भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि काळोखाला दूर सारण्यासाठी पणत्या आणि समया देवघरात लावल्या जायच्या. त्यांचा प्रकाश मंद आणि आल्हाददायक वाटत असे. त्यापासून कमी उष्णता उत्सर्जित होत असे. दिवाळीत रांगोळी भोवती पणत्या लाऊन ठेवण्याची प्रथा-परंपरा होती. काही काळानंतर इलेक्ट्रिकचा शोध लागला आणि पणत्यांच्या बरोबरीने रंगीबेरंगी प्लास्टिकचे आकाश कंदील आणि बल्बच्या माळा आल्या आणि त्यांच्या ज्वलनाने हवेतील उष्णतेचे प्रमाणही वाढायला लागले. आपण बाजारातून चीनी आकाश कंदील आणून लावण्यापेक्षा स्वत: बनविलेला पर्यावरण पूरक आकाश कंदील लावला तर त्यातून वेगळे मानसिक समाधान मिळते.
असो. दिवाळीचा आणि फटाक्यांच्या तसं बघता काही जवळचा संबंध नाही. तरीही काही काळापासून दिवाळीत फटाके उडवले जातात फोडले जातात. बर दिवाळीतच फोडले जातात म्हंटल तर तसंही नाही कुठल्याही आनंदाच्या क्षणी फटाके फोडून तो साजरा केला जातो पण त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते हे आनंदाच्या भरात आपल्या लक्षात येत नाही.
फटाक्यांचा शोध कसा लागला याचा थोडक्यात इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि दिवाळीत फटाके उडविण्याचे काय प्रयोजन असावं त्याबद्दल थोडसं.
फटाक्यांचा शोध २००० वर्षापूर्वी चीनमध्ये लागला पण नक्की कुठल्या व्यक्तीने लावला याचे काही दस्तऐवज (रेकॉर्ड्स) नाहीत. चीनमध्ये जेवण बनवितांना आचाऱ्याने चुकून चुलीत काही जाळण टाकलं आणि त्याची ज्योत काही वेगळ्या रंगाची दिसली अशी आख्यायिका आहे. काही जण म्हतात की फटाके शोधाचे श्रेय चीनमधील हुनान प्रांतातील एक साधू लिऊ यांग याला जाते.
फटाके बनविण्यासाठी कोळसे, गंधक व बंदुकीच्या दारूचे मिश्रण वापरून फटाक्यांची निर्मिती सुरु झाली. त्यानंतर त्यात सुधारणा होऊन बांबूमध्ये बंदुकीची दारू भरून फटाके निर्मित केली जे फोडल्याने मोठा आवाज होत असे. चीनमध्ये असा एक समज आहे की भूतांना आणि वाईट विचारांना घालविण्यासाठी तसेच त्यांना दूर ठेवण्यासाठी नवीन वर्षांच्या संध्याकाळी फटाके फोडले जात असतं. आपणही दिवाळीच्या पहिल्या अंघोळीच्या वेळी पायाखाली चीरांटे फोडून नरकासुराचा वध केल्याचे मानतो तद्वत चीनमध्ये फटाके फोडून भूतांना आणि वाईट विचारांना घालवले जाते असा समज आहे, का होता? माहित नाही.
दिवाळी म्हणजे फटाके आणि आवाज हे एक समीकरणच झाले आहे. मोठमोठया फटाक्यांच्या माळा, अॅटमबॉंब फोडणे म्हणजे अनेक सणां-उत्सवांचे, आनंद व्यक्त करण्याचे, जल्होष करण्याचा स्टेटस् सिम्बॉलचा झाला आहे. तेव्हांचे फटाके आणि आत्ताचे फटाके यात थोडाबहुत बदल झाला असेल पण त्यात काही सुधारणा करून अधिक रंगीत, आकर्षक आणि कमी धुराचे आणि प्रदूषण मुक्त फटाके तयार केल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. पण फटाके फोडल्यानंतर फटाक्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या रासायनिक प्रक्रियेतून विषारी धूर आणि कानठळ्या बसण्याइतका आवाजच बाहेर पडतोच ना? काही वेळा रंगीबेरंगी किरणांनी आसमंत उजळून निघतो पण तरीही धुरातून आसमंतात वायू प्रदूषण होतेचकी !
दिवाळीत फटाके का फोडले जातात याचे आजतागायत तरी उत्तर मिळालेले नाही. कारण फटाक्यांचा शोध लागण्याआधी आपण दिवाळीसहीत सर्व सण आणि उत्सवांचा आनंद घेतच होतो की? त्यावेळेस फटाके नव्हते मग आनंद व्यक्त होत नव्हता का? मग काय इतर वाद्य वाजवून आनंद व्यक्त करत होतो का? तसं असेल तर याचा अर्थ आपण फटाके हे इतर वाद्यांचा पर्याय म्हणून उपोग करतो आहोत असं वाटतं ! निदान इतर वाद्ये मार्यादापूर्ण आवाजात वाजली तर निदान वायू आणि ध्वनी प्रदूषण तरी होणार नाही..!
फटक्याने पैशाचा चुराडा होतोच पण वायू आणि ध्वनिप्रदुशाणामुळे बऱ्याच समस्या निमार्ण होत आहेत. फटाक्याच्या आवाजाने पक्षी घाबरतात सैरावैरा पळत सुटतात त्यात त्यांना अपघात होण्याची शक्यता असते तसेच घाबरण्याने हृदयाची धडधड वाढून पक्षाघात होण्याची शक्यता बळावते. त्यांच्या शरीरांतर्गत बरेच बदल होऊन त्यांची जननक्षमता कमी होण्याचे प्रमाण वाढू शकते याने एखाद्या पक्षाची जात नष्ट होण्याचे प्रमाण वाढू शकते.
फटाके फोडूनच दिवाळी साजरी करता येते असे नव्हे. दुसरी बरीच समाजोपयोगी कामे करता येऊ शकतात. फटाक्यांच्या आवाजामुळे लहानमुले झोपेत दचकतात, मोठे आवाज करणाऱ्या फटक्यांमुळे ध्वनी प्रदूषण होतेच त्यामुळे तणाव, मानसिक विकार आणि सृजनशीलता कमी होण्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या प्रदूषणामुळे चेतासंस्थेवर परिणाम होतो. फटाक्यांच्या आवाजामुळे इमारती आणि पुलांसारख्या निजिर्व वस्तू हादरतात आणि त्याचं आयुष्य कमी होतं, कच्या घरांना तडे जातात. महानगरांमध्ये झाडांची संख्या वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. कारण ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी झाडं फायदेशीर ठरतात. आवाज करणारे फटाके फोडू नयेत. ‘डिपार्टमेण्ट ऑफ एक्सप्लोझिव्ह’ने प्रमाणित केलेले फटाकेच उडवावेत. आवाज न होणारे फटाके फोड्ल्यानेही वायुप्रदूषण होणारच आहे त्याचे काय?
दिवाळीसारख्या सणाने नागरिकांत एकोपा, भाईचारा वाढीस लागतो, कटुता कमी होते आणि आनंद निर्माण होतो. आपण दुसऱ्याच्या जीवनात आनंद निमार्ण केला, तर आपल्या जीवनात परमेश्वर आनंद निमार्ण करतो. परंतु अश्या ध्वनि आणि वायुप्रदूषण निमार्ण करणारे फटाके फोडल्यास आनंदावर विरजण पडते. बर यातून क्षणापुरता आनंद मिळतही असेल परंतु आपण कळत न कळत किती ध्वनी आणि वायू प्रदूषण करतो हे समजत सुद्धा नाही. आपण फटाके फोडून स्वत: आनंद व्यक्त करू शकतो पण तोच दुसऱ्या व्यक्तीचा, पक्षांचा, लहान बाळांचा, जेष्ठ नागरिकांचा, आजारी माणसांचा आनंद हिरावून घेऊन पापाचे धनी होतो हे विसरतो. तर वेळीच सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना फटाके फोडल्याने वाढणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषचे भविष्यातील धोके समजावून सांगून येणारी दिवाळी सर्वांसाठी कानावर हात ठेऊन साजरी करायला लागू नये स्वत:बरोबर दुसऱ्यालाही आनंद आणि प्रेम निर्माण करणारी असावी हे समजावून सांगावे.
फटाक्यांचा शोध चीनमध्ये लागला हे आपण बघितले पण त्याचे व्यापारीकरण संपूर्ण जगात इतक्या झपाटयाने झाले की त्यामुळे चीनमधील काही व्यापार्यांचे आर्थिक गणित बेरजेचे झाले. त्या देशाला याच्या विक्रीतून चांगले परकीय चलनही मिळू लागले. आपण आनंद व्यक्त करण्यासाठी किती आणि कुठे फटाके फोडावेत हे आपण अंतर्मुख होऊन विचार करायला शिकलं पाहिजे. फटाके फोडून फक्त वायू आणि ध्वनी प्रदूषण तर होतेच पण पैशाचीही राख होते. हाच पैसा एखादया गरीब, गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी दान केला, अवर्षण ग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या घरातील कच्च्याबच्यांसाठी उपयोगात आणला, त्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी उपयोगात आणला, शैक्षणिक संस्था, जे सैनिक देशाचे रक्षण करतांना हुतात्मे झाले त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि कॅन्सरग्रस्त पीडितांच्या औशोधपचारासाठी उपयोगात आणला गेला तर त्याचे राखे ऐवजी सोने होईल.
चीनमध्ये भूतांना आणि वाईट विचारांना घालविण्यासाठी तसेच त्यांना दूर ठेवण्यासाठी नवीन वर्षांच्या संध्याकाळी फटाके फोडले जातात हे जरी त्यांच्यासाठी खरं मानलं तरी आपण ते न फोडता आपल्या मनातील भूतांना आणि वाईट विचारांना बाजूला ठेवण्यासाठी फटाके न फोडता पर्यावरणाला मदत करणे आणि येणाऱ्या पिढीला स्वच्छ सुदृढ जीवन देणे म्हणजेच आपल्यातील वाईट विचारांना दूर करण्यासारखे आहे. येणारी दिवाळी ध्वनी आणि वायू प्रदूषणविरहित साजरी केली जावो हीच आपल्या सुजाण नागरिकांकडून अपेक्षा. ही दिवाळी सर्वांस आनंदाची, भरभराटीची, सुखसमृद्धीची, जावो हीच शुभेच्छा.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply