल्यानंतर पुढच्या हजारो,लाखो, कोटी वर्षांत ह्या पृथ्वीवर काय काय उलथापालथी झालेला असतील. त्या काय असतील? तेव्हा आपण कुठे असू? की कुठेच नसू? कळायला मार्ग नव्हता. फुकटचे जन्माला आलो आपण. इतका सारा माणसांचा कचरा ह्या पृथ्वीवर असताना आपल्या जन्माला येण्याची गरजच काय होती? आपल्या आधी इथं कोट्यांनी माणसं आली. गेली. नंतर येतील. जातील. आपण ह्या साऱ्यांत कुठे बसतो? की केवळ वासना आणि प्रजोत्पादनाची आस ह्यांच्या मिश्रणातून आपली निर्मिती झालीय? ह्यापलीकडे तसा आपल्या अस्तित्वाला काही अर्थ आहे का? इतकं करूनही चार दिवसांचं पृथ्वीवरील हे अस्तित्व आनंदमय नाहीच आहे. हे आकाश, डोंगर, नद्या, सूर्यप्रकाश, तारे, वारे,पाऊस, पक्षी वगैरे सगळं ठीक आहे. पण फार मोठी किंमत द्यावी लागतेय साऱ्यांची. अर्थात आपल्याला तरी कुठे हौस होती जन्माला यायची?  पण न जन्मून तरी काय केलं असतं आपण मोठं? पण आपण न जन्मतो तर नसतोच, पण म्हणजे काय? जन्माला आलो हे मात्र खरं. की खोटं?

खोलीत अंधार झाल्यानं चक्रधरला उठून बल्ब लावावा वाटला. पण तरी तो तसाच बसून राहिला. समोर भिंतीवर लावलेल्या पोस्टरवर त्याची नजर गेली. त्याचा एक मित्र नव्यानंच सुरू झालेल्या एका मराठी सिनेसाप्ताहिकाचं काम बघत होता. त्याच्याकडून त्याला हे पोस्टर मिळालेलं. सहज म्हणून त्यानं ते भिंतीवर लावून पाहिलं आणि मग चिकटवूनच टाकलं. दररोज ते बघून त्यातील नवलाई हरपेल की काय अशी त्याला भीती होती. काही प्रमाणात तसं झालंही. पण मध्येच कधी ते पोस्टर बारकाईनं निरखायला घेतलं की त्यावरील ते जोडपं जिवन्त व्हायचं आणि त्याला धडकी भरायची. कृष्णधवल रंगातील खाली मान झुकवून डोळे मिटलेल्या वहिदा रेहमानचा करूण, दैवी चेहरा. डोईवरच्या मोकळ्या सोडलेल्या केशसंभाराचे दोन्ही खांद्यावरून खाली गेलेले काळेभोर ओघळ. आणि स्वप्नाळू डोळ्यांनी पाहत तिच्यावर झुकलेला गुरुदत्तचा काव्यमय चेहरा. अशा वेळी चक्रधर अधिकच व्याकुळ व्हायचा. सुमित्रा हटकून आठवायची. आधाराला हवीहवीशी वाटायची. त्याला जाणवत राहायचं, तिचे आपल्याशी असलेले संबंध आदिम, निरंतर आहेत. आपल्या मनातल्या तळघरात तिनं स्वतःसाठी अत्यंत सुरक्षित जागा तयार केली आहे आणि ते तळघर कुणीही, कधीही उध्वस्त करू शकणार नाही. त्याला खूप वाटायचं की केवळ हे पोस्टर दाखवण्यासाठी तिला एकदा खोलीवर आणावं. ह्या खोलीतच तिनं ते बघण्यात अर्थ .होता. त्यानं पत्रात ह्या पोस्टरविषयी तिला लिहिलं होतं आणि शेवटी ती ओळ: ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?

चक्रधरच्या मनात आलं, एकदा का सुमित्रानं आत प्रवेश केलाय तर ती आता विश्वासारखी सतत विस्तारत राहणार. म्हणून पाय हलवायचे थांबवून तो कॉटवरून उठला. अंगात शर्ट चढवून त्यानं पायात स्लीपर्स सरकवल्या आणि तो खोलीबाहेर पडला.

या कादंबरीची खरेदी करण्यासाठी खालील बॅनरवर क्लिक करा. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..