शंकर रामाणींच्या भाषेत “देहयात्रेत गुंतलेल्या ” आपणां सर्वांना कोरोना नावाच्या तमाने अस्तित्वाच्या तळाशी नेऊन ठेवले पण काल सरलेल्या दीपोत्सवाने सर्वदूर भान देणारे दिवे लावले आणि आपले तळ उजळून निघाले.
बोरकरांच्या प्रदेशात जन्मलेला हा कवी आपल्या रचनांच्या बाबतीत मात्र नागपूरच्या ग्रेसकडे झुकलेला होता. काव्य हे दालन सोडून साहित्याच्या इतर कोठल्याही प्रांतात मुशाफिरी न करणारा हा काव्यव्रती- निर्वाणासाठी इंदिराबाई संतांचे बेळगांव निवडता झाला.
बोरकरांची निसर्ग कविता तर संतांची सुस्पष्ट भावकविता या दोन पठारांना जोडणारा हा कवी त्याच्या चित्तवृत्तीप्रमाणेच आत्ममग्न, उदासीचे किनारे लेऊन प्रवाहामध्ये होड्या वल्हवित होता. मराठी मुलखाला त्याची एकच ओळख-
” दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले’!”
हा तम कोणता, सापडत नाही. पण असतोच तो प्रत्येक उजेडाच्या क्षणांपाशी. त्याचा वेढा सुटत नाही, कालांतराने त्याचे काचणे काहीसे अंगवळणी पडत असेलही कदाचित पण सुटका मात्र नाही.
संथ जलाशयाच्या तरंगांइतकेच स्थिर पंडीत अभिषेकी गायलेत- ” जिणे गंगौघाचे पाणी ” त्यांना पाठ आहे. त्यामानाने पद्मजा फेणाणी थोडं द्रुत आणि लघुरूप गायल्या आहेत.
समानुभूती म्हणजे दुसऱ्याशी पूर्णतया सहमत होणे नसते. ते असते दुसऱ्याचे सोसणे जाणवणे, त्यांच्या भिंगातून दिसणारे जग स्वीकारणे (भलेही ते आपल्या विश्वाच्या विषुववृत्तापासून अगणित सूर्यमाला दूर असेल.) समानुभूती म्हणजे दुसऱ्यांच्या अनुभवांवर स्वतःची मालकी सांगणे नसते- ते त्यांचेच राहू द्यावेत. आपण फक्त त्यांचे “वाटणे” स्वतःकडे ठेवावे आणि ते स्वीकारावे. कदाचित आपण त्यांच्या जागी असतो तर तसेच वागलोही असतो.
रामाणींनी शाश्वत, मूर्त शब्द वापरून हा सगळा अनुभवच जिवंत केलाय.
आणि अचानक लक्षात आले- आपणही सध्या सगळ्यांमध्ये दिवे शोधत असतो. क्षणभंगूर प्रकाश दिला की उरतोच मग अजस्त्र काळोख. मग कोणीतरी पणती घेऊन येतो-
” रात भर का है मेहमान अंधेरा
किस के रोके रूका है सवेरा ”
रामाणी फक्त कन्फर्म करतात – प्रत्येक तमाच्या तळाशी दिवे असतातच !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply