आज वसुबारस…….. आपल्या या कृषिप्रधान देशातील गोवंशाचे महत्व जितके निर्विवाद आहे तितकेच आयुर्वेदातही गोवंशास व त्यातही गायींस अनन्यसाधारण महत्व दिले आहे. ज्या-ज्या ठिकाणी दूध वा तूप कोणत्या प्राण्याचे वापरावे याचा निर्देश नसेल तिथे ते गायीचेच समजावे असे आयुर्वेद सांगतो! गायीला आपण मातेसमान मानतो; इतकेच नव्हे तर तिला आपण ३३ कोटी देवांचे स्थानही मानतो..(येथे कोटी हा शब्द संख्यादर्शक नसून प्रकार दर्शक आहे; ८ वसू, १२ आदित्य, ११ रुद्र आणि २ अश्विनीकुमार असे मिळून हे ३३ प्रकारचे देव होत!!)
आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहता गाय हा अत्यंत उपयुक्त प्राणी आहे. गायीचे दूध, दही, ताक, लोणी, तूप, मूत्र, मल इतकेच नव्हे तर ती मेल्यावर प्राप्त होणारी शिंगे, अंगावरील केस व तिच्या पित्ताशयातील खडेदेखील औषधी गुणधर्माचे आहेत असे आयुर्वेद सांगतो!!
दूध :
पचायला हलके व उत्तम Tonic असल्याने रोज सेवन करण्यास योग्य आहे.
दही :
रुची उत्पन्न करणारे व भूक वाढवणारे आहे. मात्र दही उष्ण असल्याने गरम करून वा गरम पदार्थांवर घालून घेवू नये तसेच रात्री खाणे टाळावे.
ताक :
पचनशक्ती वाढवते, मळास बांधते व उष्ण असते.
लोणी :
थंड, पचायला जड असून प्रदीर्घ रोगानंतर घातलेले वजन वाढविण्यास उपयुक्त आहे.
तूप :
थंड असूनदेखील भूक वाढविण्याचे सामर्थ्य तुपामध्ये आहे. उत्तम स्वर, स्मरणशक्ती व वर्ण यांची इच्छा असल्यास तुपाचे नियमित सेवन करावे. तुपामुळे Cholesterol वाढते ही “लोणकढी” थाप आहे!!
गोमूत्र व गोमयामध्ये जंतुनाशक व कॅन्सरनाशक गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र; गोमूत्र हे क्षारयुक्त आणि उष्ण-तीक्ष्ण गुणांनी युक्त असल्याने त्याचे सेवन करण्यापूर्वी शासनमान्यताप्राप्त आयुर्वेदीय वैद्यांचा सल्ला घ्यावा. वैद्यकीय सल्ल्याशिवाय केवळ भावनिक आवाहनांना बळी पडून दररोज गोमूत्र वा गोमूत्र अर्क यांचे सेवन मुळीच करू नये.
गोरोचन म्हणजेच गायीच्या पित्ताशयातील खड्यांच्या सहाय्याने माणसाच्या पित्ताशयातील खड्यांचा त्रास बरा करता येतो. अर्थात हे खडे मेलेल्या गायींचे असावेत. याकरता गाय मारावी असा कर्मदरिद्रीपणा आयुर्वेदाला अपेक्षित नाही.
जागेअभावी वरील सर्व द्रव्यांचे औषधी गुणधर्म अगदी थोडक्यात दिले आहेत. यांपैकी प्रत्येकावर स्वतंत्रपणे लिखाण यापूर्वी केले आहेच. गोसंरक्षण ही काळाची गरज व आपले परमकर्तव्य आहे. मात्र गोउत्पादनांचा वैद्यकीय उपचारांतील उपयोग हा आयुर्वेदाची रीतसर पदवी घेतलेल्या वैद्यांकडूनच केला जाईल; कोणतेही वैद्यकीय प्रशिक्षण नसलेल्या व्यक्ती वा स्वयंचिकित्सेचा अवलंब होणार नाही याबाबतही सजग असणे आवश्यक आहे!!
जयतु गोमातरम् |
(या विषयावरील वैद्य परीक्षित शेवडे लिखित ‘गोमाता आणि मानवता’ तसेच ‘गोहत्या म्हणजेच समाजहत्या’ ही दोन भावानुवादीत पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. तसेच ते ‘गोमाता आणि आपले आरोग्य’ या विषयावर जाहीर व्याख्यानेदेखील देतात.)
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply