कॉंग्रस पक्षात यापुढे लोकशाही मार्गाने आणि निवडणूक प्रक्रियेद्वारे नेतानिवड होणार असे पक्षाचे सरचिटणीस राहूल गांधी यांनी गडचिरोली येथे सांगितले.
जो लोकांमध्ये मिसळेल, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटेल, पक्षात निष्ठेने काम करील अशा सच्च्या कार्यकत्र्यांना यापुढे पक्षात पद आणि सन्मान मिळेल, घराणेशाहीला नाही अशी ग्वाहीही त्यांनी आज येथे दिली.
राजकारण चांगलं आहे, असे म्हणणारा युवक देशात मिळणे कठीण झाले आहे. राजकारण व राजकारण्यांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वाईट आहे. त्यामुळे लोकांमध्ये मिसळेल, त्यांच्या सुखदु:खात समरस होईल, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटेल, अशा तरुणांना राजकारणात आणणे गरजेचे झाले आहे. जे राजकीय कुटुंबातील नाही, ज्यांच्यावर राजकीय वरदहस्त नाही. मात्र सामान्य लोकांचा ज्यांच्यावर विश्वास आहे, अशांचा शोध या निमित्ताने घेऊन त्यांना पक्षात स्थान दिले जाईल, असंही ते म्हणाले.
एका अर्थाने आपल्या पक्षात घराणेशाही आहे याची स्पष्ट कबुली राहूल गांधी यांनी दिली आहे. याचे दूरगामी परिणाम एकूणच देशाच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. राहूल गांधी यांनी आपल्या या वक्तव्यातून अनेक पक्षी घायाळ केलेले दिसतात. स्वपक्षातील आत्मकेंद्रित नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना वेसण घालता घालताच. आता त्यांच्या पोराबाळांचे लाड कॉंग्रेसमध्ये होणार नाहीत याची जाणीव त्यांनी करुन दिली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांनाही त्यानी हाच निरोप दिला आहे. याचाच परिपाक म्हणून कदाचित विरोधी पक्षांमधील घराणेशाहीलाही आवर घातला जाण्याची शक्यता आहे.
राहूल गांधी यांचे विचार चांगले आहेत, मात्र कॉंग्रेसजनाना ते आचरणात आणणे शक्य आहे का याचा विचार केला गेला पाहिजे.
पंडित नेहरुंच्या मृत्युपासून कॉंग्रेस पक्षात घराणेशाहीचाच कारभार आहे हे संपूर्ण देशाने अनुभवलेय. श्रीमती इंदिरा गांधी या पंडित नेहरुंच्या कन्या असल्या तरीही त्यांनी आपली एक स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली. इंदिराजींच्या कर्तृत्वामुळे कोणताही शहाणा माणूस त्यांच्याकडे पंतप्रधानपद
येण्याच्या घटनेला घराणेशाहीची उपमा देणार नाही. त्यांच्या खंबीर नेत्तृत्वाखालीच भारताने पाकिस्तानचा पराभव करुन स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीत मोलाचा वाटा उचलला होता. मात्र त्यानंतरच्या काळात स्वर्गीय संजय गांधींचा राजकीय
पटलावरील उदय हा कॉंग्रेसमधील घराणेशाहीचाही उदय म्हणून बघितला गेला. इंदिराजींच्या हत्येनंतर सहाजिकच शोकाकूल भारतातून सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट उसळली आणि त्या लाटेतच कॉंग्रेस पक्षाने खर्या अर्थाने घराणेशाहीकडे मार्गक्रमण सुरु केले. फार मोठी राजकीय कारकिर्द पाठीशी नसतानाही राजीव गांधी पंतप्रधान झाले. राजीवजींनीही भारताला एक नवी दिशा दिली. आज जर भारत आयटी क्षेत्रात सुपरपॉवर होत असेल तर त्याचं संपूर्ण श्रेय राजीव गांधी या एकाच माणसाचं आहे हे विसरुन चालणार नाही.
राजीव गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर हे पद सोनिया गांधींकडे चालत आले होते. मात्र त्यांच्यातील धूर्त आणि चाणाक्ष राजकारण्याने घराणेशाहीच्या आरोपांचा धोका ओळखला. स्वत:कडे पद न घेउनही भारताच्या राजकारणाची सर्व सुत्रे आपल्याकडेच रहातील अशी व्यवस्था त्यांनी केली. त्याचबरोबर कॉंग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वत:कडे ठेवून पक्षावरही आपला ताबा ठेवला. मात्र त्यानंतर
सर्वच कॉंग्रेसजनांच्या आशा-आकांक्षाना बळ मिळाले आणि जो तो आपली संस्थाने बांधायच्या तयारीला लागला. बायको. मुलगा, मुलगी, सून, जावई, मेहूणा, सासू, सासरा, पुतण्या, पुतणी… सगळ्याच जवळच्या नातेवाईकांना काही ना काही अधिकारपद मिळवून देण्याची शर्यतच त्या पक्षात सुरु झाली.
एकेकाळी भारतात शास्त्रीय संगीतातील घराण्यांचा दबदबा होता. यामध्ये ग्वाल्हेर, जयपूर, लखनौ, किराणा वगैरे घराणी आघाडीवर होती आता राजकारणातली घराणी तयार झाली. संगीतातली घराणी आता कदाचित मागे पडली असतील पण ही नवीन घराणी घोडदौड करतच आहेत. देशभरातील किमान शंभरएक मतदारसंघातली घराणी केवळ कॉंग्रेस पक्ष आणि त्याचे उप-पक्ष यांच्याशी संबंधित असतील. काही घराण्यांमध्येतर अंतर्गत यादवीतून मुलगी की पुतण्या असेही वाद चर्चेत येताना दिसतात. काही ठिकाणी तर दोन-दोन संस्थानिकांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचेही प्रयत्न होताना दिसतात.
आता राहुल गांधी यांनी स्वत:च घराणेशाहीला विराम देण्याची भाषा केल्याने या संस्थानिकांना घाम फुटायला लागणे सहाजिकच आहे. पण त्यांना खरेतर काळजी करण्याची काहीच गरज नाही. कॉंग्रेसमधील घराणेशाहीला असा अचानक ब्रेक लागणे शक्य नाही यांची त्यांनाही पूर्ण कल्पना आहे. या गोष्टी केवळ टाळ्या मिळवण्यासाठी बोलायच्या असतात हे सगळ्याच राजकारण्यांना माहित आहे.
आणि समजा राहूल गांधींनी ही घराणेशाही स्वच्छता मोहिम अगदी मनावर घेतलीच तरीही आमच्या नेत्यांना काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना एक मोलाचा सल्ला जाताजाता देउया. Charity begins at home! या न्यायाने राहूलजींनाही सांगून टाका की बाबा आम्ही आमची घराणेशाही संपवतो पण तुमचे काय? तुम्हीही एकदा सांगून टाका ना की मला स्वत:लाही घराणेशाही नकोय. मला पंतप्रधान वगैरे काही व्हायचे नाही. पक्षात कितीतरी आजोबा आणि काका आहेत.. त्यांच्याही इच्छा पूर्ण होउ द्या. होउन दे त्यांना पण पंतप्रधान!
सांगतील का असं हे सगळे कॉंग्रेसजन राहूलना? होतील का राहूलजी याला तयार? तयार झालेच चुकुनमाकून तर देशासाठी सोनियाचा दिवस. ९९ टक्के शक्यता अशीच आहे की भारताला हा सोनियाचा दिवस बघायला मिळणार नाही…. “सोनिया”पुत्राचा दिवस मात्र नक्कीच बघायला मिळेल.
आपल्याला काय वाटतं?
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply