नगटाच्या हाडाजवळ दुखणे ही एक सहजसामान्य तक्रार असते. त्यात हे दुखणे नजरेसमोर असल्याने आणि रोजच्या कामात व्यत्यय आणणारे असल्याने रुग्णांच्या लवकर लक्षात येते. मनगटाचा सांधा पिचल्यानंतर योग्य बसविला न गेल्यास रेडीयस या हाडाची लांबी कायमची कमी होते. सांध्याची हालचाल पूर्वीपेक्षा कमी होते व सांध्याची रचना बदलल्याने होणाऱ्या अयोग्य हालचालीमुळेही हा सांधा दुखू लागतो.
याच सांध्यात संधीवाताच्या होणाऱ्या उद्रेकानेही सांधा दुखू लागतो व कडक होतो. रेडीयस या हाडात मध्यमवयात कॅन्सर (ऑस्टिओक्लॉस्टोमा) होऊ शकतो. हा कमी धोकादायक असल्याने हे रेडियसचे भाग काढून टाकून त्या जागी गुडघ्याजवळचा फिब्युनचा भाग कलम केला जातो. मनगटाजवळ बोटे हलविणारे अनेक कंडार (टेंडन) बाहेरच्या बाजूस एका ओळीत बसविले आहेत. त्यांची हालचाल सुरळीत व्हावी म्हणून प्रत्येक टेंडनसाठी एक बोगदा बनविला आहे. त्यातून हे टेंडन पुढे-मागे हलतात व आपल्या बोटांची हालचाल होते.
अंगठ्याची हालचाल आपण सर्वाधिक करतो. त्या अंगठ्याला हलविणारे तीन टेंडन असतात. त्यांना धरणारे बोगदे .त्यावरचे आवरण जाडे झाल्याने आकुंचित पावतात व अंगठा हलविताना दुखू लागतो. या प्रकाराला ‘डिकरव्हाज डीसीज’ म्हणतात.
योग्य फिजिओथेरपी व एखाद-दुसरे हायड्रोकॉर्टीसोन इंजेक्शन दिल्याने हे दुखणे बरे होते. पुनः पुन्हा हे दुखणे उद्भवले तर मात्र शस्त्रक्रिया करून हे बरे करतात. मनगटाजवळ पुढे किंवा मागे बऱ्याच जणांना गाठी तयार होतात. या कधी कधी दुखूही लागतात. या गाठी कधी आपोआप लहानही होतात. अशा गाठींनी गंडिका (गँगलिऑन) असे नाव आहे. डॉक्टर यातही कधी कॉर्टिसोन इंजेक्शन देतात. फारच त्रास देणाऱ्या गाठी शस्त्रक्रिया करून काढून टाकल्या जातात. मनगटाजवळ जर एखाद्या धारदार भागाने इजा झाली तर बोटे हलविणारे टेंडन तुटू शकतात. योग्य डॉक्टरकडून शस्त्रक्रिया करून हे टेंडन शिवता येतात व बोटे पूर्ववत हलू लागतात.
डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply