लेखक : अरविंद रे
प्रकाशक : संधिकाल प्रकाशन
कादंबरी
पाने : ३७०
किंमत : रु.४००/-
सवलत किंमत : रु.३५०/- (पोस्टेजसहित)
त्वरित खरेदीसाठी क्लिक करा.
‘सात पावलं उलटी’ या पहिल्या कादंबरीत अरविंद रे यांनी व्यक्ती आणि विवाहसंस्था या दोहोंतील नात्याचा मनोज्ञ वेध घेतला होता. ‘दिसें वांयां गेलों’मध्ये रे कुटुंबसंस्थेच्या मर्यादा ओलांडून समूहाच्या पातळीवर उतरले आहेत. सत्तरीच्या दशकात वयात आलेली तरुण मुलं आणि त्यांच्या जगण्याचं भान या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. मात्र ते सत्तरीच्या दशकापुरते मर्यादित नाही.
मूल्ययुक्त जगण्याच्या अतीव ओढीनं ही मुलं सतत ‘फार खरं’ राहण्याचा प्रयत्न करतात. भोवताली चालू असलेल्या ढोंगात सामील व्हायला नकार देतात आणि या प्रयत्नात परिघावर फेकली जातात.
त्यांच्या या प्रवासात जे प्रश्न उद्भवतात, ते संपूर्ण पिढीचे प्रश्न आहेत. हे अस्तित्वाबद्दलचे प्रश्न तिरपागडे आहेत आणि त्यांची न सापडणारी उत्तरेही येथे आहेत. मागच्या पिढीचा प्रभाव आणि त्यातून बाहेर पडण्याची धडपडही येथे आहे. ही पिढी कवितेपासून लैंगिकतेपर्यंतच्या अनेक अनुभवांना असांकेतिक रीतीने भिडू पाहते आणि या प्रयत्नात वाया जाते. पण हे वाया जाणे खोलवरच्या शहाणपणातून निर्माण झाले आहे.
चक्रधर, या कादंबरीचा नायक, अशा पिढीचा प्रतिनिधी आहे. तो समूहात असूनही एकाकी आहे. माणसामाणसांमधले दुराव्याचे संबंध त्याला अस्वस्थ करतात. समूहाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करता करता नातेसंबंधांच्या अर्थपूर्णतेचाही तो सतत शोध घेत राह आणि असा शोध घेताना कळत-नकळत जखमी होत राहतो.
चक्रधरचा आणि त्याच्या पिढीचा हा प्रवास अरविंद रे यांनी मोठ्या ताकदीने चित्रित केला आहे. पात्रांच्या मनातील आंतरिक गुंत्यावरची नजर ढळू न देता समूहाच्या पातळीवरच्या त्यांच्या हालचालीचे चित्रण करणे हा त्यांच्या अनौपचारिक निवेदनशैलीचा विलोभनीय विशेष आहे. रे यांची अवकाशाविषयीची प्रगल्भ जाणीव कादंबरीला अर्थसंपृक्त करते.
‘दिसें वांयां गेलों’ हा समकालीन कादंबरीची नवी परिमाणे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
‘दिसें वांयां गेलों’ या कादंबरीचा ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक हरिश्चंद्र थोरात यांनी करुन दिलेला हा अल्प परिचय…
त्वरित ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा.
प्रकाशक संपर्क :
संधिकाल प्रकाशन
ए / ४०१, राज्वी पॅलेस, इंद्रलोक – ३, नवघर, भाईंदर (पूर्व) ४०११०५
भ्रमणध्वनी : 98205 95282
ईमेल : arvindj0101@gmail.com
गुगल पे : 98205 95282
Leave a Reply