लहानपणी दिवाळी जवळ आली की, वर्तमानपत्राच्या स्टाॅलवर मांडलेले दिवाळी अंक पहाण्यात मी गुंग होऊन जायचो.. काॅलेज पूर्ण झाल्यावर जाहिरातींच्या व्यवसायाला सुरुवात केली. ‘दै. सकाळ’ मध्ये ‘चित्रकार पाहिजे’ ही जाहिरात वाचून मी दिलेल्या पत्त्यावर भाऊ महाराज बोळात, एका मोठ्या वाड्यातील बैठ्या घरासमोर जाऊन उभा राहिलो. जाळीच्या दरवाजावर टकटक केल्यावर सॅण्डो बनियन व निळ्या- हिरव्या पट्यांचा पायजमा घातलेले साठीचे गृहस्थ समोर आले..
मी त्यांना जाहिरात वाचून आल्याचे सांगितल्यावर त्यांनी दार उघडून मला आत बोलावले व बसायला एक खुर्ची दिली. त्यांना ‘मे’ महिन्यात एक वासंतिक अंक काढायचा होता, कथाचित्रांसाठी चित्रकाराची त्यांना आवश्यकता होती…
त्यांचं नाव होतं, श्रीकृष्ण करमरकर! कोकणात मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण झाल्यावर ते पुण्यात आले. चाळीस वर्षे कॅलेंडरचा व्यवसाय केला. त्यानिमित्ताने हजारों लोकांच्या, कंपन्यांच्या ओळखी झाल्या. दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर यांच्यासारख्या सुप्रसिद्ध चित्रकारांशी त्यांचा परिचय झाला. सीझनमध्ये व्यवसाय करुन वर्षभराची कमाई ते करीत असत. त्यांना दोन मुली, एकीचं लग्न झालं होतं तर दुसरी काॅलेजमध्ये शिकत होती. पत्नी शिक्षिका होती.
त्या वासंतिक अंकाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचं पुढे घनिष्ठ मैत्रीत रुपांतर झालं. त्या नंतरची पंचवीस वर्षे त्यांच्या ‘अवनी’ या दिवाळी अंकाचं काम मी करीत होतो..
त्यांच्याकडे गेलं की, कामाचं स्वरूप समजावून सांगितल्यावर ते स्वतःच्या हाताने काॅफी करुन द्यायचे. कथाचित्र कसे हवे आहे ते स्वतः पोझेस घेऊन दाखवायचे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांचा आग्रह असे. वेळ सांगून यायला जमणार नसेल तर फोन करुन तसे सांगण्याची, त्यांनी मला ताकीद दिली होती.
दरवर्षी एखाद्या ओळखीच्या स्त्रीला किंवा मुलीला माॅडेल म्हणून ठरवून तिचे फोटो काढायला मला सांगत असत. मग आम्ही सर्वजण रिक्षाने सारसबागेत जात असू. तिथे फोटोसेशन झाल्यावर चहापाणी होऊन कार्यक्रमाचा समारोप होत असे. मग त्यातील एक प्रिंट फायनल करुन मुखपृष्ठ तयार होत असे.
करमरकरांनी केलेल्या कामाचे मानधन नेहमीच दिवाळीच्या आधी दिलेले आहे. वयाच्या नव्वदीतही त्यांनी दिवाळी अंक काढला होता.. अंकाचे काम ते झपाटल्याप्रमाणे करीत असत. मुंबईच्या जाहिराती मिळविण्यासाठी ते मुंबईला जात. एके वर्षी मी त्यांच्यासोबत मुंबईला गेलो होतो. दिवसभरात अनेक कंपन्यांना भेटी दिल्या. जाहिराती मिळविल्या व रात्री पुण्यास परतलो.
श्रीकृष्ण करमरकर हे ‘दिवाळी अंक’ निर्मिती बाबतचे माझे गुरु होते. आज मी जे काही करु शकतो आहे, ही त्यांचीच शिकवण आहे…
१९८५ सालामध्ये आम्ही बंधूंनी पंधरा दिवाळी अंकांसाठी काम केले होते. मी त्या काळी व्यंगचित्रे काढत असे. दिवाळी अंकांशी पत्रव्यवहार करुन सात दिवाळी अंकातून माझ्या व्यंगचित्रांना प्रसिद्धी मिळाली होती. त्यामध्ये गांवकरी, प्रपंच, कटकट, जत्रा, इ. अंक होते.
नंतर दरवर्षी दिवाळी अंकासाठी कथाचित्रांची कामं मिळत असत. सदानंद प्रकाशनच्या सहाही दिवाळी अंकांचं काम केलेलं असे. त्यांचे दिवाळी अंक दसऱ्यालाच प्रकाशित होत असत. ही परंपरा त्यांनी शेवटपर्यंत चालू ठेवली होती.
नाटक चित्रपटांच्या कामामुळे दिवाळी अंकांची संख्या दरवर्षी मर्यादितच राहिली. २००७ पासून संस्कृती दिवाळी अंकाचे काम केले. जाहिरातींचे दरपत्रक करण्यापासून ते मुखपृष्ठ, सजावट व अंक प्रिंटींगला जाईपर्यंत मी जातीने लक्ष घातले. या दहा वर्षांच्या काळात मला खूप काही शिकायला मिळाले.
कोरोनामुळे गेले दोन वर्षे बाजारात दिवाळी अंक फारच कमी दिसले. या वर्षापासून पुन्हा दिवाळी अंक सजू लागलेत. यावर्षी अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था व अक्षरभारती यांच्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ केले आहे. रुपाली अवचरे व निखिल लंभाते यांच्या ‘भूमिका’ दिवाळी अंकासाठी कथाचित्रे केलेली आहेत..
चाळीस वर्षांपूर्वी शेकड्यांमध्ये बाजारात दाखल होणारे दिवाळी अंक आता रोडावले आहेत. वितरण करणाऱ्या संस्था बंद झालेल्या आहेत. मान्यवर व मातब्बर लेखकांची पिढी काळाआड गेल्यानंतर नवीन पिढीतील लेखकांची फळी उभी रहाते आहे..
इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून पीडीएफच्या स्वरुपातील दिवाळी अंक जरी हाताहातात पोहचले तरीदेखील त्याला छापील दिवाळी अंकांची सर कधीही येणार नाही.. कारण दिवाळी फराळासोबत हातात अंक घेऊन, ‘वाचन फराळ’ही तेवढाच महत्त्वाचा!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-१०-२१.
Leave a Reply