जसे आपण आयुष्य पावसाळ्यात मोजतो, त्याऐवजी खरं तर ते दिवाळीतच मोजायला हवं. म्हणजे अमुकानं पन्नास पावसाळे पाहिले म्हणण्याऐवजी पन्नास दिवाळी पाहिल्या असं म्हणायला हवं, कारण आयुष्यातील प्रत्येक दिवाळी काही ना काही कारणाने आपल्या लक्षात असतेच.
वर्षातून एकदा येणाऱ्या या सणासाठी आपण दोन महिने आधीपासून नियोजन करीत असतो. त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो. लहानपणी शाळेला सुट्टी व गावी जाऊन मौजमजा करण्यासाठी दिवाळी असते. तरुणांना छान छौकीत रहाण्यात, दिसण्यात दिवाळी भावते. संसारी माणसाला दिवाळी म्हणजे वर्षातील सर्वात मोठा खर्चिक सण वाटतो. निवृत्तांना शुगरमुळे इच्छा असूनही गोड खाता येत नाही. वयोवृद्धांना घरातील दिवाळी पहात आपल्या दिवाळ्यांची उजळणी करण्याशिवाय पर्याय नसतो.
गेल्या पन्नास वर्षांत सारं काही बदलून गेलंय. आमच्या लहानपणीसारखे गावी जाण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. ती जुनी पिढी इतिहासजमा झाल्याने आता गावी जाण्याची उत्सुकता कुणालाही नाही. आता दिवाळी सुट्टीत कोकणात किंवा एखाद्या हिलस्टेशनला जाण्याचं नियोजन केलं जातं.
पूर्वी घरात फराळाचे पदार्थ आवडीने केले जायचे. वाड्यात एकमेकांना फराळाची ताटं भरुन दिली-घेतली जायची. आताची पिढी तयार फराळ आणणे पसंत करते. त्यातूनही अलीकडच्या मुलांना हे पदार्थ फार काही आवडत नाहीत. त्याऐवजी पिझ्झा, पास्ता जवळचे वाटतात, त्यांची आॅनलाईन आॅर्डर देणं त्यांना अधिक आवडतं.
‘अभ्यंगस्नान’ हा शब्द अलिकडच्या पिढीला ओळखीचाही वाटणार नाही. कारण शाॅवर खाली उभं राहूनच ज्यांनी बारा महिने आंघोळ केली आहे, त्यांना उटणे आणि तेल लावून अंग चोळून घेणे काय कळणार? आमच्या लहानपणी माझी काकी तेल उटणे लावायची, ते कितीही वेळ करुन घेतले तरी अजून जास्त केले तर बरं होईल असंच वाटतं रहायचं. तो उटण्याचा वास अजूनही स्मरणात आहे.
फटाके हे आकर्षण लहानांपासून मोठ्यांपर्यंत असतंच.
लहानपणी वडिलांनी कितीही फटाके आणले तरी ते कमीच वाटायचे. त्या मोजक्याच फटाक्यांची भावाभावात समान वाटणी व्हायची. पहाटे आंघोळ करुन पहिला फटाका कोण लावतो यामध्ये चुरस असायची.
त्यावेळच्या फटाक्यांचे ब्रॅण्ड आता पाहायलाही मिळणार नाहीत. सुतळी अॅटमबाॅम्बवर राक्षसी गोरीलाचं चित्र, मोठ्या उभ्या फटाक्यांवर लक्ष्मी, कॅप्टनचं चित्र, छोट्या माळेवर ताजमहाल, लाल किल्ला यांची चित्रं असायची. बाण, राॅकेटवर हेमामालिनी, रेखा दिसायची. चमनचिडी म्हणजे बाणाप्रमाणेच आकाशात जाणारी डबी असायची. कावळा म्हणजे त्रिकोणी फटाके असायचे. अगदी सामान्य फटाका म्हणजे लवंगीचा पुडा. दहा माळेचा तो पुडा लाल किंवा हिरव्या पतंगी कागदात सोनेरी लेबल लावून पॅक केलेला असायचा. त्यावर खारीचं चित्र असायचं. ती माळ लावल्यावर त्यातील सगळे फटाके वाजतीलच याची खात्री नसे. नागगोळी लावली की प्रचंड धूर होऊन रांगेची काळी नळी भर्रकन बाहेर पडायची. टिकल्या पक्कडीच्या चिमटीत घालून आपटायला मौज वाटायची. टिकलीचा रोल टाकून पिस्तोल वाजवताना स्वतःला जेम्स बाॅण्ड झाल्यासारखं वाटायचं. फुलबाज्या या फक्त मुलीच उडवतात असा एक समज होता. पाऊस लावून पहाणे मजेशीर वाटायचं. मोठे पाऊस मातीचे गोल आकाराचे, छोटे त्रिकोणी उभे वात काढलेले असायचे. आपटबार जमिनीवर आपटला की, मोठ्ठा आवाज यायचा. फटाके संपले की, गावी असताना न उडालेले फटाके जमा करायचे. त्यातील दारु कागदावर काढायची. मग त्याची पुडी करुन त्यावर एक चपटा दगड ठेवायचा व उंचावर उभं राहून त्यावर मोठ्ठा दगड टाकल्यावर कानठळ्या बसतील असा आवाज यायचा. कधी शेकोटीत असे फुसके फटाके टाकले की, ते पेटून कुठेही उडायचे. कधी तेच भुर्रकन अंगावर यायचे. हे सर्व करताना हाताला ती चंदेरी दारू लागून गंधकाचा वास येऊ लागे. आताच्या दिवाळीला फटाक्यांवर बंदी आल्याने प्रदूषण कमी झाले. कदाचित काही वर्षांनंतर फटाके वाजविण्यात कुणालाही स्वारस्य राहणार नाही.
दिवाळीला नवीन कपड्यांची खरेदी हा एक सोहळा असे. कापड घेऊन शिंप्याकडे शिलाईला देणे. त्याला दिवाळीच्या आधी कपडे देण्याचा आग्रह होत असे. मग तो रात्रीचा दिवस करून काम पूर्ण करीत असे. आता रेडिमेडचा जमाना आला. शिलाईच्या दरात तयार शर्ट मिळू लागले. आॅनलाईन खरेदीमुळे दुकानात जाणाऱ्यांची संख्या घटली. दुकानदारांनी तीन शर्ट खरेदीवर पाच शर्टची, तीन पॅन्ट खरेदीवर चार पॅन्टची आॅफर देऊनही त्यांना प्रतिसाद मिळेना.
आमच्या लहानपणी वाड्यात किल्ला तयार करणे व तो पहाण्यासाठी लोकांना बोलावणे याची मौज वाटायची. दहा दिवस आधी केल्यावर त्यावर हाळीव टाकले की, गवत यायचं. मग मंडईतून किल्यावरची चित्रं आणायची. त्यात सर्वात महत्त्वाचे शिवाजी महाराज. मावळे, भाजीवाली, भटजी, पैलवान, तोफ, वाघ, माकड, हत्ती, पोलीस, जवान, रणगाडा, मंदिर, इ. अनेक चित्र मांडताना मुलांच्या कल्पकतेला वाव मिळायचा. नंतर लाकडी किल्ले मिळू लागले. आता तर प्लॅस्टर आॅफ पॅरीसचे रेडीमेड रंगीत किल्ले मिळू लागले.
कुंभाराकडची मातीची चित्रं घेणाऱ्यांची संख्या कमी झाली. आताच्या मुलांना त्या चित्रांपेक्षा परदेशी स्पायडर मॅन, हल्क, इ. अॅव्हेंजर्सच्या खेळण्यात रस वाटू लागला आहे.
पूर्वी भेटकार्ड पाठवून शुभेच्छा पोस्टाने पाठविलेल्या जायच्या. त्याचं उत्तर आलं की समाधान वाटायचं. त्यासाठी पोस्टमनची आतुरतेने वाट पहायचो. आता पोस्टमन गायब झालाय. शुभेच्छा कार्डला स्मार्ट फोनच्या व्हाॅटसअपचा पर्याय आलाय. फक्त आपल्याला आलेली शुभेच्छा ‘काॅपी पेस्ट’ करायची..झालं काम! तो पाहील तेव्हा शुभेच्छा समजून घेईल..त्याला प्रत्युत्तर द्यावं असं वाटलंच तर तो ईमोजी टाकेल किंवा एखादा मेसेज फाॅरवर्ड करेल..यात आत्मियता, आपुलकी नावालाही नसते, असतो तो एक यांत्रिक उपचार!
या वर्षीची दिवाळी संपलेली आहे, पुन्हा नक्कीच भेटूया पुढच्या दिवाळीला….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१७-११-२०.
Leave a Reply