दिवाळीचा आजचा दिवस पाडव्याचा.. नविन विक्रमसंवताचा आज आरंभ..कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा..प्रतिपदा या शब्दाचं बहुजनांनी केलेलं सुलभीकरण म्हणजे ‘पाडवा’ हा शब्द..’भाद्ररपदा’चं कसं ‘भादवा’ होतं, अगदी तसच..!
या दिवसाला ‘बलीप्रतिपदा’ असंही म्हणतात..शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी आद्य राजा बळी याचं स्मरण करण्याचा दिवाळीतील हा सर्वाधीक महत्वाचा दिवस..याच दिवशी वामनाने बळीला पृथ्वीवरून पाताळात ढकलले अशी पुराण कथा आहे..खरं तर ते एक रुपक असावं..हे रूपक आहे शेतीसंस्कृती संपुष्टात येऊन शेतीला दुय्यम स्वरूप प्राप्त झाल्याचं..आपल्या देशातील मुळ शेतीसंस्कृती व नंतरच्या काळात उदयाला आलेल्या इतर संस्कृतींमधील झगड्यात, शेतकऱ्याला व शेतील दुय्यम स्थान मिळण्यास सुरूवात झाली..
समाजव्यवस्थेच्या शिर्षस्थानी असणारा शेतकरीनंतरच्या काळात दुय्यम (पाताळ) स्थानी ढकलला गेला, त्याची सुरूवात या दिवशी झाली असावी असा अर्थ यातून काढला जावू शकतो..
‘दिन दिन दिवाळी…’ या लोकगीतातली शेनटची ओळ, ‘इडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो..’ अशी आहे व याचा अर्थ स्पष्ट आहे..’इडा (इला)’ म्हणजे जमीन आणि बळी म्हणजे शेतकरी..जमिनीला आपल्या संस्कृतीत अन्नदेवता ‘इला’ म्हटलय..जमिनीवरील संकट टळून बळी म्हणजे शेतकरी राजा झाल्या शिवाय हा देश समृद्ध होणार नाही हाच संदेश यातून दिला जातो..सध्या झालेल्या शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीवरून ह्याची जाणीव आणखी तीव्र होते..
वामनाने जरी बळीला पाताळात ढकललं असलं तरी हा देश व या देशातील शेतकरी हजारो वर्ष उलटूनही बळीला अद्याप विसरलेला नाही हेच ‘बळीप्रतिपदा’ साजरी होते यावरून सिद्ध होतं…आमच्या दक्षिण कोकणात तर ‘बळी’ नांवाचे पुरूष पोत्यानी सापडतील..हा देश मुळचा ‘बळी’चाच असं म्हणण्यास हरकत नसावी..
शेतीचा शोध स्त्रीयांनी लावला..स्त्रीचं भुमीशी असलेलं नातं आपल्या सर्वांनाच माहित आहे..आपल्या प्राचिन संस्कृतीत स्त्रीयांनाही महत्व होतं..त्या काळातल्या घरातली कर्ती-धर्ती स्त्रीच असायची.. मातृप्रधान समाजव्यवस्था हा कुटुंब व्यवस्थेचा गौरव होता..आपल्या समाजात अजुनही देवापेक्षा देचींचं महत्व जास्त मानलं जातं. कुलदेवतेचा आशिर्वाद सर्वच कार्यात आवर्जून घेतला जातो, वर्षातून एकदा तिची खणा-नारळाने ओटीही न विसरता भरली जाते ही सर्व आपल्या समाजात कधी काळी असलेल्या मातृप्रधान व्यवस्थेच्या अद्याप शिल्लक आणि शाबूत असलेल्या पाऊलखुणा आहेत..देशात नंतर आलेल्या संस्कृतीने मात्र पुरूषप्रधान संस्कृती आणली आणि स्त्रीची कर्तेपणाची जागा आयतोबा पुरूषांनी घेतली..आणि मग दिवाळी पाडव्याला स्त्रीकडून, म्हणजे पत्नीकडून स्वत:ला ओवाळून घेण्याची नविन प्रथा सुरू झाली..असं असलं तरी समाजाच्या सर्वच थरात ही प्रथा नाही हे ही आवर्जून नोंदवावं लागेल..हल्ली एकमेकांचं बघून काही जण करूही लागलेत अशी ओवाळणी मात्र त्यामागे गमतीचाच भाग जास्त असतो..ग्रामिण भागातही अशी ओवाळणी फार प्रचलित नसावी असं वाटतं..!
जुन्या आणि नव्या संस्कृतींच्या संघर्षात आपली कृषीप्रधानता आणि मातृप्रधानता दोन्ही दुय्यम स्थानी ढकलली..जगातील सर्वच देशात वेगवेगळ्या काळात उदयाला आलेल्या किवा बाबेरून आलेल्या आणि देशातल्या मुळ संस्कृतींच्या झगड्यात असं घडत आलेलं आहे आणि हे पुढेही घडत राहाणार आहे..
या दिवशी विक्रमसंवत सुरू होतं..शहरी व्यापाऱ्यांच किवा उत्तर भारतातल्या लोकांचं नवं वर्ष या दिवशी सुरू होतं..व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या, कीर्द -खतावणीच्या चोपड्या ह्या दिवशी नविन हिसाबासाठी सज्ज होतात..पाडवा हा साडेतीन मुहूर्तांमधला ‘अर्धा’ शुभमुहूर्त आहे..
गुजरात्यांमधे या दिवशी पहाटे लवकर उठून, स्नान करून, नविन कपडे परिधान करून घरचा कर्ता पुरूष हातात थाळी घेऊन ती लाटण्यानं बडवत घरभर फिरतो..मागून त्याची पत्नी व मुलं चालत असतात. हे मी लहानपणी पाहीलंय आणि मला तेंव्हा त्यांची गम्मतही वाटायची..ते जे गाणं गातात ते आता मला नीट आठवत नाहीय..अशा दोन-तिन फेऱ्या झाल्या की सर्व घरातून स्वच्छ केर काढून तो कचरा घरातला नोकर दूर नेऊन टाकतो..आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला लक्ष्मी मानून करत असलेली तिची पूजा आणि गुजरातेतील ही प्रथा यात विलक्षण साम्य आहे..
आता दिवाळी संपत आली. उद्याची भाऊबिज झाली की सणांची राणी, नव्हे सम्राज्ञी असलेली दिवाळी या वर्षापुरती आपला निरोप घेईल आणि तिची नव्याने प्रतिक्षा करण्यास सुरूवात होईल..
नविन वर्ष सुरू झालंय.. आपल्या सर्वांना नविन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!
– नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply