अणुऊर्जानिर्मितीत वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारचा किरणोत्सर्गी कचरा निर्माण होत असतो. हा कचरा द्रवरूप, घनरूप वा वायुरूप असू शकतो. त्याचं रासायनिक स्वरूप वेगवेगळं असू शकतं. तसंच त्याच्या किरणोत्सर्गाचं प्रमाणही वेगवेगळं असू शकतं. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हे त्या कचऱ्याच्या या सगळ्या गुणधर्मावरून नक्की केलं जातं.
या सर्व प्रकारच्या कचऱ्यापैकी, वापरलेल्या इंधनातून युरेनिअम व प्लुटोनिअम ही उपयुक्त मूलद्रव्यं वेगळी करण्याच्या रासायनिक प्रक्रियेत निर्माण होणारं पाणी, हा सर्वात जास्त किरणोत्सारी कचरा असतो. अणुइंधनाच्या विखंडनात निर्माण झालेल्या विविध मूलद्रव्यांची किरणोत्सारी अणुकेंद्रकं ही या पाण्यात जमा झालेली असल्याने, या जलस्वरुपी कचऱ्याला तीव्र किरणोत्सार प्राप्त होतो.
सिलिका, बोरॅक्स, सोडियम नाटट्रेट यासारख्या संयुगांच्या मदतीने आणि उच्च तापमानाचा वापर करून अशा कचऱ्याचं, रासायनिकदृष्ट्या स्थिर असलेल्या आणि संरचनेच्या दृष्टीने मजबूत अशा विशिष्ट प्रकारच्या काचेत रूपांतर केलं जातं. या काचेतील किरणोत्सर्गाचं प्रमाण कमी होईपर्यंत ही कचरायुक्त काच विशेष कक्षांत साठवली जाते. काही दशकांच्या साठवणीच्या कालावधीनंतर ही काच शेकडो मीटर खोल, पाण्याच्या संपर्कात न येणाऱ्या तसंच भूगर्भीयदृष्ट्या स्थिर असणाऱ्या, अशा जमिनीखालील सुरक्षित जागी पुरली जाईल.
कमी किरणोत्सारी असणाऱ्या जलस्वरूपी कचऱ्याच्या बाबतीत, सिमेंटसारखा पदार्थ टाकून त्याचं घनरूपी पदार्थात रूपांतर केलं जातं. सिमेंटमध्ये बंदिस्त झालेला हा घनरूपी कचरा काळजीपूर्वक निवडलेल्या अशा ठिकाणच्या जमिनीखाली, काही मीटर खोलीवर, क्राँक्रिटच्या विशेष जलरोधक कक्षांत गाडला जातो.
मुळच्याच घनरूपी असणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट काहीशी अशाच प्रकारे लावली जाते. वायुरूपी कचऱ्याच्या बाबतीत, हा वायु त्यातील घन स्वरूपाचे किरणोत्सर्गी कणःपदार्थ काढून टाकण्यासाठी विशेष प्रकारच्या गाळण्यांतून गाळला जातो. तसंच सक्रिय कोळशासारख्या विविध पदार्थाच्या संपर्कात आणून या वायुतील किरणोत्सर्गी आयोडिनसारखे अणु-रेणू वेगळे केले जातात. त्यानंतरच हा वायु चिमणीद्वारे नियंत्रित प्रमाणात हवेत सोडला जातो.
Leave a Reply