नवीन लेखन...

दिवासुंदरी

दिवाळीच्या दिवसातील संध्याकाळची वेळ होती. अंधार पडू लागला होता. वडिलांनी बोलावल्यावर बारा वर्षांची गीता डाव्या हातात मेणबत्ती घेऊन उजव्या हाताने ती विझू नये म्हणून त्याचा आडोसा धरुन त्यांच्या खोलीत येऊ लागली. वडिलांनी तिला त्या पोजमध्ये पाहिले आणि आहे तिथेच उभे रहाण्यास सांगितले. गीता गोंधळून गेली, मात्र तिचे वडील तिच्याकडे पहात नवीन चित्राचा विषय मिळाल्याच्या आनंदात होते. बारा वर्षांच्या गीताने पहिल्यांदाच गुलाबी रंगाची साडी नेसली होती. मेणबत्तीचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. मागच्या भिंतीवर पडलेल्या तिच्या सावलीमुळे तिचे सौंदर्य उठावदार दिसत होते. उजवा हाताचा मेणबत्तीला आडोसा केल्यामुळे ती पाचही बोटे प्रकाशमान झाली होती. वडिलांनी मनाशी पक्के ठरविले की, हे चित्र लवकरच काढायचे.

त्या बारा वर्षांच्या गीताचे वडील म्हणजेच ज्येष्ठ चित्रकार व कलागुरू सावळाराम लक्ष्मण हळदणकर! १९२९ साली काढलेले ते ‘ग्लो आॅफ होप’ हे चित्र आज म्हैसूर येथील जगमोहन पॅलेस मधील जयचमा राजेंद्र आर्ट गॅलरीत पहायला मिळते. हळदणकरांना हे चित्र काढण्यासाठी, गीताला रोज तीन तास असे तीन दिवस समई हातात धरुन त्या पोजमध्ये उभे करावे लागले होते.

या चित्राचे एक दुर्दैव असे आहे की, कित्येकजण या चित्राचे श्रेय राजा रविवर्माला देतात, जे चुकीचं आहे.

कोकणातील सावंतवाडी येथे १८८२ साली हळदणकरांचा जन्म झाला. त्यांना उपजतच चित्रकलेची आवड होती. वयाच्या तिसऱ्या वर्षी पितृछत्र हरविल्यामुळे त्यांचे बालपण हलाखीत गेले. शालान्त परीक्षेपर्यंतचं त्यांचं शिक्षण सावंतवाडीतच झालं. तेथील कलाशिक्षक एन. एस. मालणकर यांनी सावळाराम यांचे कलागुण हेरले व त्यांना ग्रेड परीक्षा देण्यासाठी उत्तेजन दिले. सावळारामांनी ग्रेड परीक्षा दिली. त्यावेळच्या ग्रेड परीक्षेतील प्रत्येक विषयात ते पहिले आले होते, यावरुन त्यांच्या चित्रकलेचे व बुद्धीमतेचे कौशल्य कळते.

१९०३ साली वयाच्या एकविसाव्या वर्षी ते मुंबईत आले. जे. जे. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्यांनी प्रवेश परीक्षा दिली व प्रवेश घेतला. तेथे त्यांना कलाशिक्षक गणपतराव केदारी व त्रिदांद हे लाभले. आगास्कर, वाॅल्टर रोब्रोथॅम यांचे मार्गदर्शन मिळाले.

१९०७ पासून त्यांचे चित्रकार म्हणून नाव होऊ लागले. १९०८ मध्ये हळदणकरांनी मुंबईतील दादर येथे नव्या पिढीला चित्रकलेचे शिक्षण देण्यासाठी वर्ग सुरु केले. कालांतराने हा वर्ग ‘हळदणकर फाईन आर्ट इन्स्टिट्युट’ नावाने आॅपेरा हाऊस येथील केनेडी ब्रीजजवळ स्थिरावला. सावळाराम निवृत्त झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव गजानन हळदणकर यांनी निष्ठेने वर्ग घेणे चालू ठेवले.

१९०७ पासून हळदणकर यांची चित्रे मुंबई, चेन्नई, कोलकाता, सिमला येथील प्रदर्शनात झळकू लागली. त्यांच्या चित्रांना मोठमोठ्या राजवाड्यांच्या कलासंग्रहात स्थान मिळू लागले.

हळदणकरांच्या चित्रांचे विषय मुख्यत्वे व्यक्तिचित्रं, निसर्ग व पौराणिक असायचे. त्यांच्या ‘ग्लो आॅफ होप’, ‘निरांजनी’, ‘अमिरी इन फकिरी’ या सारख्या निवडलेल्या साध्या विषयातून व्यापक दृष्यानुभव व्यक्त होताना दिसतो.

त्यांची काही व्यावसायिक चित्रेही नावाजलेली आहेत. यात नाना शंकरशेठ, मफतलाल गगनभाई, शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे, इ. प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता.

१९६२ साली दिल्लीच्या ‘ललित कला अकादमी’ने हळदणकरांना फेलोशिप देऊन सन्मानीत केले होते.

१९६४ साली हळदणकरांनी भारत सरकारसाठी मदन मोहन मालवीय यांचे व्यक्तिचित्र केले होते. त्याबद्दल त्यांचा राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता.

भारतातील ब्रिटीश राजवटीच्या काळात त्यांनी देशातील अनेक ठिकाणी कला संस्था स्थापन केल्या. तरीदेखील त्यांच्या संस्थांवर इंग्रजांचेच प्राबल्य होते. याबाबत त्याकाळात कार्यरत असणाऱ्या मुंबईतील काही भारतीय चित्रकार व शिल्पकार यांच्या मनात तीव्र नाराजी होती. यातूनच पुढे सावळाराम हळदणकर व त्यांचे सहाध्यायी परांडेकर तसेच शिल्पकार बाळाजी तालीम यांनी एकत्र येऊन होतकरू कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था स्थापन केली.

जलरंग व तैलरंग यावर प्रभुत्व असलेला हा महान कलागुरू ३० मे १९६८ रोजी अनंतात विलीन झाला.

आजही कधी अचानक लाईट गेल्यावर घरातील स्त्रीने मेणबत्ती पेटवून हातात धरलेली दिसली की, हळदणकरांची गीता आठवते….

 – सुरेश नावडकर 
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..