ग्रंथालयातून “हंस ” २०२० चा दिवाळी अंक वाचायला आणला. खरं तर २०२१ ची दिवाळी उंबरठ्यावर आलीय पण गतवर्षी कोरोनाशी झुंज देत आपली दिवाळी अंकाची परंपरा आपण सुरु ठेवली, हेच भले यश. मीही जमेल तसे ( लॉक डाऊन च्या अधल्या -मधल्या सवलतीतून ) दिवाळी अंक वाचत राहिलो. हंस चे वैशिष्ट्य म्हणजे पंचाहत्तरीत पदार्पण ! या रोमहर्षक प्रसंगाचा आणि अभिमानास्पद वाटचालीचा त्यांनी मुखपृष्ठावर सार्थ उल्लेख केला आहे-
” ७५ वर्षांच्या वैभवशाली परंपरेचा दिमाखदार अमृतमहोत्सव “
आनंद अंतरकरांचे मनोगत “स्वस्तिवाचन ” मुळातून वाचण्यासारखे आहे. अतिशय विनम्रपणे त्यांनी हा कालखंड मांडला आहे, पूर्वसूरींचे स्मरण करून. ” फक्त कला शाश्वत असते, बाकी सगळं काळाबरोबर वाहत जाऊन नष्ट होतं ” असे अनुभवाचे बोल येथे भेटतात.
पण हे जर खरं असेल तर एकेक करून आमच्या मान्यवर दिवाळी अंकांनी माना का टाकल्या, हे कोडं उलगडत नाही. एकेकाळचे प्रसिद्ध परंपरा असलेले तीन अंक कालौघात “किस्त्रीम ” झाले- विद्याताई बाळ,हमो असे ख्यातकीर्त संपादक असताना! “अंतर्नाद “ने नुकताच निरोप घेतला. स्वतःच्या बलबुतेवर चालणारे “मिळून ” किंवा ” सत्याग्रही विचारधारा” का तग धरून आहेत- ती चळवळीची मासिके आहेत म्हणून?
नियतकालिकांची प्रोटिन्स वेगळी असतात- बौद्धिक,अन्वर्थक वगैरे! “हंस ” म्हणजे साहित्यामधील एक संपन्न “कास पठार” असं अंतरकर लिहितात. “हंस ” हा मराठी साहित्यातील एका कालखंडातील पाहुणा, हे त्यांचे निरीक्षण खरे असेल तर ६० वर्षांची त्यांची प्रदीर्घ संपादकीय कारकीर्द सफल म्हणायला हवी.
पण मनुष्यत्व जपण्यासाठी कलेची कितपत जरुरी असते?
एका साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून एका वक्त्याने कळकळीने प्रश्न विचारलेला मला अजून आठवतो-
” आंघोळीची चड्डी ३०० रुपयांना घ्यायला परवडते, कुटुंबाबरोबर एक चित्रपट /नाटक बघताना आपण सहजी १००० रुपयांचा चुराडा करीत तीन तास करमणूक विकत घेतो, पण ३०० रुपये खर्च करून जन्मभर आनंद देऊ शकणारे पुस्तक मात्र का घेत नाही?”
दिवाळी अंकांची दुनिया आणि व्यथा अधिकच वेगळी- उणेपुरे तीन चार महिन्यांचे आयुष्य, किमती शेकड्यात म्हणून ही इंडस्ट्री कायम ग्रंथालयांच्या आणि जाहिरातींच्या जीवावर चालली आहे. मग ७५ वर्षांचे आश्चर्य अधिक वाटते. नेटाने वल्ही मारणारे संपादक येथवर नाव आणून सोडतात तेव्हा आपण त्यांच्याबद्दल किमान कृतज्ञ तरी राहायला हवे.
मासिकाचे आयुष्य ७५ वर्षे, पण त्यातून आपल्याला मिळणाऱ्या आनंदाला कोणती मोजपट्टी लावायची? सर्वेक्षण करा, प्रश्नावल्या करा, मुलाखती घ्या पण मराठी मनाच्या या सांस्कृतिक संचयाचे, भरण -पोषणाचे आकडे कोठेही मिळणार नाहीत. मानवी जीवन समृद्ध करणे, व्यक्तिमत्वातील जाणिवांना कंगोरे आणणे हेच जर साहित्याचे प्रयोजन असेल तर दरवर्षी इमाने-इतबारे निघणारे ३००-४०० दिवाळी अंक त्यात आपला वाटा नक्कीच अभिमानाने उचलत असतील.
आनंद अंतरकर रीझ या कवयित्रीच्या जीवनविषयक ओळी उदहृत करतात-
The burst of music down an unlistening street –
I wonder at the idleness of tears !
दुःख काळजाजवळ असावं म्हणजे त्याला त्याच अंतःकरणात प्रेमाचा ओलावाही निर्माण करता येतो.
“हंस ” ला अजून किमान पंचवीस वर्षांचा पाठिंबा आपण जाहीर करू शकतो कां ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply