टायफॉइड- उलट्या होणे, पोट दुखणे आणि मुख्यतः ताप येणे ही टायफॉइडची लक्षणे. तापाची तीव्रता काही रुग्णांमध्ये कमी असते तर काहींमध्ये अगदी थंडी भरून खूप ताप येतो. थकवा खूप येतो. खोकलाही असू शकतो. सहसा हा आजार जीवघेणा नसतो, पण बरा होण्यासाठी बरेच दिवस किंवा आठवडेही लागू शकतात. औषधांना दाद न देणाऱ्या टायफॉइडमध्ये दहा ते चौदा दिवस शिरेतून इंजेक्शने द्यावी लागू शकतात. टायफॉइड होऊ नये म्हणून दोन वर्षांच्या वयानंतर लस टोचून घेता येते. ती दर तीन वर्षांनी पुन्हा घ्यावी लागते.
कावीळ- ‘ए’ आणि ‘ई’ प्रकारच्या काविळीची लागण दूषित अन्नपाण्यातून होते. उलट्या, ताप, भूक मंदावणे, थकवा येणे, पोटदुखी, डोळ्यांचा व लघवीचा रंग पिवळा होणे ही लक्षणे आपल्या परिचयाची आहेत. रक्तस्राव होणे, संभ्रमावस्था किंवा बेशुद्धावस्था अशी गंभीर लक्षणे फारच थोड्या रुग्णांमध्ये दिसतात. पण कावीळ बरी व्हायला महिना-दीड महिन्याहूनही जास्त वेळ लागू शकतो.
काविळीच्या रुग्णाने मांसाहारी पदार्थ, पक्वान्ने, तळलेले पदार्थ खाणे टाळावेत. रोजचे साधे जेवणे, ताक, फळे असा आहार ठेवावा. ग्लुकोजचे पाणी किंवा सरबत भरपूर पीत राहावे. दीड वर्षाच्या वयानंतर सहा महिन्याच्या अंतराने दोनदा टोचण्याची ‘ए’ काविळीची लस मिळते. तेव्हा घेतली नसल्यास नंतरही घेता येते.
सर्वांनी कायम उकळलेले किंवा शास्त्रोक्त पद्धतीने निर्जंतूक केलेलेच पाणी पिणे, बाहेरचे विशेषतः न शिजवलेले (कांदा, कोशिंबीर, भेळपुरी) व अस्वच्छपणे हाताळलेले (वडा-पाव) खाणे टाळणे, घरात व बाहेरही खाण्यापूर्वी हात साबण लावून धुणे, नखे कापलेली ठेवणे अशा साध्या उपायांनी त्रासदायक आजार टाळता येतील. लहान मुलांच्या घरातील फरशी निर्जंतूक द्रव्याने पुसणे, त्यांची खेळणी, त्यांचे हात सारखे साबण लावून वरचेवर धुणे, त्यांना बाटलीने दूध न पाजणे अशा गोष्टी काटेकोरपणे करायला हव्यात.
-डॉ. योगेन्द्र जावडेकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply