खर म्हणजे मला सिनेमा वगैरे यात फार आवड नाही पण एखाद्या सिनेमा विषयी तो ही मराठी असेल तर मी त्याबद्दल काही माहिती पेपरमध्ये आले तर वाचते. यात दिठी या सिनेमाची कथा आहे दि. बा. मोकाशी. दिग्दर्शन मा. सुमित्रा भावे. रामजी किशोर कदम लोहारकाम करतात. तीस वर्षे पंढरीची वारी न चुकता केलेली आहे. मुसळधार पावसामुळे नदिला आलेल्या पुरात तरुण मुलगा वाहून जातो. या धक्क्यातून न सावरता येणारी सून अकाली प्रसुति होते. नात जन्माला आली तरी रामजी यांना हे सगळे नको आहे. रामजीची चेतना. संवेदना. आनंद दु:ख या सगळ्या गोठून गेल्या आहेत. अतिव दु:ख. आणि एक सारखा शून्यात नजर. डोळ्यात टिपूस नाही. विठ्ठलावर रागावला आहे. वारीचे हेच फळ. भक्ती. देवाचे अस्तित्व आहे का असे प्रश्न पडलेले आहेत आपणही असेच रागावतो. देवावर अविश्वास दाखवतो. तो जागचा हलत नाही. त्यामुळे त्याचे तीन मित्र मोहन आगाशे. दिलीप प्रभावळकर. गिरीश कुलकर्णी हे त्याला गावातील पोथीपारायणाला नेण्यासाठी खूप धडपड करतात पण हरवलेला रामजी. मूळ बधिर झाला आहे. आणि एक अघटित घटना घडते. अमृता सुभाष. शशांक शेंडे यांच्या गोठ्यातील गायीला प्रचंड कळा येतात. त्याला आर्ततेने विनवणी करतात. तेव्हा कर्तव्य म्हणून तो जातो व तिची सुटका करतो. आणि जन्म मरण म्हणजे काय असते याची संकल्पना स्पष्ट होते म्हणून तो पारायणाला जातो पण त्या आधी तो मनसोक्त रडतो. त्यामुळे मन मोकळे होते….
आता तसं पाहिल तर आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात पण मला रामजी मध्ये एक वेगळीच दिठी म्हणजे दृष्टी दिसते. घर. समाज. राष्ट्र. देवाची भक्ती या सगळ्या मध्ये आपला काही स्वार्थ असतो का? की नाही? असेल तर रामजी माणूस म्हणून बरोबर आहे आणि नसेल तर मग तो दु:खी का आहे?खूप वेळ विचार करत होते. स्वतःचे व अनेक लोकांचे अनुभव आठवले. आणि वाटले की आपण सामान्य माणसं हे सगळं नाही समजू शकत. पण अशी अवस्था मात्र नक्कीच होते. फक्त आभाळच नाही तर मन देखिल मोकळे असावे लागते. म्हणून डोळातील पाण्यालाही मोकळे पणाने वाहू द्यावे लागते ही दिठी मला दिसली….
यातील एक फारच महत्वाचा भाग म्हणजे. एका मित्राची चप्पल चिखलात चालताना तुटते म्हणून तो रागारागाने पुरात फेकून देतो आणि लगेचच दुसरी चांगली चप्पल तीही पुरात भिरकावून देतो. इथे समजले की जे चांगले नव्हते ते गेले. किंवा जे जायचे होते ते गेले. जे चांगले आहे त्याचा उपयोग नाहीआणि तेही जाणारच आहे मग कशाला अडकून पडायचे त्यात? बरोबर आहे ना जे आपलं नव्हतेच त्यात गुंतायचं नाही. आणि जे आहे त्यातही गुंतायचं नाही. खूप छान वाटले वाचून. आणि माझेही मन मोकळे झाले…
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply